बाल गुन्हेगारी (कथा २) सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे

बाल गुन्हेगारी
बाल गुन्हेगारी
(कथा २ ) सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे


आकाश आणि आभाची गोष्ट निहीरा आणि निकीताला समजली, पण दोघींनी डॉ. शुभांशी बोलून त्यांना दोघांना समुपदेशन करण्याचा निर्णय घेतला. निकीताला आकाशसाठी तिच्या गावातील समुपदेशक डॉ. नी सुचवला, तर आभा नियमित डॉ. शुभा कडे समुपदेशन करण्यासाठी येत होती. डॉ. शुभा तिला निरनिराळ्या गोष्टी सांगून तिचे समुपदेशन करीत होती. चांगल्या वाईटाची जाण तिच्यामध्ये निर्माण करीत होती.

“ तुला माहिती आहे डॉल, तुझा बाबा आणि मी एकाच शाळेत होतो. तुझा बाबा फार मस्ती करायचा, सारखा तक्रारी करायचा. पण खूप हुशार होता.” डाॅ. शुभा सांगत होती. “ आणि मनाने पण खूप चांगला, कोणी पडले, कुणाला लागले तर हा पटकन जाऊन त्याला मदत करायचा. तू पण तुझ्या बाबाची परी आहेस ना? “ डॉ. शुभा.
“हो, बाबा मला परीच म्हणतो, माझे खूप लाड करतो. “ आभारी उत्साहाने बोलत होती. तिच्यात हळूहळू फरक पडायला लागला होता. डॉ. शुभा दरवेळी तिला तिच्या आईबाबांबद्दल चांगले सांगत होती. आणि निरनिराळ्या गोष्टी सांगत होती.

“मावशी, आज कोणती गोष्ट सांगणार आहेस? “ आभाने विचारले.
“ आज ना एका मुलाची आणि त्याच्या आईची. एक मुलगा होता. त्याचे नाव सुनील. तो तिसरीत शिकत होता. साध्या छोट्या घरातला, त्याची आई फार शिकलेली नव्हती. आणि बाबा दूरच्या गावी कामाला होते. ते कधीतरी घरी येत असतं. त्याची आई त्याला रोज अभ्यासाला बसवत असे. एकदा अभ्यास घेताना सुनीलच्या आईला त्या कंपास बाॅक्समधे एक नवीन पेन्सिल मिळाली. “ कुणी दिली रे ही पेन्सिल. पेन्सिलच्या मागे रबर पण आहे. छान आहे. “ तिने विचारले.
“दिली नाही, मीच घेतली. त्या रम्या ची. “ सुनील म्हणाला.
“बरं असू दे. “ त्याची आई म्हणाली आणि तिने ती पेन्सिल बाजूला ठेवून दिली. एक दोन वेळा असे घडले, पण त्याची आई त्याला काही बोलली नाही, रागवली नाही. असे मग सारखेच व्हायला लागले. सुनील त्याच्या वर्गातल्या कुणाच्याही वस्तू उचलून घरी घेऊन येऊ लागला. तो आता पुढच्या वर्गात गेला होता. त्याच्या बरोबर बाकीची मुले पण पुढच्या वर्गात गेली मोठी झाली. एकदा त्याच्या वर्गातल्या एका मुलानी शिक्षकांकडे तक्रार केली. “ सर, ह्या सुनीलने न विचारता माझी नवीन कोरी पट्टी घेतली आणि आता परत देत नाहीये. सर सुनीलला राहिले आणि विचारले, “ कुठे आहे ह्याची पट्टी? “
“ मला नाही माहिती? “ सुनीलने उत्तर दिले.
“ तू घेतलीस ना? मग तुला कसे माहिती नाही? “ सरांनी जरा जोरात विचारले.
“ काल मी घेतली होती सर. पण आज ती नाहीये माझ्याकडे. हवतरं बघा माझ्या दप्तरात. “ सुनीलने बेदरकारपणे उत्तर दिले. आणि ते प्रकरण तिथेच थांबले. पण सुनीलच्या मनात त्या मुलाविषयी राग राहिला. जे झाले त्याचा परिणाम फारसा चांगला झाला नाही. जसजसा मोठा होईल तसा तसा सुनीलचा उद्दामपणा, बेदरकारपणे वागणे आणि चोरीची सवय वाढत गेली. जे त्याची तक्रार करीत त्यांना मारण्यापर्यंत त्याची मजल गेली. मधील काळात त्याचे वडील कायमचे घरी आले. सकाळी लवकर कामावर जाऊन रात्रीच त्याचे वडील घरी येत. सुनीलची लहान भावंडे वडील यांच्याकडे बघता बघता त्याच्या आईचे सुनीलकडे पूर्ण दुर्लक्ष झाले.

दहावीच्या वर्गात असताना त्याने शिक्षकांच्या पर्स मधून फीचे जमा झालेले पैसे चोरले. त्या शिक्षकाने मुख्याध्यापक सरांकडे तक्रार केली. त्याच्या आईवडिलांना शाळेत बोलवण्यात आले. दोघे आले तेव्हा तो मुख्याध्यापकांच्या खोली बाहेर उभा होता. मुख्याध्यापक सरांच्या खोलीत गेल्यावर त्यांनी त्याला खूप समजावले आणि त्याच्या आईवडिलांना विचारले, “ तुम्हाला माहित आहे का, हा केव्हापासून असे गैरवर्तन करतो आहे? ह्याला ही सवय कशी आणि कधीपासून लागली आहे? “
“नाही, आधी मी इथे नव्हतो आणि आता असलो तरी दिवसभर कामासाठी बाहेर असतो. त्याची आईपण कामात असते. आमच्या लक्षात नाही आले हा कधीपासून ह्याला अशी सवय लागली. “ त्याचे वडील म्हणाले.
“खरतरं ह्याआधी पण त्याच्याविषयी अनेक तक्रारी आल्या आहेत, पण किरकोळ समजून आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले. आता ह्याची मजल शिक्षकांच्या पर्समधील पैसे चोरण्यापर्यंत गेली, त्यामुळे तुम्हाला शाळेत बोलवावे लागले. त्याला लहानपणापासून बरोबरच्या मुलांच्या पेन्सिल पट्टी अशा वस्तू घ्यायची सवय आहे. “ मुख्याध्यापक म्हणाले व त्याला शिक्षकेनी ही दुजोरा दिला. त्या म्हणाल्या, “ याआधी खूप मुलांनी त्याच्या विषयी तक्रार केली आहे. हे चांगले आहे का? हा वर्गातल्या मुलांवर दादागिरी करून त्यांच्या वस्तू काढून घेतो आणि परत देत नाही. “
हे सगळे ऐकून त्याच्या वडीलांनी त्याला तिथेच मारायला सुरुवात केली. कसेतरी मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी प्रकरण मिटवले. त्याच्याकडून जेवढे शिल्लक होते तेवढे चोरलेले पैसे काढून घेतले आणि उरलेले पैसे त्याच्या वडिलांकडून घेतले.

गोष्ट सांगता सांगता मधेच डॉ. शुभांनी आभाला विचारले. “ सांग बरं, सुनील चुकीचे वागत होता की बरोबर? “
“ अजिबात बरोबर वागत नव्हता. आई बाबा मला नेहमी सांगतात ‘दुसऱ्या कुणाची वस्तू कधीही घेऊ नये.’ “ आभा पटकन उत्तरली.
“पण मावशी फी चे पैसे तर बॅंकेत भरतात ना? मग टीचरकडे कसे? आभाने निरागस प्रश्न विचारला.
“ अग पुर्वी सगळे पैसे शिक्षकांकडेच भरत असत. फीचे पैसे, परीक्षेचे पैसै सगळे पैसै शिक्षकांजवळच जमा केले जायचे. पण त्यामुळे शिक्षकांवर ही खूप जबाबदारी असायची. “ डाॅ. शुभा म्हणाल्या.
“निकीता, मला सांग ‘ सुनीलच्या आईचे कुठे चुकले? “ डॉ. शुभांनी निकीताला विचारले.

“ जेव्हा पहिल्यांदा सुनीलने दुसऱ्या कुणाची वस्तू पेन्सिल घरी आणली तेव्हाच तिने सुनीलला दुसऱ्या कुणाची वस्तू घेणे कसे चुकीचे आहे हे समजावून सांगायला हवे होते. त्याला रागावून ज्याची वस्तू त्याने आणली होती त्याला ती परत करायला लावायला हवी होती. तेव्हाच जर सुनीलच्या आईने हे केले असते तर त्याला अशी सवय लागली नसती. उलट पेन्सिल छान आहे म्हणून तिने ती बाजूला ठेवून घेतल्यामुळे आपण काही चुकलो आहोत हेच त्याला कळाले नाही. आणि नंतरही तिने कधी त्याच्याकडे लक्ष दिले नाही.“ निकीताने उत्तर दिले.
“अगदी बरोबर. जेव्हा लहान मुलांच्या हातून अशी काही गोष्ट घडते तेव्हा लगेचच त्यांना ते चुकले आहेत हे सांगणे गरजेचे असते. वेळोवेळी मुलांना काय चूक काय बरोबर आहे हे सांगत राहिले तर ते चुकीचे वागत नाहीत. नाहीतर त्यांची अवस्था सुनील सारखी होते. जशी त्याच्या आईने चूक केली तशीच शिक्षकांनी ही दुर्लक्ष करून चूक केली. त्याच्याविरुद्ध पहिली तक्रार आली तेव्हाच शिक्षकांनी त्याला गोडीगुलाबीने समजावून त्याचीही सवय सोडवायचा प्रयत्न करायला हवा होता. पण आता उशीर झाला होता. त्याला जी चोरीची सवय लागली ती कायमची. आणि त्यामुळे त्याचे आयुष्य वाया गेले. तो शाळेत व बाहेर ही चोर म्हणूनच ओळखला जाऊ लागला. म्हणून बरं का डाॅल मोठ्या माणसांचे ऐकायचे. मोठी माणसे नेहमी आपल्याला चांगले शिकवतात. शिक्षक सुद्धा आपल्याला रागवतात ते आपल्या चांगल्यासाठी. समजले ना? “ डॉ.शुभांनी आभाला विचारले. आभाही मान होकारार्थी हलवली आणि त्यांच्याकडे पाहून छान हसली.

“चला आता परत कधी येणार मावशीला भेटायला? “ डॉ. शुभा.

“नेहमी प्रमाणे, गुरूवारी. “ आभा हसत हसत डॉ.मावशीला टाटा करून आईकडे गेली.

समाप्त

©️®️ सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज


🎭 Series Post

View all