Login

चिंब भिजलेले भाग 1

चिंब भिजलेले


राज्यस्तरीय करंडक कथामालिका फेरी
विषय:- प्रेम कथा
कवितेचे नाव:- चिंब भिजलेले भाग १

"खूप छान... खरतरं तुझ्या या सुंदर लिखाणामुळेचं प्रेमात पडलो मी तुझ्या." तो

ती नजर झुकवून फक्त गोड हसली आणि तो पुन्हा तिच्या गालावरच्या खळीत हरवला.


चार वर्षांपूर्वी......
******************


"अगं मधु.... तू एवढं छान लिहितेस मग एखाद्या प्लॅटफॉर्म वर लिही की. असही तू दिवसभर घरातली कामं आवरून बसलेलीचं असतेस आणि त्यातचं या कथा लिहितेस मग याच कथा कथामालिका म्हणून एखाद्या वेबसाईटवर पोस्ट करत जा ना." ऐश्वर्या मधु ची मैत्रीण...


"काहीतरी काय? आणि माझ्या या कथा तुला आवडतात वाचायला म्हणून सगळयांना आवडतील अस नाही ना!" मधु बोलली.


"अगं पण कथा वाचणारे किंवा ज्यांना वाचायला आवडत अशी माणसं आहेतच की ज्यांना आवडेल ते वाचतीलचं की तुला." ऐश्वर्या बोलली.


"हो मान्य आहे पण यांना नाही आवडत. "मधु तोंड पाडून बोलली.


"तुझ्या त्यांना तर तू ही आवडत नाहीस." ऐश्वर्या बोलली.

ऐश्वर्याच्या बोलण्यावर मधूच्या डोळ्यात पाणी आलं.


"मधु... अगं बास झालं आता. किती झुरशील अजून? तो नाही तर नाही...निदान तू तरी स्वतःला महत्व दे. तुझ्या समोर तो दुसरी बाई घरात आणतो तरी तू गप्प कशी गं? तुझा हक्क माग आणि नसेल मिळत तर हिसकावून घे." ऐश्वर्या बोलली.


"प्रेम,हक्क,अधिकार या गोष्टी हिसकावून आपल्या झाल्या असत्या तर सगळ्यांनी तेच केलं असतं. मला हिसकावून आणि बळजबरीने काही नको. हिसकावलेलं सुख फार काळ नाही टिकत अगं!" मधु बोलली.



"धन्य आहेस तू. तुझ्या समोर बोलून मीच चुकी केली. तू तर त्यागाचा महान पुतळाचं आहेस.. हे विसरले बघ मी. "ऐश्वर्या दोन्ही हात कोपरापासून जोडून बोलत होती.


मधु मात्र हसली आणि तिच्या इतर कामाला निघूनही गेली पण ऐश्वर्याचं मन काही लागेना. तिने मधूच्या नकळत तिचे लेख दुसऱ्या नावाने पाठवायचे असं ठरवलं.


दुसऱ्याच दिवशी ती पुन्हा आली. नेहमीसारखा तिचा नवरा त्या दुसऱ्या बाईसोबत नाश्ता करत होता आणि त्या दोघांना वाढणारे हात मधूचे ते बघून तर तिला खूपच राग आला पण आपली मैत्रीणचं अशी त्याला आपण काय करणार म्हणून ती काही न बोलता तडक मधूच्या खोलीत निघून गेली.


"मला माहित आहे तू आता काय बोलणार आहेस ते? पण मला त्या विषयावर बोलायच नाही आता.."


"नाहीच बोलणार आणि मी पण... तुला नवऱ्याने आणलेली ती बाई सहन होते ना मग मी कोण बोलणारी?" ऐश्वर्या चिडून मान दुसरीकडे फिरवत बोलली.


बरं.... चल तुला पण चहा आणला आहे तो घे,तोवर मी कपडे वाळत घालून येते. अस म्हणत मधु चहा चा ट्रे टीपॉय वर ठेऊन निघून गेली.


ऐश्वर्याला आयती संधीच भेटली होती. तिने लगेच मधुचं कपाट शोधायला सुरुवात केली. जवळ जवळ वीसेक मिनिटांनंतर तिला कपड्यांच्या खाली लपवलेली वही सापडली....ज्यात ती कथा लिहून ठेवायची.


अगं, अजून चहा घेतला नाहीस का? काय गं तू पण? आणि पाठीमागे काय लपवतेस? मधु साशंक नजरेने ऐश्वर्याकडे बघतच विचारते.


अंम....कुठे काय? काय नाय? ती खांदे उडवत बोलते.


काय नाय? मग हात का लपवला आहेस पाठीमागे? बघू दाखव मला....मधु पुढे सरसावत बोलते.


ऐश्वर्या पाठूनच कसबस जीन्स च्या कमरेमध्ये वही घुसवते आणि त्यावर मधूला कळणार नाही अश्याप्रकारे टीशर्ट खाली ओढते.


बघू तुझे दोन्ही हात..


ऐश्वर्या लगेच दोन्ही हात पुढे करते. हे बघ काहीच नाही ना? सांगते तुला तरी तू काय ऐकणार नाही. ऐश्वर्या नाक मुरडतचं बोलते.


मग हात का पाठी लपवत होतीस?


आता मी हात पाठी पण घेऊ नये का?


अगं घे माझे आईशी पण चिडू नको बाई... मधु दोन्ही हात जोडून कपाळावर नेत बोलली. आणि माघारी फिरून चहा चा ट्रे उचलून पुन्हा तो गरम करायला घेऊन गेली.


मधूला गेलेली बघितल्यावर ऐश्वर्याने पण काढता पाय घेतला आणि निघता निघता दारातूनच ओरडली.


मधु....माझी अर्जंट मिटिंग आहे गं... मी जाते गं...बाय...
ऐश्वर्या जवळ जवळ ओरडतचं बोलून निघून पण गेली मधूच्या नवऱ्याने एक तीक्ष्ण कटाक्ष मधु कडे टाकला पण मधू बघून न बघितल्यासारखी पुन्हा स्वयंपाक घरात निघून गेली.
ही मुलगी पण ना....कसं व्हायच हीच देव जाणो? मधु किचनमध्ये स्वतःशीच पुटपुटत हसत होती.


दुपारची सगळी काम आवरून मधु जरा वेळ मोबाईल घेऊन बसली. फेसबुक उघडला आणि बलात्काराची बातमी वाचून ती एकदम थक्कचं झाली कारण तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणारा नराधम तिचा बापच होता. बातमी वाचून तिच्या मनात कालवाकालव झाली. तिने मोबाईल चार्जिंगला लावला आणि कपाट उघडलं.

अरे... इथेच तर ठेवली होती कुठे गेली? ती बराच वेळ डोक्यावर जोर देऊन विचार करत होती आपली लिखाणाची वही कुठे ठेवली याचा पण खूप शोधली संपूर्ण कपाट धुंडाळून काढलं पण वही काही सापडली नाही. तिला खूप लिहायचं होतं मन अगदी बैचेन झालं होत. शेवटी ती उठली आणि पुन्हा किचनमध्ये गेली उगाच कुठे तरी स्वतःला गुंतवाव म्हणून मांडणीवरची भांडी आणि डब्बे घासायला काढले पण मन मात्र अजूनही वही कुठे बरं गेली असेल याचा शोध घेत होत.


प्रथमेश.. ऐश्वर्या बोलते. अर्जंट भेटायचं आहे तुला. कुठे भेटू सांग?


ऑफिसजवळ कॉफी शॉप आहे तिथे भेट. प्रथमेश


ओके! अर्ध्या तासात पोचते.

************

काय गं एवढ्या गडबडीत बोलावलं?


ही घे.... माझ्या मैत्रिणीची वही.... वेळ मिळेल तेंव्हा वाच आणि मग फोन कर... चल बाय..


अगं कॉफी तर घे!


नाही नको... ऑफिसमध्ये महत्वाचं काम आहे या वही विषयी... तू वाच आणि मला फोन कर...
एवढ्या शांत कॉफी शॉप मध्ये ओरडून ओरडून बोलणाऱ्या ऐश्वर्याकडे सगळे जण विचित्र नजरेने बघत होते आणि प्रथमेश त्या सगळ्यांना. काही सेकंदात सगळ्या नजरा प्रथमेश वर खिळल्या तसा तो तिथून खाली मान टाकून निघून गेला.

ही मुलगी पण ना....भयंकर तुफान आहे. उजव्या हातात पकडलेली वही डाव्या हाताच्या तळहातावर मारत तो स्वतःशीच पुटपुटला.

दिवसभर कामाच्या व्यापात नजरेआड झालेली वही ऑफिसमधून निघतांना न चुकता त्याने बॅग मध्ये भरली. संध्याकाळी घरी जाऊन तो फ्रेश झाला आणि मस्त पैकी मटण थाली ऑर्डर करून ऐश्वर्याने दिलेली वही चाळतं बसला. एक एक पान वाचून नकळत त्याचे डोळे पाणावले. त्याने ती बाजूला ठेवली आणि ऐश्वर्याला फोन केला.


हा बोल रे.....कसं वाटलं वाचून?तिने डायरेक्ट प्रश्न विचारला.


तुला कसं माहीत मी त्यासाठीच फोन केला आहे ते?


कारण मधुचं लिखाणचं असं आहे की, माणूस त्याचाही नकळत वाचनात कधी हरवतो हे त्याचं त्याला नाही कळत.


खूपच मस्त. मी फक्त तीन चार पेजचं उलगडले आहेत... पण मला सांग तू ही वही मला का दिली?


मला त्यातल्या सगळ्या कथा तुझ्या साईटवर टाकायच्या आहेत. लेखिकेच्या नावासहित....


ठीक आहे. वही खूप मोठी आहे. मला आठ दिवस दे. माझ्या माणसाशी बोलून घेतो. आपलं काम होईल .


थँक्स यार.... ए चल बाय, मला मधु चा फोन येतोय...
तिने तो बाय बोलण्याआधीचं फोन कट केला.


येस डार्लिंग....


डार्लिंग बिर्लिंग जाऊदे... तू सकाळी माझी वही पाहिलीस का कुठे?


नाही गं....


बरं ठिके.... ठेवते फोन. जरा नाराजीतच मधु बोलली आणि फोन ठेवला.


क्रमशः.....