चुकीला माफी..? आहे! भाग -१

चुकीला खरंच माफी नसते का?

चुकीला माफी..? आहे!
भाग -एक.


"रचना, अगं काय ऐकतोय मी? तू एकटीने इतका मोठा निर्णय घेतलास आणि आम्हाला साधं बोलली देखील नाहीस?" प्रदीपराव, रचनाचे वडील तिला जाब विचारत होते.


"बाबा, अहो.."

"काही बोलू नकोस. काय करायला निघाली आहेस तू? रामरावांना स्वतःची किडनी डोनेट करायला निघाली आहेस आणि आम्हाला सांगावंस वाटलं नाही?" तिचे बोलणे मध्येच तोडत ते म्हणाले.

"बाबा, हा निर्णय एवढ्या तातडीने घेतला की तुम्हाला फोन करून कळवावे यासाठी वेळच मिळाला नाही.
आणि बाबा, लहानपणापासून तुम्हीच मला दुसऱ्यांना नेहमी मदतीचा हात द्यायला प्रेरित करत आलात ना? मग आत्ताच का असे चिडताय? आणि मी कुण्या परक्यासाठी नाही तर आपल्याच माणसांसाठी हा निर्णय घेतलाय हो." ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली.

"रचना, तुझ्यापुढे मी आजवर कधी जिंकलोय का? जावईबापूंनी फोन केला म्हणून कळलं तरी. तसाच पळत इथे आलोय." प्रदीपराव.

"आला आहात, ते बरेच झाले. तेवढाच तुमचा आधार होईल." त्यांचे डोळे पुसत ती म्हणाली.

"बापलेकीचे भेटून झाले असेल तर मी येऊ का?" सुमनताई त्यांच्याजवळ येत म्हणाल्या. "तिचा निर्णय झालाय ना. आता शेवटच्या क्षणी लेकीच्या डोळ्यात पाणी आणू नका." त्यांनी प्रदीपरावांना दटावले.

"आई.." रचनाचा स्वर गहिवरला होता.

"रचना आपल्याला रक्त तपासणी करायला बोलावलंय, चल." तेवढ्यात तिथे अनिश आला आणि त्याच्यासोबत रचना लॅबमध्ये गेली.

तासाभरात सगळे रिपोर्ट्स आले. रिपोर्ट्स नार्मल यावेत यासाठी रचना मनात देवाचा धावा करीत होती आणि खरेच तिच्या रक्तात कसला दोष आढळून आला नाही. तिने मनातच देवाचे नामस्मरण केले.

रामराव म्हणजे रचनाचे सासरे. त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या आणि आज त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया होणार होती. आणि डोनर दुसरे तिसरे कोणी नसून त्यांची न आवडती सून होती ज्याची त्यांना कल्पनाही नव्हती.

"ऑपरेशनची तयारी झाली आहे. तुम्ही रेडी आहात ना?" नर्स रचनाजवळ येऊन विचारत होती.

रचना मानेनेच होकार देऊन नर्ससोबत जायला निघाली. हृदय कासावीस झाले होते. आतापर्यंत सगळे नीट होईल असा अनिशला बळ देणारी ती स्वतः मात्र मनात घाबरली होती.

"रचनाऽऽ" आईने दाटल्या कंठाने तिला हाक दिली तसे तिचे पाय थबकले. काही न बोलताच आईने तिला घट्ट मिठी मारली. मायलेकींच्या भावना एकमेकांपर्यंत पोहचायला शब्दांची गरज नव्हतीच मुळी. त्या मिठीतुनच दोघीही व्यक्त होत होत्या.

बाबांनी जवळ येऊन तिच्या केसातून हात फिरवला आणि \"सगळे काही नीट होईल.\" असा विश्वास दिला.

"मम्मा, तू लवकर परत येशील ना?" लहानगा सोहम तिला बिलगून म्हणाला, तसे डोळ्यातील पाणी खळकन खाली ओघळले.

"हो, रे बेटू. मी लवकरच येईन. तू देवबाप्पाकडे हात जोडून प्रार्थना कर. देवबाप्पा लहान मुलांचं लगेच ऐकतो." सोहमला कवेत घेऊन कवटाळत रचना म्हणाली.

"अनिश, जर मी परत नाहीच आले तर? तर तू एकट्याने आपल्या सोहमला सांभाळशील ना? जरासा हट्टी आहे तो, पण तेवढाच समजदार देखील आहे. त्याला समजून घेशील ना?" कापऱ्या आवाजात रचना बोलत होती तसे अनिशने तिच्या ओठावर बोट ठेवले.

"श्श! भलते विचार डोक्यात नको ना आणूस. मी नाही म्हणत असताना इथवर तूच मला घेऊन आलीस ना? आपण आत्ताही विचार बदलू शकतो. तू नकार देऊ शकतेस." तिला उसण्या बळाने समजावत अनिश म्हणाला.

"नाही रे, विचार तर पक्का आहे. जर असं काही झाले तरच्या या गोष्टी. बाकी मी ठाम आहे. अजिबात डळमळले नाहीये." त्याचे डोळे पुसत ती म्हणाली आणि नर्ससोबत आत गेली.
:
क्रमश:
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*


होईल का रचनाचे किडनीदान करण्याचे ऑपरेशन सक्सेस? आणि रामराव बरे होतील का? वाचा पुढील भागात.



🎭 Series Post

View all