Login

चूक कुणाची? भाग ४

Family Drama

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
जलदलेखन कथा

चूक कुणाची? भाग ४

©® सौ.हेमा पाटील.

मागील भागात आपण पाहिले, विद्या नाशिकला माहेरी आली आहे. मावशी तिला जे काही बोलतात त्यामुळे ती विचारात पडली आहे. आता पुढे...

"मावशी जरा स्पष्ट बोलाल का? तुम्ही आईकडे बऱ्याच वर्षांपासून कामाला आहात. तिचा स्वभाव कसा आहे तुम्हाला माहित आहे. घरात वेगळे काही चाललेय का? आईसाठी म्हणून सांगा. तुमचे नाव कुठेही घेणार नाही मी. "

" इथं बाकड्यावर बसून बोलू. " असे मावशी म्हणाल्या. बागेच्या कोपऱ्यातील एका बाकड्यावर दोघी बसल्या.

"तुला माहित आहे का, इथं बिल्डिंग पाडून टाॅवर होणार आहे." मावशी म्हणाल्या.

" हो, मला समीर म्हणाला होता. त्याचा काय संबंध आईशी?" विद्याला काही कोडे उलगडेना.

" त्याचाच संबंध आहे. मी त्या पवारांकडे कामाला जाते ना, त्यांच्याकडे एकदा भिशी पार्टी होती. त्यांनी मला मदतीसाठी थांबवून घेतले होते. मी तिथं आहे हे रश्मीताईंना माहीत नव्हतं. त्यांची चर्चा मी या कानांनी ऐकली. त्यांनी ताईंशी गोड बोलून हे घर स्वतःच्या नावावर करून घेतलं आहे. ताईंना असं सांगितलं की, तुम्हाला हेलपाटे घालायला नको म्हणून हे करायचंय. तुमच्या आईंनी विश्वास ठेवला, आणि आता त्यांना आईची अडचण होतेय.

ताईंच्या मागं सारखी बडबड सुरु असते. ऐकवत नाही मला. ताईंनी एवढ्या वर्षात कधी सुनेला सासुरवास केला नाही, अन् रश्मीताई सगळ्यांना सांगतात की, या मला मारतात, भांडतात. ऐकवत नाही मला, पण तुमच्या आईसाठी म्हणून मी कामाला जाते. साहेबांच्या समोर असा देखावा करतात की साहेबांना वाटते, आईचेच चुकतेय. मग ते पण ताईंनाच बोलतात. बिचाऱ्या ताई गप गप झालेत. "

" पण आईच्या माघारी हे घर समीरचेच होणार आहे ना? मी थोडीच येणार आहे वाटणी मागायला? मग इतके उपद्व्याप कशासाठी केले असतील?" विद्या म्हणाली. ते खरेच होते. तिला माहेरून कसलीही अपेक्षा नव्हती.

"सासूची म्हातारपणी सेवा कुणी करायची? यासाठी केलंय हे. मला विचारा. आजवर किती मानसं बघितलेत." मावशी उद्गारल्या.

'समीर कसा काय तयार झाला?' असा प्रश्न तिला पडला.
ती मावशींना म्हणाली,

"धन्यवाद मावशी. तुमचे नाव मी कुठेही येऊ देणार नाही. आता बघते मी काय करायचे ते." दोघी तिथून उठल्या. विद्या तिच्या मैत्रिणीकडे लीनाकडे गेली. लीनासोबत तिची बराचवेळ चर्चा सुरू होती. अधूनमधून कुणाकुणाला फोन करणे सुरू होते. समीरचा तिला फोन आला," कुठे आहेस?" म्हणून. तेव्हा ती घरी जायला निघाली.

घरी गेल्यावर तिने स्वतःहून काहीही विषय काढला नाही. समीर ही काही बोलला नाही. जेवण झाल्यावर ती आईजवळ तिच्या बेडरूममध्ये झोपायला आली. आईच्या अंगावर हात टाकून ती आईला बिलगून झोपली.

मावशींनी सांगितलेल्या गोष्टींबाबत तिने मौन बाळगले होते. समीरसमोर रश्मीचे वागणे बदलले आहे हे तिच्या लक्षात आले. सकाळी आकांडतांडव करणारी रश्मी समीरसमोर मात्र आईशी आपुलकीने वागत होती.

क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.

काय होईल पुढे? विद्या काय निर्णय घेईल? वाचूया पुढील भागात...

0

🎭 Series Post

View all