Login

छायेचा बाजार भाग - १

आर्या एका गुढ ठिकाणी हरवते आणि तिथे स्वतःचीच सत्य छाया शोधते.
छायेचा बाजार भाग - १


रात्रीची वेळ. पुण्याच्या जुन्या शहरातील गल्लीबोळांतून गडद निळसर धुके खाली उतरत होतं. लोकांनी दिवे लावले तरी प्रकाश धुक्यात हरवत होता. रस्त्याच्या कडेला जुन्या इमारती, चिरलेले दरवाजे आणि दूर कुठेतरी कुत्र्यांचे भुंकणे, एक विचित्र, अनामिक वातावरण.

या गूढ वातावरणात एक मुलगी शांतपणे चालत होती, आर्या, वय १९, मनाने जिद्दी पण थोडी भित्रीही.
ती तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली होती, पण परतताना गूगल मॅपने चक्क तिला चुकीच्या गल्लीत वळवलं.

“इथे एवढा अंधार का आहे?” तिनं पुटपुटत फोनची टॉर्च लावली. अचानक तिला पुढे काही फडफडणारा प्रकाश दिसला. तिने लक्ष दिलं तर त्या गल्लीत उजेडाचा रस्ता होता, लहान दुकाने, रंगबेरंगी दिवे, लोकांची गर्दी… पण आवाज नव्हता. सगळं शांत. खूप शांत.

आर्याला न जुमानता पाय तिकडे वळले. गल्लीत शिरताच तिने पाहिलं, दुकानांच्या बोर्डांवर विचित्र नावं होती,
"आठवणींची दुकान" "स्वप्नांचे दुकान" "गुपितांचा व्यापारी" "हरवलेल्या लोकांचा फोटो-स्टॉल"

आर्या थबकली “हे काय आहे…?” तिने स्वतःलाच विचारलं. तेवढ्यात एक आवाज आला, “पहिल्यांदाच आलीस का? चिंता नको, आमच्या बाजारात सगळं सुरक्षित आहे.”

आर्याने मागे वळून पाहिलं. एक सुमारे पन्नाशीतील माणूस, उंच, अंगावर जुनं कोट, डोळ्यांत विचित्र चमक.
“हा कोण भुताखेतांचा बाजार आहे का?” आर्याने अर्धा विनोद, अर्धी भीतीने विचारलं.

माणूस हसला, “नाही, हा छायांचा बाजार. इथे जे हरवतं… ते कधीतरी दुसऱ्या कोणाकडे सापडतं.”
आर्या अजून काही विचारण्याआधी त्या माणसाने दुकानाकडे बोट दाखवलं, “आठवणींचं दुकान.”

दुकानात एक वृद्ध स्त्री बसली होती. तिच्या टेबलावर जुन्या कॅसेट्स, किल्ली, मोडकी खेळणी, आणि रंग उडालेले फोटो अल्बम्स. ती आर्याकडे पाहून म्हणाली, “काय शोधतेस बाळे?”

“मी… हरवली आहे.”
“प्रत्येकजणच इथे हरवून येतं,” वृद्धा म्हणाली.
"इथे आठवणी खरेदी करता येतात… पण त्यासाठी एखादी आठवण द्यावी लागते."

आर्या गोंधळली, "म्हणजे?"

वृद्धा पुढे वाकली , "जा, त्या कॅबिनमध्ये बस. मी तुला दाखवते तू काय हरवली आहेस…" आर्या सावधपणे कॅबिनमध्ये गेली. एक लहानसा स्क्रीन आणि अचानक स्क्रीनवर चमकले काही व्हिडिओ,

ती लहान असताना पिता तिला सायकल चालवायला शिकवत होता, ती तिच्या आईसोबत पहिल्यांदा जत्रेत गेली होती, तिची मैत्रीण तिला मिळालेला पहिला पुरस्कार दाखवत होती…

आर्याच्या डोळ्यात पाणी आलं. ती फक्त १९ वर्षांची होती, पण तिला जाणवलं की तिच्या आयुष्यातील खूप गोष्टी ती विसरली आहे.

वृद्धा म्हणाली, “तू एक आठवण घेऊ शकतेस. पण बदल्यात तुला एखादी जुनी आठवण मला द्यावी लागेल. इथला नियम तसाच आहे.”

“माझ्या आठवणी मी देणार नाही,” आर्याने ठामपणे सांगितलं. “जग असंच चालतं बाळा… काही मिळवायला काही द्यावं लागतंच.”

आर्या कॅबिनमधून बाहेर पडली. तिचा श्वास जड झाला होता. तेवढ्यात पुन्हा तो जुना कोट घातलेला माणूस तिच्या मागे आला. “मल वाटलं तू शहाणी आहेस. पण तू आता बाजारात अडकली आहेस.” तो शांतपणे म्हणाला.

“अडकले? म्हणजे?”
“या बाजारात येणारा सहज परत जाऊ शकत नाही.”
तो हसला. “जोपर्यंत तूला कळत नाही की तुझी खरी ‘छाया’ कोणती आहे, तोपर्यंत हा बाजार तुला बाहेर जाऊ देणार नाही.”

आर्याच्या पोटात धस्स झालं. “काय छाया? काय बाजार? मला काहीच कळत नाही!”

तो शांतपणे म्हणाला, “सुरुवात कर ‘गुपितांच्या दुकानातून’…”

आर्याचा घसा कोरडा झाला. पण तिने पाय पुढे टाकले.
कारण तिला बाहेर पडायलाच हवं होतं.
“ही जागा जादुई आहे… की धोकादायक…?”
तिला काहीच उमगत नव्हतं.