Login

छायांचा खेळ भाग - १

आराध्याने सत्य कबूल केल्यावर तिच्या भीतीच्या छाया नाहीशा होतात आणि ती भावाला वाचवते.
छायांचा खेळ भाग - १


पावसाळ्याची संध्याकाळ होती. आकाशात काळे ढग होते. साताऱ्या जवळच्या ‘वैरागढ़’ या जुन्या किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक कार धाव घेत होती. कार चालवत होती आराध्या, बारावीला शिकणारी एक हुशार पण शांत स्वभावाची मुलगी. तिच्यासोबत होता तिचा भाऊ अभि, दहावीचा विद्यार्थी.

दोघे जिज्ञासू, शोधक मनाचे. दर सुट्ट्यांमध्ये एखादे नवे ठिकाण, नवी गोष्ट शोधण्याची त्यांची हट्टाची परंपरा.

पण आजचा त्यांचा प्रवास वेगळा होता…कारमध्ये बसल्यापासून अभि काहीसा अस्वस्थ दिसत होता.

“ताई… तुला कधी असं वाटतं का… की कोणीतरी आपल्याकडे पाहतंय?” अभिने विचारलं.

आराध्या हसली, “रात्रीच्या वेळी तू जास्त हॉरर सिरीज पाहतोस म्हणून!”

“नाही ताई, खरंच सांगतोय… किल्ल्याबद्दल लोकं म्हणतात ना, तिथे जुन्या छाया भटकतात…”

आराध्या त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत पुढे निघाली. पण नकळत तिच्या मनात एक हलकी थरथर उठली.

तासाभराने ते किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचले. अवतीभोवती प्रचंड शांतता. वारा फक्त दगडी भिंतीवर आदळत, असा आवाज करत होता जणू श्वास घेत असलेली एखादी प्रचंड जीवंत वस्तू.

“चल… वर जाऊया!” आराध्याने म्हटलं. दोघेही टॉर्च घेऊन पायऱ्या चढू लागले. प्रत्येक पायरीवर एक इतिहास. शंभर वर्षांपूर्वीच्या दगडांमध्ये दडलेली असंख्य रहस्यं.

पण अचानक…ठक… ठक… ठक…कुणीतरी त्यांच्या मागे येत असल्यासारखा आवाज ऐकू आला. आराध्या मागे वळली, कोणीच नव्हतं. अभिचा हात थरथरत होता. “ताई… हा भूत आहे का?”

“शांत बस! वारा असेल.” आराध्याने स्वतःलाच धीर दिला. ते पुढे गेले. किल्ल्याच्या मध्यभागी पोहोचल्यावर अभि अचानक थांबला. त्याच्या टॉर्चमधला प्रकाश एका जुनाट कमानीवर थांबला.

कमानीवर कोरलेलं होतं, "छाया सत्य सांगतात."
“ताई… याचा अर्थ काय?” अभि कुजबुजला.

आराध्याला अचानक थरारक उत्सुकता आली. “कदाचित इथे काहीतरी लिहिलंय… काही संकेत.”

ते पुढे सरकले. कमानीच्या मागे एक लहान खोली होती. भिंतीवर कोणी तरी खडूने घाईघाईत मोठ्या अक्षरांत काही लिहिलं होतं, “जो सत्यापासून पळतो, त्याच्या मागे छाया लागतात.”

अभि भयभीत झाला. “इथे काहीतरी चुकीचं आहे, आपण परत जाऊया.”

आराध्या थोडा विचार करून म्हणाली, “दहा मिनिटं बघू. काही नसेल तर खाली उतरू.”

पण अचानक…खोलीच्या बाहेरून एक सावली झपकन गेल्यासारखी दोघांना दिसली. अभि तर भीतीने मागे उडीच मारली. “ताई… कोणीतरी आहे!” आराध्या टॉर्च घेऊन बाहेर पळाली.

अंधार, वारा आणि दगडांची थंड शांतता. पण जेव्हा ती परत खोलीत आली…अभि दिसत नव्हता. तिच्या छातीत धडधड वाढली. “अभि! अभि… कुठे आहेस??”
टॉर्चचा प्रकाश इकडे-तिकडे फिरत होता. तेव्हा खोलीच्या प्रवेशद्वाराजवळ अचानक एक पांढरट, धुसर सावली हलत असल्यासारखी दिसली.

आराध्या मागे सरकली. सावली अधिक स्पष्ट होत गेली… आणि तिच्यासमोर एक माणूस उभा राहिल्यासारखा दिसला. त्याचा चेहरा अस्पष्ट, पण डोळे जणू काजळाएवढे काळे.

“तुझा भाऊ… सत्य शोधायला गेला आहे,” तो दबक्या आवाजात म्हणाला. आराध्या थरथरली. तिच्या गळ्यातून आवाज फुटत नव्हता. “तू… तू कोण?”

त्या सावलीसारख्या माणसाने हात वर केला आणि कमानीकडे बोट दाखवले. तेच वाक्य, “छाया सत्य सांगतात.”

“तुझ्या भावाला वाचवायचं असेल तर… सत्य जागं कर.”
आणि क्षणात सावली अंधारात विरून गेली.
आराध्या एकटी, थरथरणारी.

पण भाऊ हरवल्याची जाणीव तिला मजबूत बनवत होती.
ती बाहेर पडली. किल्ल्याच्या डाव्या बाजूच्या अरुंद गल्लीत तिला अभिच्या बुटांचे ठसे दिसले. पावसातले. ताजे. ती गल्लीत शिरली. पुढे एक मोठं दालन होतं. दालनात एक लोखंडी दरवाजा होता.

दरवाज्यावर फक्त एकच वाक्य लिहिलेलं, “सत्याला स्पर्श करणाऱ्यांनाच प्रवेश.”

आराध्या थिजून गेली. याचा अर्थ काय? दरवाजा उघडायचा तर “सत्याला स्पर्श” करावा लागणार? पण ते काय?

अचानक दालनातल्या दगडांवर एक प्रकाश पडला. जणू कुठल्यातरी कोपऱ्यात ठेवलेली मशाल पेटली. तिच्या प्रकाशात आराध्याला भिंतीवर काही चित्रं दिसली,
१) एक मुलगा खोटं बोलतोय
२) त्याच्या मागे काळी सावली दिसते
३) दुसऱ्या चित्रात तो सत्य बोलतोय
४) आणि सावली प्रकाशात विरत आहे

“मग… सत्य म्हणजे प्रामाणिकपणा?” आराध्याला तिच्या आईचे शब्द आठवले, “सत्य बोलणारा कधी हरवत नाही.”

आराध्याने त्या लोखंडी दरवाजाला हात लावला. क्षणभर काहीच घडलं नाही. आणि अचानक…क्लिक्क…
दरवाजा स्वतःहून उघडला. अंधारातून तिच्या कानात एक आवाज आला, “तू सत्याच्या मार्गावर आहेस… पण पुढचं पाऊल सर्वात कठीण असेल.”

ती आत शिरली. आतलं दालन प्रचंड मोठं. मध्ये एक जुनी लाकडी पेटी आणि पेटीच्या वर अभिचा टॉर्च. म्हणजे तो इथे आला होता!

“अभि!!” ती ओरडली. कोणीच उत्तर दिलं नाही.
पेटीजवळ एक कागद होता. त्यावर लिहिलं होतं,
“अभि जिवंत आहे. पण त्याला वाचवण्यासाठी तुला तुझं सर्वात मोठं सत्य कबूल करावं लागेल.”

आराध्या थांबली. श्वास रोखला. तिच्या चेहऱ्यावर पावसाचे थेंब पडत होते. तिच्या मनातली एक गोष्ट, जी तिनं कधीच कुणाला सांगितली नव्हती… ती आता बाहेर येणार होती.

पण त्या क्षणी…दालनाच्या आतल्या काळ्याकुट्ट कोपऱ्यातून अभिचा मंद आवाज आला, “ताई… मला वाचव…”

आराध्याचं हृदय थरथरलं. पण एकदम त्याचा आवाज शांत झाला…आणि दालनात घुमला तोच भयावह आवाज, “सत्य सांग… नाहीतर छाया त्याला घेऊन जातील.”