Login

चूक कुणाची? भाग ३

Family Drama

चॅम्पियन्स ट्रॉफी - २०२५
जलदलेखन कथा

चूक कुणाची भाग ३

©® सौ.हेमा पाटील.

मागील भागात आपण पाहिले, विद्या संभ्रमात पडली आहे. माहेरचा प्रश्न सोडविण्यासाठी ती माहेरी नाशिकला निघाली आहे.

गाडीत बसल्यावर तिच्या डोक्यात विचारांचे चक्र सुरू झाले.
'आईमध्ये बदल झाला आहे का? आपल्या कधी लक्षात आले का?' याचा विचार करताना तिच्या लक्षात आले, 'आईचे झोपेचे चक्र बिघडले आहे. सहा महिन्यांपूर्वी ती जेव्हा आपल्याकडे आली होती, तेव्हा रात्रीची दोन वाजताच उठून आंघोळ करायची. आपण विचारले तर म्हणायची, झोपच लागत नाही तर काय करू?'

'तिला आतल्या आत काही काळजी कुरतडतेय का? की भविष्याची चिंता वाटतेय? पण ती तर कुणावर अवलंबून नाही. तिला पेन्शन आहे, घर तिच्या नावावर आहे. मग काय आहे नेमके?' विचार करून तिचे डोके फुटायची वेळ आली, पण कुठल्याही निष्कर्षाप्रत ती जाऊ शकली नाही.

घरी गेल्यावर तिचे यथोचित स्वागत झाले. आई मात्र अपराधी मुद्रेने शांत बसली होती. तिला आपल्याच घरात असे केविलवाणे होऊन वावरताना पाहून विद्याला गलबलून आले. त्यादिवशी चहापाणी झाले की, रश्मी तावातावाने हातवारे करून बोलू लागली,

"हे बघा, आईंनी हात पिरगाळला होता तर मला डाॅक्टरांनी गळ्यात बांधायला सांगितले आहे. याआधीही आईंनी मला एकदा ढकलून दिले होते, पण तेव्हा मी तुम्हाला सांगितले नव्हते. आता मात्र डोक्यावरून पाणी गेले. एकतर तुमच्या आईला समजवा नाही तर आईंना तुमच्याकडे घेऊन जा."

" माझ्याकडे का? तिचे स्वतःचे हक्काचे घर असताना ती माझ्याकडे का येईल? हं, तिची येण्याची इच्छा असेल तर मी तिला आनंदाने न्यायला तयार आहे."

" मग रोज उठून इथे वाद आणि भांडणे होतात ते चांगले आहे का?" रश्मी तणतणतच म्हणाली.

" आई भांडते? खरंच? तिला तिच्या जावांशी भांडताना मी कधी पाहिले नाही. आजवर तुझ्याशीही कधी भांडलेली मी पाहिले नाही. मग आता कशी काय भांडते याचेच मला नवल वाटतेय." विद्या म्हणाली.

" म्हणजे मी खोटं बोलतेय?" आता संवाद विसंवादाकडे निघालाय हे विद्याच्या लक्षात आले.

"समीरला येऊ दे. मग आपण बोलूया. तोपर्यंत मी जरा माझ्या मैत्रिणीला भेटून येते." असे म्हणत विद्याने बोलण्याला विराम दिला व ती चप्पल घालून बाहेर पडली. बाहेर पडताना तिने आईकडे एक कटाक्ष टाकला. तिच्या डोळ्यांत वेदना स्पष्ट दिसत होती.

नेमके काय झाले आहे तिला समजेना. बरं, कुणाला विचारावे? जवळच रहाणारे काका काकू पण अमेरिकेला गेलेत. तिला खाली गेल्यावर कामवाल्या मावशी भेटल्या. आईकडे बऱ्याच वर्षांपासून त्याच कामाला होत्या.

तिला पाहून त्या म्हणाल्या,

"कशी आहेस बाळा? कधी आलीस?"

"मगाशी आले. तुम्ही कशा आहात मावशी?"

"माझं काय, बरीच आहे. आईकडं जरा चक्कर मारत जा वरचेवर." मावशी म्हणाल्या.

" नोकरीमुळे सारखे येणे जमत नाही हो. घरातले व्याप पण असतात. रोज फोन करते मी तिला." विद्या म्हणाली.

" फोनवर बोलणं आणि आपल्या डोळ्यानं पहाणं यात खूप फरक हाय माझे बाय." या मावशीच्या बोलण्यामुळे विद्या विचारात पडली. 'मावशींना काय सुचवायचेय?' असे तिला वाटले.

क्रमशः
©® सौ.हेमा पाटील.

मावशींना काय सुचवायचे होते? काही वेगळे घडले होते का? हे जाणून घेण्यासाठी पुढील भागाकडे वळूया.


0

🎭 Series Post

View all