छलावा
रामाने पुन्हा सगळीकडे पाहिले पण त्याला काही कुठेच कुत्रे दिसले नाही. त्याने हातात दगड उचलला की आवाज बंद होत होता आणि खाली टाकला की पुन्हा येत होता. एकदाचा तो आवाज बंद झाला आणि रामा घरात आला. शारदा अजूनही खोलीत आली नव्हती. ती, अम्मा आणि गुंडप्पा एकत्र होते. अम्मा पान खात होती आणि ते दोघे तिचे पाय दाबत होते. अचानक ती खुणा करू लागली आणि शारदा बोलू लागली.
“जा आता झोपायला. खूप उशीर झाला आहे. रामा तुझी वाट बघत असेल.”
“नाही अम्मा ते आत्तापर्यंत हत्ती, घोडे सगळं विकून झोपले असतील.” शारदा म्हणाली.
“मग ठीक आहे. अजून थोडावेळ पाय दाब. खूप बरं वाटतंय.” अम्माने खुणा केल्या.
इतक्यात रामा तिथे आला आणि त्याने ते पाहिले.
“गुंडप्पे लहान मुलांनी लवकर झोपायचं असतं. तू अजून जागा का आहेस? जा जाऊन झोप.” रामा म्हणाला.
“काय कलू दोप येत नाहीये.” तो म्हणाला.
“तरीही जाऊन झोप. शारदा तू पण चल आता झोपायला. अम्मालाही झोपू दे. तू अशीच पाय दाबत राहिलीस तर अम्माला झोप येणार नाही.” रामा म्हणाला.
यावर अम्मा खुणा करू लागली आणि शारदा बोलू लागली; “स्वतः तर आईची कधी सेवा केली नाही आणि दुसरं कोणी करतंय तर ते बघवत नाही.”
रामा डोक्यावर हात मारून गुंडप्पाच्या बाजूला जाऊन बसला. एवढ्यात पुन्हा कुत्र्याच्या रडण्याचा आवाज आला.
“असं ऐकलं आहे की, जेव्हा कुत्र्यांना आत्मे दिसतात तेव्हा ते रडतात. हे खरं आहे का अम्मा?” शारदाने विचारलं.
“नाही. नाही. असं काही नसतं.” रामा थोडा घाबरून म्हणाला.
यावर अम्मा खुणा करू लागली; “हो असं असतं. आत्मे असतात. मी स्वतः एका वाईट आत्म्याशी सामना केला आहे.”
सगळेच जरा सावरून बसले.
“क…काय?” रामाने घाबरून विचारलं.
अम्मा पुढे खुणा करू लागली; “मी तेव्हा सात वर्षांची होते. त्या रात्री असाच कुत्र्याचा रडण्याचा आवाज येत होता. पिताश्रीना वाटले की असेल एखादे भटके कुत्रे म्हणून ते बाहेर बघायला गेले पण बाहेर कोणीच नव्हते. फक्त आवाज येत होता.”
यावरून रामाला तो बाहेर जाऊन बघून आलेला तो प्रसंग आठवला आणि त्याला भीती वाटू लागली पण तसे न दाखवता तो ऐकू लागला.
अम्मा पुन्हा खुणा करू लागली; “त्यांनी बाहेर पाहिलं आणि ते घरात आले. आम्ही सगळे पुढे काय होणार आहे यापासून अनभिज्ञ झोपून गेलो. आम्हाला माहीत नव्हतं थोड्या वेळात काहीतरी अघटीत घडणार आहे. तो छलावा आत येईल याची आम्हाला कल्पनाच नव्हती.”
रामा चांगलाच घाबरला होता आणि गुंडप्पाला चिकटून बसला.
“छ.. छ… छलावा म्हणजे?” रामाने घाबरून विचारलं.
अम्मा पुढे खुणा करू लागली आणि नेहमीप्रमाणे शारदा बोलू लागली; “छलावा म्हणजे जो कोणाचेही रूप घेऊ शकतो. त्या रात्री त्याने कुत्र्याचे रूप घेतले होते. आम्ही सगळे झोपलो पण थोड्यावेळात मला वाटलं माझा पाय कोणीतरी ओढला.”
“आ… आ… आजोबांनी दार लावलं नव्हतं का? तो आत कसा आला?” रामाने घाबरून विचारलं.
यावर अम्मा खुणा करू लागली; “लावलं होतं पण तो सापाचं रूप घेऊन आत शिरला. मी जेव्हा पाहिलं पाय कोण ओढत आहे तेव्हा मला एक आकृती दिसली.”
रामा एकदम गुंडप्पाला धरुनच बसला आणि बोलू लागला; “क… क… कसली आकृती?”
यावर पुन्हा अम्मा खुणा करू लागली; “मध्ये मध्ये बोलू नकोस. मी विसरते. खूप जुनी गोष्ट आहे ना ही!”
रामाने गुंडप्पाला त्याच्या दुसऱ्या बाजूला बसवले आणि तो त्याच्या जागेवर बसला.
“नाही बोलणार सांग.” तो घाबरून म्हणाला.
ती पुन्हा खुणा करू लागली; “तर मी सांगत होते त्याचं तोंड कुत्र्यासारखं होतं. आपले कान इथे असतात ना त्याचे डोक्यावर होते. डोळे लाल भडक आणि पाय! पाय तर नव्हतेच. मी ओरडू नये म्हणून त्याने त्याचे पंजे माझ्या तोंडावर ठेवले होते आणि तो मला उचलून घेऊन चालला होता. आजही त्याचे ते तीक्ष्ण नखं असलेले पंजे माझ्या लक्षात आहेत.”
एवढ्यात बाहेरून पुन्हा त्या कुत्र्याच्या रडण्याचा आवाज आला आणि रामा घाबरला.
“लामा एवल का घाबलतोय?” गुंडप्पाने विचारलं.
“क… कोण घाबरतेय? अम्मा पुढे सांग तू कशी सुटलीस मग?” रामाने विचारलं.
यावर ती पुन्हा खुणा करू लागली; “आता बाकीची गोष्ट उद्या. आता मला झोप आली आहे.” ती आडवी पडत म्हणाली.
“चला आपण पण जाऊन झोपू.” शारदा म्हणाली.
“नाही. आज मी इथेच झोपणार. आजही तो आला आणि अम्माला उचलून नेलं तर? अम्माचं रक्षण करणं माझं कर्तव्य आहे.” रामा चाचरत म्हणाला.
त्याचं बोलणं ऐकून अम्मा उठून बसली आणि खुणा करू लागली; “माझ्या लक्षातच नाही तुला लहानपणापासून आत्म्याची भीती वाटते ना. एकदा अशीच गोष्ट सांगितली होती तर तुला दुसऱ्या दिवशी ताप आला होता.”
यावर शारदा आणि गुंडप्पा हसू लागले.
“नाही मी घाबरत नाहीये. चला झोपा आता.” रामा म्हणाला.
अम्मा पुन्हा आडवी झाली.
“चला ना एवढा वेळ वाट बघत होतात आणि आता इथे काय झोपता? लहान आहात का अम्माच्या बाजूला झोपायला?” शारदा म्हणाली.
“सांगितलं ना तो छलावा आला तर अम्माचं रक्षण करण्यासाठी थांबलो आहे. तू जा. तू झोप आत. गुंडप्पे जा तू पण झोप.” रामा म्हणाला.
“नाई. मी पन इतेच झोपनाल.” तो म्हणाला.
“ठीक आहे. आज सगळे इथेच झोपू.” रामा म्हणाला.
शारदा नाराजीने तयार झाली. अम्मा, शारदा, गुंडप्पा आणि रामा असे ओळीने झोपले. मध्येच कुत्र्याच्या रडण्याचा आवाज येत होता तेव्हा रामा एकदम डोळे उघडुन बघत होता आणि तोंडावर चादर घेऊन झोपत होता. असेच सगळ्यांचे सुरू होते. फक्त अम्मा शांतपणे झोपली होती. थोड्याच वेळात रामाची झोप उडाली. अचानक त्याच्या डोळ्या समोर अम्माने वर्णन केलेला तसा प्राणी आला. दिसायला एकदम कुत्र्यासारखा. त्याने गुंडप्पाला हलवून जागे केले. त्यालाही ते दिसले. त्याने शारदाला उठवले आणि शारदाने अम्माला. अम्मा सोडून सगळेच खूप घाबरले होते. कोणी काही करणार इतक्यात तो स्वतः आत गेला.
“अहो जा बघा ना.” शारदा म्हणाली.
“म… मी?” रामाने घाबरत विचारलं.
रामा काही जाणार नाही हे अम्माला माहित होतं. ती स्वतः काठी शोधून उठली आणि आत जाऊ लागली. रामा आणि बाकी सर्व तिच्या मागे गेले. तो रामाच्या खोलीत होता. सर्वांनी खिडकीतून पाहिले तर तो पलंगावर बसला होता. रामाने तिथे पेढे ठेवले होते तेच तो खात होता.
“याचे पाय नाहीयेत.” रामा म्हणाला.
“आपलं लक्त पिन्याआधी तोंद गोल कल्तोय.” गुंडप्पा घाबरून म्हणाला.
अम्माने खुणेने त्यांना शांत केलं आणि आत जाऊ लागली. सगळ्यांनी तिला अडवलं पण ती शारदाला सोबत घेऊन आत गेलीच. रामा आणि गुंडप्पा खिडकीतून बघत होते.
अम्मा आत जाऊन खुणा करू लागली आणि शारदा थोडी घाबरत बोलू लागली; “कोण आहेस तू? इथे का आला आहेस?”
त्या आवाजाने त्याने त्या दोघींकडे पाहिले. यामुळे शारदा अजूनच घाबरली.
“असं मी नाही या विचारतायत.” ती पटकन म्हणाली.
तो काही करत नाहीये हे पाहून अम्माने काठीने त्याच्या डोक्यावर असलेले कुत्र्याचे वस्त्र काढले तर आत एक माणूस होता पण तो शुद्धीत आहे असं वाटत नव्हतं. ते पाहून रामा आणि गुंडप्पा देखील आत आले. त्या माणसाचे डोळे उघडे होते आणि त्याने तोंडात पेढे कोंबले होते. अम्माने तिथून पाण्याचा तांब्या घेतला आणि त्याच्या तोंडावर पाणी मारले तेव्हा तो भानावर आला.
“हे मी कुठे आलो? तुम्ही सगळे कोण आहात?” तो आजूबाजूला बघत म्हणाला.
“अरे! आमच्याच घरात येऊन विचारतो कोण आहात? आम्ही स्वामी आहोत या घराचे.” रामा म्हणाला.
त्याबरोबर तो त्याच्या दिशेने येऊ लागला. रामा घाबरून तिथे असलेल्या मंचकावर चढला.
“प्रणाम महोदय. आमचे भाग्य की आम्ही तुम्हाला भेटलो. देवाच्या दयेने.” तो म्हणाला.
“लामा उतल हा पुलुष तुला प्लनाम कलतोय.” गुंडप्पा म्हणाला.
“हे.. हे.. काय आहे? एखाद्याच्या घरात गपचुप शिरायचे आणि त्याची मिठाई खायची आणि नंतर प्रणाम पण करायचा?” रामा म्हणाला.
“माफ करा महोदय. मला झोपेत चालण्याचा आजार आहे देवाच्या कृपेने. त्यामुळे मी झोपल्यावर कुठेही जातो. आजही बाहेर एका अंगणात बसलो होतो. झोप येऊ नये म्हणून खूप प्रयत्न केले पण कधी झोप लागली ते समजलं नाही देवाच्या कृपेने.” तो म्हणाला.
याला नक्कीच वाक्य पूर्ण झाल्यावर देवाच्या कृपेने बोलायची सवय आहे हे रामाच्या लक्षात आले.
“तुमचं नाव काय? आणि कुठून आलात? या नगरातले तर वाटत नाही.” रामाने विचारलं.
“मी गंगाराव बाजूच्या गावातून आलोय खास आचार्य तथाचार्य यांना भेटायला. देवाच्या कृपेने.” तो म्हणाला.
“त्यांचे घर तर कोपऱ्यावर आहे आणि एवढे मोठे आहे की दूरवरून दिसते.” रामा म्हणाला.
“उद्या सकाळी मी त्यांना भेटायला जाईन. माफ करा आता निघतो.” तो म्हणाला.
यावर अम्मा खुणा करू लागली आणि शारदा बोलू लागली; “आता रात्र खूप झाली आहे. आत्ता कुठे बाहेर जाऊ नका. आजची रात्र इथेच काढा आणि उद्या जा.”
“धन्यवाद. माझ्यामुळे तुम्हाला एवढा त्रास झाला तरीही तुम्ही मला घरात ठेवून घेताय. जसे ऐकले होते तसेच पाहिले. विजयनगरमध्ये सगळे एकमेकांना मदत करतात. देवाच्या कृपेने.” तो म्हणाला.
“ते ठीक आहे पण आचार्यना द्यायला काही भेट घेतली आहे का?” रामाने विचारलं.
“भेट? नाही. वाटेतून येताना फक्त एक व्यापारी दिसला होता त्याच्याकडून ही लांडग्याची कातडी घेतली तीच. देवाच्या कृपेने.” तो म्हणाला.
“ठीक आहे हीच त्यांना भेट द्या. आता थोडावेळ आराम करा.” रामा म्हणाला.
तो लगेच तिथेच पलंगावर झोपायला जात होता. रामाने त्याची सोय दुसरीकडे केली आणि सगळे पुन्हा बाहेर गेले.
‘एकतर बेरात्री असा घरात घुसला आणि या पलंगावर झोपायचे होते.’ तो स्वतःशीच म्हणाला.
नंतर त्याने अम्मा आणि शारदाकडे पाहिले आणि बोलू लागला; “ते तर बरं झालं अम्मा तू इथे आलीस नाहीतर माहित नाही मी रागात काय करून बसलो असतो.”
“हो का?” शारदाने उपहासाने विचारलं आणि सगळे झोपायला गेले.
सगळे शांत झोपले.
**************************
इथे आचार्यच्या घरी धनी आणि मणी अजूनही झोपले नव्हते. त्यांना झोपच लागत नव्हती. दार उघडे होते आणि धनी आचार्यबद्दल काहीबाही बोलत होता.
**************************
इथे आचार्यच्या घरी धनी आणि मणी अजूनही झोपले नव्हते. त्यांना झोपच लागत नव्हती. दार उघडे होते आणि धनी आचार्यबद्दल काहीबाही बोलत होता.
“धनी झोप ना आता.” मणी म्हणाला.
“अरे काय करू मणी त्या म्हाताऱ्याला आज दिवसभर जराही कोसायला मिळालं नाही तर झोपच येत नाहीये.” तो उठून बसत म्हणाला.
दोघेही उठून बसले आणि आचार्यबद्दल बोलून बोलून चांगलेच तोंडसुख घेत होते.
“मणी आपली आई जे अंगाई गीत म्हणायची ते म्हण ना.” धनी म्हणाला.
तो लगेच ते ते म्हणू लागला. त्या गीतात लांडग्याचा उल्लेख होता आणि मणी डोळे बंद करून ते म्हणत होता. इतक्यात रामाच्या घरी झोपलेला तो माणूस झोपेत चालत चालत तिथे पोहोचला. धनीची त्याला पाहून बोबडी वळली. त्याने मणीला भानावर आणले. दोघेही घाबरले.
“तुला आम्हाला खाऊन काही मिळणार नाही. जा. जा आमच्या गुरुजींना खा.” धनी म्हणाला.
तो माणूस दुसऱ्या दिशेने गेला आणि या दोघांनी सुटकेचा निःश्वास सोडला. तो माणूस आचार्यच्या कक्षात शिरला. आचार्य झोपेत सौदामीनीला भेटण्यासाठी जे सांकेतिक गाणे म्हणतो ते बडबडत होता. त्याची पत्नी खाली झोपली होती. गंगाराव त्याच्या बाजूला झोपला आणि त्याच्या पोटावरून हात फिरवला. आचार्य आधी स्वप्नात होता त्यामुळे त्याला गुदगुली झाली आणि जेव्हा त्याला काहीतरी विचित्र आहे असे वाटले तेव्हा त्याने डोळे उघडुन पाहिले आणि त्याच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. तो थरथर कापू लागला. तो उठला आणि पलंगाला पाठमोरा टेकून उभा राहिला. त्याने पुन्हा मागे वळून पाहिले तर तो तिथे नव्हता.
‘बहुतेक भास झाला किंवा विचित्र स्वप्न पडलं.’ तो स्वतःशीच म्हणाला आणि त्याने पुन्हा सरळ मान करून पाहिले तर आता तो त्याच्या समोर होता.
विजेचा झटका लागावा असा तो कापत होता. धनी आणि मणी दारातून हे सर्व पाहत होते. घाबरून त्याच्या तोंडून काही आवज येऊ लागले तेव्हा वरुणमालाला जाग आली. तीही हा सर्व काय प्रकार आहे पाहत होती.
आचार्य धनी, मणीला मदतीला बोलवत होता.
“माफ करा गुरुजी आम्हाला तुम्ही प्रिय आहात पण इतकेही नाही की आम्ही याची शिकार होऊ.” धनी म्हणाला.
मणीने देखील संमती दिली. इतक्यात स्वतः त्याची पत्नी त्याच्या समोर आली.
“बोल मानव लांडग्या तुझी काय समस्या आहे? स्वामी नक्कीच दूर करतील. ते सर्व ज्ञानी, त्रिकाल स्वामी आहेत.” ती म्हणाली.
आचार्यची भीतीने गाळण उडाली होती आणि हे पाहून त्याला काय करावे सुचत नव्हते. थोडावेळ असाच गेला आणि तिने त्या माणसाच्या डोक्यावर असलेली ती कातडी बाजूला काढली.
“हा मानव लांडगा नाही तर पूर्ण मानव आहे.” ती म्हणाली.
क्रमशः….
Credit:- Sony SAB Tenali Rama serial.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा