चोराची फजिती (Tenali Rama Story In Marathi)

Tenali Rama chya Goshti
चोराची फजिती

कृष्णदेवराय हे विजयनगर राज्याचे राजा त्यांच्या दयाळू आणि न्यायप्रिय धोरणासाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या राज्यात कायम शांती नांदावी आणि कोणावरही अन्याय होऊ नये यासाठी ते कायम दक्ष असत. एके दिवशी असेच संध्याकाळच्या वेळी बंदीगृहाजवळ ते पाहाणी करायला गेले असता एका चोराने तीच संधी साधून राजाकडे क्षमायाचना केली.

“महाराज! मी आजवर बऱ्याच घरात दरोडे घालून चोऱ्या केल्या पण मला आता माझी चूक लक्षात आली आहे. मी पुन्हा असे काही करणार नाही. मला बेमालूमपणे घरात शिरता येण्याचे कसब आहे त्याचा वापर करून मी आपल्या राज्यातील सैनिकांची मदत करू इच्छितो. यामुळे नक्कीच चोर लवकर पकडले जातील.” तो चोर हात जोडून राजाला म्हणाला.

“ठीक आहे पण तुला यासाठी आधी एक परीक्षा द्यावी लागेल.” राजा कृष्णदेवराय म्हणाले.

“मंजूर महाराज. तुम्ही म्हणाल ती परीक्षा द्यायला मी तयार आहे.” चोर अगदी उतावीळपणे म्हणाला.

“तुला तेनाली रामाच्या घरी चोरी करून त्याच्या घरातील सर्व मौल्यवान ऐवज माझ्या समोर ठेवावे लागेल. जर तू यात सफल झालास तर मी तुला गुप्तचर म्हणून काम देईन.” महाराज म्हणाले.

“मान्य. मी तुम्हाला वचन देतो उद्याच तुमच्या समोर सर्व मौल्यवान ऐवज आणून ठेवेन.” चोर म्हणाला.

महाराजांनी लगेचच त्याला तुरुंगातून बाहेर काढले आणि तो चोर तेनाली रामाच्या घराच्या दिशेने निघाला. बाहेर पडल्यावर तो त्याच्या साथीदाराला भेटला आणि ते दोघे तेनाली रामाच्या घराबाहेर येताच अंगणातील झाडांच्या मागे लपून बसले. तेव्हा रात्रीचं जेवण आटोपून तेनाली रामा शतपावली करायला अंगणात आला होता आणि फिरता फिरता त्याला जाणवले की झुडुपात काहीतरी हालचाल होत आहे. तिथे चोर आहे हे त्याच्या लक्षात यायला जास्त वेळ लागला नाही. लगेचच तो स्वतः च्या घरात गेला आणि त्याने त्याच्या पत्नीला हाक मारून बाहेरच्या स्थितीची पूर्वकल्पना दिली आणि बोलू लागला;

“मी आज दोन चोरांना बंदिगृहातून पळून जाताना पाहिले आहे त्यामुळे आजची रात्र आपल्याला सांभाळून राहावे लागेल. बाहेर चोर मोकाट फिरत आहेत त्यामुळे घरातील सर्व मौल्यवान दागिने, सोने नाणे आणि सुवर्ण मुद्रा आपल्याला लपवून ठेवाव्या लागतील.” तो चोराला ऐकू जाईल अश्या आवाजात म्हणाला.

लगेचच त्याच्या पत्नीने सर्व मौल्यवान वस्तू तेनाली रामाच्या स्वाधीन केल्या. घराच्या बाहेरच्या भिंतीला कान लावून चोरांनी त्या दोघांमधील हे बोलणे ऐकले होते आणि ते तिथेच दबा धरून बसले होते. एवढ्यात त्यांनी तेनाली रामा आणि त्याच्या पत्नीला एक मोठी संदुक खेचत नेताना पाहिली आणि मागच्या विहिरीत काहीतरी पडल्याचा आवाज ऐकू आला. चोराला कळून चुकले की तेनाली रामाने विहिरीत सर्व ऐवज लपवला आहे.

सर्व काम झाल्यावर तेनाली रामा आणि त्याची पत्नी झोपायला गेले. चोर थोड्याच वेळात विहिरीपाशी गेले आणि त्या दोघांनी मिळून विहिरीतील पाणी उपसायला सुरुवात केली. साधारण पहाटेच्या सुमारास त्यांच्या हाती ती संदूक लागली आणि त्यांनी ती उघडून पाहिली तर त्यात दगड होते.

“काय मग लागले का ऐवज हाती?” तेनाली रामाने बाहेर येत आळस देत विचारले.

त्याच्या आवाजाने चोर घाबरले आणि पळून जाऊ लागले पण त्यांचे ते प्रयत्न अयशस्वी ठरले.

“धन्यवाद! तुमच्या मुळे आमची काल रात्री छान झोप झाली आणि माझे सकाळचे झाडांना पाणी घालण्याचे काम देखील झालेले आहे.” तेनाली रामा म्हणाला आणि पुन्हा त्या चोराला बंदिवासात टाकण्यात आले.

तात्पर्य:- आपल्याला जेवढे शक्य आहे तेवढेच बोलावे. आवाक्याबाहेर असणाऱ्या गोष्टी करण्याचे वचन देऊ नये.