चिऊची भाजी
चिऊ म्हणजेच चिघळची भाजी. आम्ही लहान असताना आमच्या मामी ही भाजी करायच्या. आम्ही त्याला चिऊची भाजी म्हणायचो कारण तिची पाने खूप छोटी छोटी असतात. गंमत म्हणून आम्ही त्या भाजीला चिऊ म्हणायचो. ही भाजी अगदी छोट्या छोट्या पानांची वेली सारखी असते. त्याच्या लांब लाल काड्या काढून आणि मूळ काढून ही भाजी निवडायची.
साहित्य : चिऊची भाजी पावकीलो, बेसन पीठ एक मोठी वाटी, जिरे मोहरी, लाल तिखट, हळद, मीठ, दोन तीन कांदे बारीक चिरलेले, भरपूर लसूण ठेचून घेतलेला आणि तेल.
कृती : १) सगळ्यात पहिले भाजी निवडून ती बारीक चिरून घ्यायची आणि स्वच्छ धुवून घ्यायची.
२) गॅस वरती कढईमध्ये चार पळ्या तेल घालून त्यात मोहरी जिरे घालून तडतडू देणे.
३) आता बारीक चिरलेला कांदा तेलात परतवायला घालणे. सोबत लसूण पण घालायचा ठेचलेला.
४) कांदा चांगला परतवून झाला की त्यात लाल तिखट हळद मीठ हे सर्व घालून चांगले एकत्र करून घेणे.
५) आता ह्यामध्ये स्वच्छ धुवून ठेवलेली भाजी घालणे.
६) भाजीला झाकण ठेवून वाफेवर चांगले शिजवणे.
७) भाजी पाच मिनिटं चांगली शिजल्यावर त्यात डाळीचं पीठ घालायचं. पीठ थोडं थोडं घालायचं म्हणजे भाजीत बसेल इतकचं पीठ घालायचं.
८) भाजीत पीठ घातल्यावर त्याला झाकण लावून शिजवणे. तेल कमी वाटले तर त्यात बाजूने थोडे थोडे तेल सोडणे म्हणजे भाजी खाली लागणार नाही.
९) थोडा थोडा वेळाने भाजी हलवत राहणे जेणेकरून त्यात घातलेले पीठ सगळ्या बाजूने व्यवस्थित शिजेल.
१०) पाच दहा मिनिट झाकण लावून शिजवल्यावर थोडंसं खाऊन बघणे म्हणजे भाजी व्यवस्थित शिजलेली असेल तर तोंडात चिकटणार नाही.
११) भाजी शिजल्यावर पोळी बरोबर खाऊ शकता किंवा मग नुसतीच खाल्ली तरी छान लागते.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा