Login

चूक —भाग -१

वहिनी नणंदेसोबत नीट वागत नाही. पण का?? या कथेत वाचू.
दिशा शक्य तितक्या वेगाने घराकडे निघाली होती.

संध्याकाळचे सात वाजले होते. अजून भाजी घ्यायची होती, आणि घरी जाऊन स्वयंपाकही करायचा होता. खूप दमलेली होती,तरीही ती स्वतःला सावरत होती. कसं तरी सगळं आवरून ती घरी पोहोचली.


घरात पाऊल टाकताच समोर सोफ्यावर बसलेली नणंद पिहू दिसली. ते पाहताच दिशाचं मन अस्वस्थ झालं. आता ही का आली?हा प्रश्न डोक्यात घोळू लागला. तेवढ्यात सुनयनाताईंची नजर तिच्यावर पडली. त्यांनी हातानेच तिला स्वयंपाकघरात जायचा इशारा केला. दिशाने नमस्कार केला नाही, काही बोलली नाही, थेट आपल्या खोलीत निघून गेली.


हे पाहून पिहू चिडली.
“आई, तुझ्या घरात माझी किंमत एवढीच का? तुझी सून मला नमस्कारही करत नाही,”
ती तक्रारीच्या सुरात म्हणाली.
सुनयनाताईंनी तिला दुर्लक्ष करायला सांगितलं.

कपडे बदलून दिशा स्वयंपाकघरात आली. हात कामात गुंतले होते, पण मनात मात्र पिहूबद्दलची चीड वाढत होती. ती स्वयंपाक करत असतानाच सुनयनाताई आत आल्या.


“दिशा, पिहू पाच महिन्यांनी माहेरी आली आहे. निदान नमस्कार तरी करायला हवा होता,”
त्या म्हणाल्या.
दिशा शांतपणे बोलली—
“आई, तुमची अजूनही अशी अपेक्षा आहे?”
“ती तुझ्यापेक्षा वयाने मोठी आहे. नणंद आहे,”
सुनयनाताईंनी समजावलं.

“फक्त नातं आणि वय मोठं असलं, तरी वागणूक तशीच हवी,”
दिशा ठामपणे म्हणाली.


सुनयनाताईंनी पिहू गरोदर असल्याचं सांगत तिच्या सेवेची अपेक्षा व्यक्त केली. तेव्हा दिशा थांबली आणि म्हणाली —
“ती पहिली स्त्री नाही जी आई होणार आहे. ज्या स्त्रीने माझं आयुष्य वेदनांनी भरलं, तिला नमस्कार करण्याची ताकद माझ्यात नाही. ती तुमची मुलगी आहे, पण माझ्याकडून काही अपेक्षा ठेवू नका.”



सुनयनाताई काही न बोलता बाहेर गेल्या.
स्वयंपाक करताना दिशाच्या मनात भूतकाळ जागा झाला.


लग्नानंतरचा पहिलाच दिवस होता ,बॅग उघडण्याची रीत सुरु होती. पिहूने हट्टाने तीन साड्या घेतल्या. तेव्हा नातेवाईक म्हणाले —"अगं एकच घ्यायची असते. "

"आपल्याच घरात राहणार आहे साड्या. पिहूकडे काय आणि दिशाकडे काय?? "
सुनयनाताई पटकन म्हणाल्या.

आईची साथ मिळाली म्हणून कोणी काही बोललं नाही.


पिहूची मनमानी रोजची झाली होती.


दिशाला अभयसोबत बाहेर जाऊ न देणं, मुद्दाम काम वाढवणं, आणि प्रत्येक वेळी अभयचं गप्प बसणं—या सगळ्यामुळे दिशाचं मन हळूहळू दुखावलं जात होतं.

त्या नात्यात प्रेमापेक्षा अन्याय जास्त होता.
आणि या अन्यायाचं बीज पुढे भयंकर परिणाम घडवणार होतं, याची तेव्हा दिशाला कल्पनाही नव्हती.


क्रमशः
0

🎭 Series Post

View all