Login

चूक कुणाची? भाग ५

Family Drama
चॅम्पियन्स ट्रॉफी -२०२५
जलदलेखन कथा

चूक कुणाची? भाग ५

©® सौ.हेमा पाटील.

रात्री बराचवेळ विद्याची झोप लागली नाही. सकाळी ब्रेकफास्ट करून ती बाहेर पडली. लीनाचे आणि तिचे फोनवर बोलणे झाले. हाती काहीतरी पुरावा हवा म्हणून तिने नगरपालिकेत जाऊन घराचा नंबर देऊन टॅक्सची पावती मागितली. ती पावती रश्मीच्या नावे होती. त्यानंतर तिने लीनाच्या ओळखीने एजंट शोधून उपनिबंधक कार्यालयात जाऊन चौकशी केली तेव्हा गेल्यावर्षी ते घर आईच्या संमतीने बक्षीसपत्र करून रश्मीच्या नावे करण्यात आले होते.

आता तिची खात्री पटली. रश्मीच्या बदललेल्या वागण्याचे कारण समजले. काहीतरी मिसिंग आहे असे तिला वाटत होते, त्याचा उलगडा झाला. आता तिला विचारपूर्वक पावले उचलायची होती. त्यासाठी डोके शांत ठेवायचे होते.

दुपारी घरी आल्यावर तिने रश्मीला सांगितले,

"मी सध्या काही दिवसांसाठी आईला माझ्याकडे घेऊन जातेय. तिचे कपडे, औषधे वैगेरे पॅक करा."

" तिकडे गेल्यावर त्यांना व्यवस्थित समजवा. त्या परत भांडणार नाहीत असे त्यांनी वचन दिल्याशिवाय त्यांना परत पाठवू नका." हे रश्मीचे बोल ऐकून विद्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली, पण तिने स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवले. 'चिल, बेबी चिल. आपल्याला जे काही करायचेय ते शांत डोक्याने करायचे आहे.' असे तिने स्वतःला समजावले.

आई आणि ती तिच्या घरी पोहोचल्या. दोन दिवसांनी विद्याने आईला खोदून खोदून विचारल्यावर आईने सगळे सत्य सांगितले. विद्याने आईला विचारले,

"मला अंधारात का ठेवले? किमान तू तरी मला कल्पना द्यायची होतीस. की तुलाही वाटले की, मी त्यात वाटणी मागेन?" विद्याचा दुखावलेला स्वर ऐकून आई म्हणाली,

"मला रश्मी म्हणाली, 'आज ना उद्या हे घर आमचेच होणार आहे. तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून आपण हे सगळे करतोय. विद्याताईंना आत्ताच काही सांगू नका.' मलाही ते पटले. कारण तुला तर इकडची काही अपेक्षा कधीच नव्हती. मग आत्ता घर त्यांच्या नावावर झाले काय, आणि माझ्या माघारी झाले काय? असे मला वाटले."

" आई, पुढ्यातले जेवणाचे ताट कुणाला द्यावे, पण बसायचा पाट कधी कुणाला देऊ नये. तुला शिक्षिका असून हे मी सांगावे? तुझ्यानंतर ते आपोआपच त्यांचे होणार होते. आता मात्र मी जे काही करणार आहे ते तू शांतपणे पहायचेस. तेव्हा शांत बसलीस तसेच आत्ताही बसायचे."
यावर प्रमिलाताई काहीच बोलल्या नाहीत.


बेल वाजली म्हणून रश्मीने दार उघडले. दारात कोर्टाचा बेलिफ उभा होता.

"रश्मी कदम कोण आहेत?"

"मीच आहे. काय झाले?"

" हे घ्या. इथे सही करा. मी कोर्टाकडून आलोय." बेलिफ म्हणाला.

" काय आहे हे?" रश्मीने विचारले.

" ते मला काय माहीत? तुम्ही वाचून बघा परत. आत्ता इथं सही करा."
त्याने मागितली तिथे रश्मीने सही केली आणि घरात येऊन ते जाडजूड बाड उघडले. पहिल्या पानावर लिहिले होते,

नाशिक येथील मे. सिव्हील जज्जसाहेब ज्युनिअर डिव्हीजन यांचे कोर्टात

रे. दि. मुकदमा नंबर ३४५९/ २०२५

प्रमिला अनंत कदम वादी
विद्या अमोल थोरात

विरूद्ध

रश्मी समीर कदम. प्रतिवादी

सदरकामी वादीतर्फे गुदरले कागदयादी खालीलप्रमाणे -

खाली प्रमिलाताईंच्या नावे असलेल्या, सध्या रश्मीने नावावर करून घेतलेल्या फ्लॅटची माहिती होती. ते पहिले पान पाहूनच रश्मीला भोवळ आली.

रात्री समीरने विद्याला फोन केला,

"हे काय केलेस तू? आधी माझ्याशी बोलायचेस तरी!"

" तू मला सांगितले होतेस?"

" म्हणजे तुला वाटणी हवी आहे तर...समजले."

" पूर्ण दावा नीट वाच. मला अर्धी वाटणी नको आहे. तो फ्लॅट पुन्हा आईच्या नावे करून हवा आहे. यासाठी कितीही पैसा घालावा लागला, कितीही हेलपाटे घालावे लागले तरी मी घालेन. आणखी एक, आईने तिच्या मृत्यूपत्रात जरी माझ्या नावाने फ्लॅट करून दिला ना, तरी मी तो वृद्धाश्रमाला दान करून टाकीन. त्यामुळे असे समजू नकोस की, फ्लॅटच्या हव्यासापोटी मी असे केले आहे."

दावा नियमितपणे सुरू झाला. सगळी कागदपत्रे आणि तज्ञ वकील यांच्या सहाय्याने निशाणी पाचचा निकाल प्रमिलाताईंच्या बाजूने लागला. समीर व रश्मीला घर खाली करण्याची नोटीस कोर्टाने बजावली. समीरने आईशी बोलून तिचे मन वळवण्याचा प्रयत्न केला, पण ती वेळ निघून गेली होती.

आईला घेऊन विद्या नाशिकला आली. तिच्यासाठी दिवसभरासाठी एक मदतनीस तिने शोधली.

" जोपर्यंत हातपाय हलतील तोपर्यंत इथे रहा, जेव्हा वाटेल तेव्हा कधीही मला घेऊन जा असे सांग, मी तुला घेऊन जाईन."असे तिने आईला सांगितले.

चूक आईची होती, आईने बसायचा पाट दिला होता. लेकीने सगळ्यांचा वाईटपणा घेऊन ती सुधारली. सासूला घराबाहेर काढण्याचा प्लॅन रश्मीने आखला होता. तिच्या कर्माची फळे म्हणून भविष्यात तिच्या हक्काच्या होणाऱ्या घरावर तिला कायमस्वरूपी पाणी सोडावे लागले.