Login

चारित्र्य अंतिम भाग

About Character
"अगं, शालू तू असं वागशील असं वाटलं नव्हत गं मला.मी तुला आपलं मानलं,तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू माझा विश्वासघात करशील ? असं वाटलं नव्हतं मला. तुझ्यावर विश्वास होता म्हणूनच मी माहेरी गेली किंवा कुठे बाहेर गेली तरी तू घरी येऊन काम करत होती. मी तुझ्यावर कधीही अविश्वास दाखविला नाही; पण तू हे काय केलेस? मी तुझ्यासाठी आतापर्यंत किती केले? तुला अडीअडचणीला मदत केली. तुझ्यावर बहिणीसारखे प्रेम केले. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती गं."
" आणि तुम्ही तरी ? असे वागायला नको होते.तुम्हीही आपल्या नात्याचा,आपल्या प्रेमाचा विश्वासघात, अपमान करायला नको होता. काय करू मी? सांगा तुम्हीच? सांगा ना....."

"काय झाले मीना ? काय सांगू? आणि रडते का आहे तू?"

मीनाचे रडणे व बोलणे ऐकून,मीनाच्या नवर्‍याला रात्री जाग आली व तो मीनाला विचारू लागला.

नवर्‍याच्या आवाजाने मीना झोपेतून जागी झाली व भीतीने एकदम घामाघूम झाली.

"काही नाही हो स्वप्न पडले काहीतरी. घाबरण्यासारखे काही नाहा.झोपा तुम्ही."

मीनाने नवर्‍याला सांगितल्यावर तो पुन्हा झोपून गेला.

'अरे बापरे! आपण जे पाहिले ते स्वप्न होते तर.. किट्टीत आज सर्वजण जे काही बोलल्या त्याचा आपण एवढा विचार केला की, स्वप्नात तसे दिसले.
किती घाबरले मी! आणि मी माझ्या नवर्‍यावर आणि शालूवर संशय तरी कसा घेतला? स्वप्नात का असेना...पण असा विचार माझ्या मनात आलाच कसा? माझा नवराही तसा नाही आणि शालूही तशी नाही. माझा विश्वास आहे दोघांवर.'

आणि असा विचार करत करत मीना झोपेच्या स्वाधीन झाली.


"काय गं शालू, छाया कशी आहे गं? तू काही ऐकले का तिच्याबद्दल? "

मीनाने शालू कामाला येताच, तिला विचारले.

" ताई, छाया खूप चांगली आहे हो. नवर्‍याच्या पगारात भागत नाही. म्हातारे सासूसासरे आहेत. त्यांचा खर्च, मुलांचा खर्च. यासाठी काम करते. माझ्या घराच्या थोडे पुढेच राहते ती. कष्टाळू आहे,प्रामाणिक आहे.तुमच्या बिल्डींगमध्ये काय झाले? ते सांगितले तिने मला.
ताई, यात तिची काहीही चूक नाही.
ती ज्यांच्याकडे काम करत होती; तिथे सुरुवातीला दोघेही चांगले होते. एकजण तर खूप चांगला होता. तुमच्या मिस्टरांसारखा ...कधीही कोणत्याही बाईकडे वाईट नजरेने न पाहणारा. आम्हांला कळून जाते ताई, समोरचा माणूस आमच्याकडे कोणत्या नजरेने पाहतो आहे ते.
त्या दोघांतील तो दुसरा होता,त्याने सुरुवातीला काही केले नाही. चांगला होता आणि दोघंही घरी नसताना छाया काम करून जायची त्यामुळे काही प्रश्नच नव्हता. पण एकदोनदा ते घरी असताना छायाला काम करण्याचा प्रसंग आला; तेव्हा एकदा त्या माणसाने छायाचे नाव घेण्याचा प्रयत्न केला.छायाने त्याचे ऐकले नाही. तिने त्याच्यासोबत राहणार्‍या माणसाला सांगितले व काम सोडणार आहे ते पण सांगितले. तो त्याला ओरडला असेल आणि छायानेही सोसायटीत तक्रार करण्याची धमकी दिली असल्याने,त्या नाव घेणाऱ्या माणसाने छायाचे व त्या चांगल्या माणसाचे अफेअर आहे. अशी तक्रार सोसायटीत केली व छायाची बदनामी केली.
त्याला वाटले,' माझ्या बोलण्यावर सर्व विश्वास ठेवतील. घरकाम करणाऱ्या बाईवर कोण विश्वास ठेवेल? '

आणि झालेही तसेच ना?
छायाकडे सर्वजण त्याच नजरेतून बघायला लागले ना? गरिबीमुळे,परिस्थितीमुळे लोकांच्या घरी काम करतो म्हणून पैशांसाठी आम्ही असे काम करतो.असे तुमच्यासारखा श्रीमंत लोकांना वाटत असेल; पण ताई तसे नसते हो. प्रत्येक बाईला आपली इज्जत सांभाळायची असते. आपले चारित्र्य जपायचे असते. बाई गरीब असो किंवा श्रीमंत, शिकलेली असो की न शिकलेली,सुंदर असो किंवा नसो पण ती आपल्या स्त्रीत्वाचा आदर करत असते. तिच्यावर अन्याय करणारे,अत्याचार करणारे राक्षसरुपी पुरूष हे अन्याय करून मोकळे राहतात आणि त्रास त्या
बाईला होत असतो."

शालूचे बोलणे ऐकल्यावर मीना तिला म्हणाली की, "तुझे जे म्हणते आहे ..ते खरे आहे. पण जगात काही चांगलेही लोक असतात,सर्व काही वाईट नसतात. सोसायटीतील कमिटी मेंबर्स सर्व विचारविनिमय करूनच निर्णय घेतील."

कमिटी मेंबर्सने त्या दोन्ही माणसांची व छायाचीही चौकशी केली.चौकशीनंतर खरे काय? खोटे काय ? सर्व समजले.

तक्रार करणाऱ्या व्यक्तीस कायदेशीर कारवाई करू वगैरे सांगून त्याच्याकडून सर्व कबूल करून घेतले व छायाची माफी मागण्यासहो सांगितले आणि
त्या माणसाला घर सोडून जाण्यास सांगितले.
सोसायटीतील लोकांना खरे काय ते समजले. नाहीतर उगाच छायाची बदनामी झाली असती. तिला त्रास असता.
पण आता ती खूष होती आणि शालूलाही आनंद झाला होता.


दोन दिवसांत नवरात्र महोत्सव सुरु होणार होता. सर्वीकडे जोरात तयारी सुरू होती.

मीनानेही आपल्या घरी घटस्थापना केली. आणि देवीला मनोभावे प्रार्थना केली,

" हे देवी माता, आम्ही सर्व स्त्रीया म्हणजे तुझीच रूपे ना!
मगं आमच्यावर अन्याय का होतो? आमच्या चारित्र्याचे रक्षण करण्याची तू आम्हांला शक्ती दे. छायासारख्या कितीतरी स्त्रीया असतील ज्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविले जातात; पण प्रत्येकीलाच न्याय मिळतो असे नाही. तू अशा अन्याय,अत्याचार करणाऱ्या लोकांना चांगली बुद्धी दे, त्यांच्यातील राक्षसीवृतीचा नाश कर. आणि सर्वांना आनंद,समाधान दे."

समाप्त
नलिनी बहाळकर

🎭 Series Post

View all