बाल गुन्हेगारी ( कथा १ - भाग २) सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे

लहान मुलांच्या हातून होणाऱ्या चुका
बाल गुन्हेगारी
(कथा १,-भाग २) सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे

निहिराची बहीण निकीता, दोघीमध्ये पाच वर्षांचे अंतर होते. तसेच त्यांच्या मुलांमध्ये ही होते. निकिता मुलगा आकाश तेरा वर्षांचा तर निहिराची मुलगी आभा सात वर्षांची होती. दोघे एकमेकांमध्ये खूप छान रमत असत. आकाश मोठा असल्याने तिला छान समजून घेत असे. आभाही दादा दादा करत त्याच्या मागे असायची. यावेळी करोना आणि लाॅकडाऊन मुळे दोघे एकमेकांना दीड वर्ष भेटली नाही. साधारण दीड वर्षांनी निकीता आकाशला घेऊन निहीराकडे आली होती. एक दिवस दोघी बहिणी बहिणी आकाश आणि आभाला घरी सोडून खरेदी करायला बाहेर पडल्या. खरेदी करून दोघी परत आल्या तेव्हा आभा बेडरूममध्ये बसली होती आणि आकाश हाॅलमधे टिव्ही बघत बसला होता. दोघींनाही वाटले की आभा आणि आकाशची भांडणे झाली असतील म्हणून आभा बेडरूममध्ये जाऊन बसली असेल. पण निराळे काही घडले असेल असे दोघांच्याही मनात आले नाही. पण… ..

पण त्या दिवशी आभा च्या वागण्यात एकदमच फरक पडला. ती निखिलपासून देखील लांब राहू लागली. घरात कुणी पुरुष माणसे आली की ती बेडरूममध्ये जाऊन बसू लागली. तिला शिकवायला सर होते त्यांना ती घाबरू लागली, त्यांच्या शाळेतही मुले होती म्हणून ती शाळेत जायला ही रडू लागली. नेहमी आनंदाने शाळेत जाणारी मुलगी असे का करते आहे हे कुणाच्या लक्षात येईनासे झाले. मग निकीता तिला घेऊन तिच्या नेहमीच्या डॉ. कडे गेली. त्यांनी डॉ. शुभांचे नाव सांगितले.

आता डॉ. शुभाकडे जाऊन आल्यावर उलगडा होऊ लागला. निखिल आणि निहीरा आता निकीता आणि आकाशची वाट पहात होते. पुढच्या आठवड्यात निकीता आकाशला घेऊन आली खरी पण ती निहीरावर खूप रागवली होती. निहीराने इतक्या तातडीने का बोलावले हे तिला सांगितले नाही म्हणून तिचा राग होता. निकीता आल्यावर आभा जास्तच घाबरली आणि आईला सोडून मावशीकडे पण जायला तयार होईना. रात्री ती झोपली सुद्धा आईला घट्ट पकडून. आभा झोपल्यावर निकीता निहीराच्या खोलीत आली. आणि निहीरा रडायला लागली. तिने आभा च्या बाबतीत काय काय घडले असावे हे निकीताला सांगितले. शिवाय डॉ. शुभांच्या विषयी पण सांगितले. त्यावर ती निहीरावर खूप रागवली. आकाश कधीही असे वागणार नाही ह्याची तिला पक्की खात्री होती. पण तरीही ती डॉ. कडे जायला तयार झाली.

दुसऱ्या दिवशी सगळे डॉ. कडे गेले. आकाशला काहीच माहिती नव्हते, त्यामुळे तो निवांत होता. पहिल्यांदा डॉ. शुभाने सगळ्यांशी गप्पा मारल्या मग आकाशला घेऊन त्या आतल्या रूममध्ये गेल्या आणि त्याच्याशी गप्पा आणि हळूहळू त्याच्याकडून सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या. " तू आता तेरा वर्षांचा म्हणजे आठवीत ना? डाॅ. शुभाने विचारले.
"हो. आठवीत. " आकाश.
" मग तुझे मित्र कसे आहेत? ते पण आठवीतलेच का? " डॉ. शुभा.
" काही आठवीतलेच, पण थोडे मोठे दहावीतले पण आहेत. " आकाश.
"मग मधल्या सुट्टीत तुम्ही काय करता? " डॉ. शुभा.
" कधी कधी खेळतो पण जास्त मोबाईल बघतो. माझे दहावीतले मित्र आहेत, त्यांच्याकडे असतो मोबाईल. "आकाश.
" मग काय बघता तुम्ही मोबाईल वर? " डाॅ. शुभा.
" अरे सांग ना, मी नाही सांगणार कुणाला काही. " असे म्हणत डाॅ. शुभांनी त्याच्या खांद्यावर मैत्रीचा हात ठेवला.
" फार काही नाही, पण काही मोठी माणसे कधी कधी खेळतात ते बघतो. " आकाश.
" हो? कोणता खेळ रे? काय म्हणतात त्याला? " डॉ. शुभा.
" डॉक्टर डाॅक्टर, ममी पप्पा पण कधी कधी रात्री मी झोपल्यावर खेळतात तसला गेम. मी बघितले आहे खूप वेळा. " आकाश.
" हो? आणि कुठे बघितला आहेस? " डॉ. शुभा.
"एकदा आत्या काकांना पण खेळताना पाहिला आहे. आणि दहावीतले रोहन त्याच्या मित्रांना एकदा सांगत होता, तो पण खेळतो त्याच्या एका मैत्रिणी बरोबर. खूप मजा येते म्हणे. " आकाश.
" मग तू कुणाबरोबर खेळलास असा गेम? डाॅ. शुभा.
" … … … . " आकाशची मान खाली गेली होती.
" सांग ना. " डॉ. शुभा.
" एकदाच खेळलो होतो. पण… … " आकाश.
"पण ती खूप रडायला लागली. आमची छान मैत्री तुटली. " आकाश.
"कुणाबरोबर खेळलास? " डाॅ. शुभा.
"ती आभा आहे ना, माझी मावस बहीण. तिच्याबरोबर" आकाश.
"अरे, पण ती खूप लहान आहे आणि तू देखील खूप लहान आहेस, हो की नाही? हे असे खेळ लहानपणी खेळायचे नसतातच मुळी. आपण खूप मोठे झालो, अभ्यास करून खूप शिकलो, काहीतरी खूप चांगले केले ना की मग हे असे खेळायचे असतात. आई बाबा, आत्याकाका ही सगळी मोठी माणसे आहेत. ती छान शिकली आहेत. ते छान नोकरी करत आहेत. हो की नाही? छोट्या मुलांनी पण खेळ खेळायचे पण कोणते माहिती आहे? मैदानी खेळ, लंगडी पळती, खो खो, तुमचा आवडता क्रिकेट. समजले का? " डाॅ. शुभा.
आकाशची मान खाली होती. तो मानाने हो म्हणाला. आणि हळूच त्याने डोळे पुसले. " माझी बहीण आता माझ्या बरोबर कधीच बोलणार नाही? " त्याने विचारले.
" हे बघ, एकतर असे खेळ लहान मुलांनी खेळायचे नाहीत आणि लहान, छोट्या मुलींबरोबर तर नक्कीच नाही. तू अजून थोडा मोठा झालास की तुला कळेल. पण आत्ता ह्या डाॅ. मैत्रिणीचे ऐकणार ना? आत्ता फक्त अभ्यास करायचा आणि मैदानावर जायचे खेळायला. मित्रांबरोबर ते पण तुझ्याबरोबरच्या. चालेल ना? "डाॅ.शुभा.

बाहेर टिव्हीवर आभा सोडून सगळे हे पहात होते. निहीरा आणि निकीता दोघी रडत होत्या. निखिल मान खाली घालून बसला होता. शुभा एकटीच बाहेर आली, येताना आकाशला वाचायला एक पुस्तक देऊन.

" कळत नकळत मुलांच्या चुकीच्या वागणुकीसाठी आईवडील देखील जबाबदार असतात. म्हणजे चुकीचे वागा असे जरी ते सांगत नसले, तरी आईवडील जे करतात ते करण्याची मुलांची नैसर्गिक प्रवृत्ती असते. त्यात आजकालचे वाढत चाललेले मोबाईल आणि नेट. त्यातील काय चांगले काय वाईट हे कळत नसले तरी ते केले जाते. आकाशला स्वतःला देखील ह्यातले फारसे काही कळत नाही, तो ही लहान आहे. मला वाटते निकीता तुम्ही त्याला समजून घ्यायला हवे. ह्या वयात मुलांची मैत्रीण होऊन त्यांना समजून घेणे आवश्यक असते. तुम्ही कोणीच त्याला रागवू नका. त्यानी गुन्हा केला नाहीये, त्याच्या हातून चूक झाली आहे. त्याला त्या मित्रापासून गोडीगुलाबीने दूर करा. त्याला मैदानावर जाऊन खेळायला प्रोत्साहन द्या. मला खात्री आहे. तो परत असे वागणार नाही. आणि निखिल, तूही डोक्यात राग ठेऊन वागू नकोस. शांत रहा. आपले दिवसही आठव. आभाची काळजी अजिबात करू नकोस. ती लवकर पुर्वी सारखी हसायला लागेल.
एक लक्षात घ्या जन्मतः कोणीच गुन्हेगार नसतो, आपल्या आजूबाजूची परिस्थिती त्याला गुन्हेगार बनवते. " डॉ. शुभा.
"तुमचे खूप उपकार आहेत डाॅ. मी काय चुकले ते समजले मला. " निकीता हात जोडून म्हणत होती.
निहीरा रहत होती, पण निकीताच्या हातावर हात ठेवून तिला धीर देत होती.

समाप्त

©️®️ सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज

🎭 Series Post

View all