वादविवाद स्पर्धा
विषय- चित्रपट तरुणांवर वाईट प्रभाव पाडतो का ?
टीम - सोलापूर..
चित्रपटांचा तरुणांवर काहीही वाईट परिणाम होत नाही असेच मला वाटते. समाज हाच तरुणांवर जास्तीत जास्त परिणाम करत असतो. कुटुंबातील वातावरण तसेच आजूबाजूचा परिसर आणि त्या व्यक्तीमध्ये असणारे उपजत गुण हेच त्या व्यक्तीच्या तारुण्यावर जास्तीत जास्त परिणाम करत असतात. घरातील संस्कार मुलांना वाईट प्रवृत्ती पासून परावृत्त करू शकतात. चित्रपटात दाखवतात म्हणून अगदी चित्रपटातील नायक किंवा नायिकेप्रमाणे कपडे घालणारे तरुण अगदी बोटावर मोजण्याइतकेच असतात मग आपण चित्रपटाला दोष द्यायचा का?
स्त्रियांवर होणारे अत्याचार, त्यांच्या अब्रूंचे निघणारे दिंडोळे चित्रपटात दाखवल्यामुळे मुळीच होत नाहीत. चित्रपटांपूर्वीही प्रभू श्रीरामांच्या सीतामाईला रावणाने दुष्ट हेतूने पळवून नेऊन लंकेत ठेवलेच होते. पूर्वीपासून अगदी मोघलांच्या काळापासून स्त्रियांवर अत्याचार झाले त्यासाठी शिवाजी महाराजांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. आताही चित्रपटांना दोष देण्याऐवजी आपणच माणसांमध्ये दडलेल्या राक्षसी प्रवृत्तीला आळा घालण्याचे काम करायला हवे.
"बाजीगर" चित्रपटात जरी सुरुवातीला खलनायक वाईट प्रवृत्ती असूनही जिंकलेला दाखवला गेला असला तरी शेवट हा गोड दाखवला गेला नाही चित्रपटातही वाईट कृत्य करणाऱ्याचा शेवट हा वाईटच असतो मग तरुणांवर चित्रपटाचा परिणाम झाला असता तर देशद्रोही, खुनी आणि दरोडेखोरांना आळा बसला असता ना?
"माहेरची साडी" या चित्रपटात सावत्र बहिण भावाचे निर्मळ नाते दाखवले गेले असले तरी किती तरुण मुलांनी आपल्या सावत्र बहिणीवर मनातून प्रेम केले? नाही.
चित्रपट नेहमी सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत असतात ते समाजात घडलेल्या घटना दाखवतात. समाजात घडलेल्या घटनांचे प्रतिबिंब चित्रपटात दाखवले जाते. देशभक्तीपर चित्रपट पाहून किती तरुणांनी देशभक्तीचा वसा पुढे चालवला ? ज्याची जशी प्रवृत्ती असते तसे आणि तेवढेच तो चित्रपटातून गृहण करतो.
त्यामुळे चित्रपटांना दोष देण्याऐवजी समाजात बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. याची सुरुवात कुटुंबापासून करायला हवी. मुलांना चांगले संस्कार करताना त्यांना एकमेकांवर प्रेम करण्याची, समता, बंधुता आणि न्यायाची शिकवण द्यावी. सर्वधर्म समभाव आणि चांगले काय?आणि वाईट काय? हे लहानपणापासून मनावर कोरले गेले तर ते चांगला माणूस बनून घरासोबत समाजाच्या विकासात नक्की हातभार लावतील. त्यामुळे चित्रपटांतील पात्रांना दोष देण्याऐवजी आपण उद्याचे भविष्य घडवणाऱ्या या मातीचे गोळे असणाऱ्या बालकांना योग्य संस्काराने आकार दिला तर उद्याचा समाजाचा आधारस्तंभ असणारा तरुण निश्चित सन्मार्ग अवलंबून ध्येयवादी बनेल असे मला वाटते.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा