Login

चहा दशमी (लघुकथा)

लघुकथा
"ए, केतकी आज काय आणलं डब्यात."

"अग, ते ... मी दशमी आणली आहे."

"फक्त दशमी."

"हो ग साक्षी."

"आज पण... पण याच्या सोबत काय खाणार ग? तू नेहमीच दशमी आणते आणि मग आमच्या सोबत कधीच जेवण करायला बसत नाही. "

"नाही. तसं नाही ग.  मी तुमच्यासारखे रोज पास्ता, पिझ्झा, बर्गर, सॅन्डविच असे पदार्थ आणू शकत नाही आणि कॅन्टीनमध्ये जाऊन खाऊ सुध्दा शकत नाही."

"मग तू कशासोबत खाणार दशमी?"

"कॅन्टीनमधून फक्त चहा....."

"म्हणजे चहा सोबत खाणार?"

"अग तुला नाही कळणार साक्षी."

" दशमी सोबत जर काहीच खायला नसले तरीही आमच काही अडत नाही.  मस्त दशमीचा रोल करायचा आणि चहामध्ये बुडवून खायचा.'

"पण का ? भाजी का नाही आणत तू.?

"अग साक्षी, तुला नाही कळणार."

"बर केतकी तू आज माझा डबा खा. मी बघ पावभाजी आणली आहे. नाही तर आपण दोघी मिळून तुझा आणि माझा डबा खाऊ या."

"नको साक्षी, थॅक्स. मला असलं काही खायची सवय नाही ग. आम्हांला आमची चटणी भाकरीच बरी."

"अग पण एखादे दिवशी असं खाल्लं तर चालते ना."

"अग हे सगळे जिभेचे चोचले आहे आणि माझी आई ,बाबा नाही देऊ शकत हे सगळ."

"असं काय आहे ग तुझ्या चहा दशमीत?"

"आईचे कष्ट, शेतात राबणाऱ्या बापाच्या कपाळावरून ओघळणारा घाम...."

"थांबलीस का केतकी ? बोल ना."

"अग साक्षी जाऊ दे ना. तुला नाही कळणार. तू चारचाकीतून फिरणारी मुलगी. उन्हाची झळ  काय सुर्याचा एक किरण सुध्दा तुझ्या चेहऱ्यावर  पडू न देणारी मुलगी."

केतकीच्या बोलण्याने साक्षी थोडी दुखावल्या गेली. "एक साधारण परिस्थितीत असणारी मुलगी आपल्याला नाही म्हणते. पण का?"

साक्षी  मनातून खूपच अस्वस्थ झाली होती. अशी का बोलते ही. का खात असेल ती चहा दशमी. पोट भरत असेल कि नाही ? तिचे आई वडील खरच देऊ शकत नसतील. साक्षी काॅलेजमधून घरी पोहोचली.

"आई, ए आई. मला आत्ताच्या आत्ता चहा दशमी खायची आहे."

"अग पण तुझ्यासाठी मी पास्ता ...." सरिता

"नाही आई. मला फक्त चहा दशमी हवी आहे." साक्षी

"पण तुला चहा दशमी आवडत नाही ना.'

"हो, पण  आज खाऊन बघायची आहे."

साक्षी अतिशय श्रीमंत घरातली एकुलती एक मुलगी. त्यामुळे  तिच्या सवयी सुध्दा तशाच होत्या. कशातच कधीच ॲडजेस्टमेन्ट न करणारी साक्षी. नाश्ता असो  किंवा जेवण अगदी चमचमीत लागायचे.  रोज वेगवगळे पदार्थ तिच्या ताटात लागायचे‌. साक्षी नुकतीच दहावी झाली होती. अकरावीत तिने एका चांगल्या काॅलेजमध्ये ॲडमिशन घेतली होती. एका नव्या जगात तिने प्रवेश केला होता. पण तिथेच तिची भेट केतकी सोबत झाली. अगदीच साधारण परिस्थितीत राहातं असलेली केतकी. पण दोघींची घट्ट मैत्री झाली. अनेक श्रीमंत घरातल्या मुली साक्षीला समजावून सांगू लागल्या ‌ की केतकी सोबत राहू नको. पण साक्षीला केतकीचा शांत आणि मनमिळाऊ स्वभाव  खूप आवडत होता. साक्षी वयाच्या अशा उंबरठ्यावर उभी होती. की काय चांगले आणि काय वाईट यांचा थोडाफार विचार  ती करायला लागली. पण लगेचच कोणाच्याही बोलण्याला हुरळून जायची.

पण आज तिचा चहा दशमी खाण्याचा हट्ट बघून सरिता चक्रावून गेली. नेहमीच हेल्दी प्रोटीन पावडर घेणारी साक्षी अचानक चहा मागते.  साक्षीला अचानक काय झाले? हे जाणून घेणे गरजेचे वाटत होते.

"आई, काय झाले ? मला देते आहेस ना चहा."

"हो, तू फ्रेश होऊन ये. मी  तुझ्यासाठी चहा करते. '

सरिताने चहाचे आधण ठेवले. त्यात साखर, चहापत्ती, आले कुटून घातले. पाण्याला उकळी फुटेपर्यंत ती भुतकाळात जाऊन पोहोचली. गरीबीचे चटके सहन करत  तिने
सुख दुःखाचे चढ उतार बघीतले होते. पण लग्नानंतर तिच्या आयुष्यात सुखाची झालर आली. तरीही तिला सुद्धा चहा दशमीचा कधीच विसर पडला नव्हता. त्यामुळे आजही कधी कधी ती चहा दशमी खायचीच. पण साक्षी..."

"आई, झाला का चहा."

"हो, ये लवकर."

सरिताने चहात दूध घातले आणि चहा तयार केला.

तेवढ्यात साक्षी आली. तिने बघीतले तर गरमागरम चहा तयार होता. सोबत ताटलीत दशमी ठेवली होती. साक्षीने घाईघाईने दशमी हातात घेतली. तिचा छान रोल केला आणि चहात बुडवून खायला सुरुवात केली.

"आई, आज मला कळले खरच खूप छान लागते चहा दशमी."

तेवढ्यात साक्षीचे वडील सुरेश येतात.

"काय? आज साक्षी चक्क चहा दशमी  खात आहे. हे तर जगातलं दहाव आश्चर्यच म्हणावे लागेल."

"बाबा, असं काय हो. मी पण खाऊ शकते एखादेवेळी."

"पण नेमकं कारण कळेल का चहा दशमी खाण्याचे?" सरिता

"अग आई, माझी मैत्रिण आहे ना केतकी नावाची. ती कधी कधी ... कधी कधी नाही रोजच ती दशमी आणते. कधी चटणी ,तर कधी भाजी आणते. तर कधी कोरडी दशमी आणते आणि कॅन्टीनमध्ये जाऊन चहा सोबत दशमी खाते. खरच परिस्थिती माणसाला काय काय करायला लावते ना."

"साक्षी, अचानक तुला परिस्थितीची जाणीव का व्हायला लागली. आपल्याला तर काहीच कमी नाही. तुला सगळं मनासारखे मिळत आहे. मग तू परिस्थितीचा विचार केव्हापासून करायला लागली. "

"बाबा, मान्य आहे. आजपर्यंत तुम्ही आणि आईने जे  माझ्यासाठी केलं आहे. तो अनमोल आहे आणि हा ठेवा मी  आयुष्यभर जपून ठेवणार आहे. पण कधी कधी आपल्या समोर येणाऱ्या परिस्थितीला तोंड देता यावे म्हणून आपल्या मनाची तयारी करावी लागते. उद्या मला जर बाहेर शिकायला जायचे असेल तर असलेल्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले पाहिजे."

" आमची परी राणी आता मोठी झाली आहे. हट्टाने प्रत्येक गोष्ट मागणारी साक्षी केव्हापासून इतकी कशी समजूतदार झाली."

"आई तू सुध्दा खाते ना  कधीकधी चहा दशमी."

"हो ग. आमचं लहानपण खूप कष्टात गेले. आई सतत आजारी असायची. बाबा शाळेत जायचे. घरी आजी आणि आम्ही चौघे बहीण भाऊ. आमची दुपारची शाळा राहायची. त्यात आजीचे सोवळे ओवळे फार कडक. आजीला स्वयंपाकात मदत व्हावी म्हणून  शेजारच्या काकू स्वयंपाक करायला यायच्या. त्यावेळी नाश्ता हा प्रकार नव्हता. कारण परिस्थिती  तशी नव्हती. तुटपुंज्या पगारात आठ ते दहा जणांचे कुटुंबाचे पोट भरणे सोपे नव्हते. पण आजी आम्हाला चहासोबत दशमी मात्र आवर्जून खायला द्यायची. म्हणजे दोन तीन तास तरी पोटाला आराम पडायचा. चुलीवरचा खदखद उकळी आलेला, मस्त अद्रक घातलेला, कमी दुधाचा वाफाळलेला चहा आणि सोबतीला दशमी. मग काय आमच्यासाठी ती मेजवानीच असायची. कधी नवीन नाश्त्यासाठी हट्ट नाही.की आदळआपट नाही. गोंधळ नाही. जे आहे  ते गुपचुप खाऊन शाळेच्या तयारीला  लागत होतो. मग  जे काही स्वयंपाक तयार असायचा तोच  दुपारच्या जेवणाचा डबा  म्हणून सोबत घेऊन जायचो."

"बाबा, तुम्ही नाही का काही बोलणार?"

"साक्षी तुझी आई बरोबर बोलत आहे.   तेव्हाची परिस्थिती कठीण होती. पण हार कधीच मानली नाही. आहे त्या परिस्थितीत सगळेजण आनंदाने जगायचे."

"आई बाबा मी पण ठरवले आहे. आज पासून हट्ट करायचा नाही. कधी गाडी घरी नसली तर रिक्षाने, बसने येणे जाणे करायचे. नाश्त्याला जे काही बनवशील तेच खाणार मी. कारण माझ्या आवडीचा नाश्ता किंवा भाजी नसली तर मी जेवण करत नव्हती. सरळ उठून जायची. पण आज मला त्या अन्नाची किंमत कळली. ज्यासाठी तुम्ही रात्रंदिवस कष्ट करता.

साक्षीचे बदलेले विचार बघून सरिताने  आणि सुरेशने तिला प्रेमाने जवळ घेतले.