Login

चाॅकलेट

The kid was in balcony
चाॅकलेट

      *चाॅकलेट*

नेहमीप्रमाणे तन्मयने घराच्या बाल्कनीची काच उघडली. मागून बायकोचा किर्तीचा जड  आवाज आला, "अहो..! काही दिवस नका जाऊ बाल्कनीत.. सारखी तिची आठवण येईल तुम्हाला. काही चुक नसताना या कोरोनाने त्या पिल्लाचा बळी घेतला." आणि पदराचे टोक डोळ्याला लावून ती आतल्या खोलीत गेली. आणि त्याच्या डोळ्यासमोर तिचे रूप उभे राहीले. स्वतःच्या बाल्कनीत उभे राहून तो समोरच्या विंगमधील चिमुकल्या लहान मुलीला *बाय* करायचा. रूही नावाची.  नावाप्रमााणेे अगदी गोड आणि गोंंडस.. ती पण बहाद्दर त्याला बाय करायची. काका खाली भेटलास की मला चाॅकलेट दे बरं.. आणि ते कुंडीतलं पिंक कलरचं फुलं.. देशील ना?? असे बोलायची. तो ही बोलायचा हा कोरोना जाऊ दे तुला रोज एक चाॅकलेट देईल पंधरा दिवस... आणि ती खुदकन हसत तिच्या बाहुलीसोबत खेळायची.  पण हा कोरोना त्याची आणि तिची भेट काही होऊ देत नव्हता. एके दिवशी तिच्या घरातले सगळे कोरोना पाॅझिटीव आलेत. साधारण चार- पाच वर्षांचं लेकरूच ते..! नाही झगडू शकलं त्या राक्षसरूपी आजाराशी...! समोर ते काचा बंद असलेलं घर आणि धुळ खात पडलेली इवलीशी बाहुली त्याला दिसत होती.
  पुढल्या दिवशी सकाळी लवकरच तो वाणसामान आणण्यासाठी बाहेर पडला. तिथेच शेजारी एक चिमुरडी मुलगी तिच्या तान्ह्या भावंडाला सांभाळत होती. याने आपसुक विचारले, "काय गं आई कुठं तुझी..?" त्यावर ती बोलली, "आये गेली तिथंशी.. खायला आणाले.. माले अन् छोटीले भूक लागली म्हणूनशीन..." तिचं बोलणं ऐकून त्याने थोडेसे बिस्कीट पुडे आणि चाॅकलेट विकत घेतले आणि त्या दोन्ही चिमुकल्या मुलांना दिले. आता त्याने ठरवले की जसं जमेल तसं काही दिवस तो त्या चिमुरडीला चाॅकलेट विकत घेऊन देणार... आणि त्याने बील भरून स्वतःचे वाणसामान हातात घेतले आणि घराची वाट धरली.
~ऋचा निलिमा