चुकीला माफी नाही : भाग ३ (अंतिम भाग)

नणंद भावजय चे सुंदर नाते
इकडे आशू आणि आई पावभाजीची तयारी करू लागले.
वाह, पावभाजी….मम्मी आज पावभाजी. आरु मंदिरातून धावतच घरात येत साक्षीला सांगते.
हो शोना, आज तुझी मामी मस्त पावभाजी बनवत आहे, आणि गारगार आईस्क्रीम सुद्धा. 
आजी चे बोलणे ऐकून आरु खुश होते. धावत मग खेळायला जाते.
अग आई, वहिनीला सांग आईस्क्रीम नको घरी बनवूया, आपण आज त्या नाक्यावरच्या कुल्फी वाल्याकदून कुल्फी आणु. 

साक्षी, अग ती हौसेने आरु साठी बनवणार आहे. कुल्फी रात्री खावू. 
बरं, अस संकुचित मनाने म्हणत साक्षी आत गेली.
आईच्या ते लक्षात आलं. आई पण तिच्या मागोमाग गेली. साक्षी ये तुला साड्या दाखवते.
ह्या बघ, मी चार साड्या घेवून आली, ह्यातली तुला कोणती हवी ती तू घे. 
वाह किती सुंदर आहेत ग? पण चार कोणाला?
साक्षी अस विचारते न विचारते तोच आई बोलली. अग तुला, मला, आशू आणि दुर्गा वन्स ना.
आई तू अजूनही आत्या साठी काही घेण चुकवत नाहीस हा.
का चुकवू? माझ्या सासू ने मी लग्न होऊन आल्या पासून आम्हा दोघींना समान सर्व घेतलेल. त्यांची परंपरा मी पण चालू ठेवली. कितीही झाल्या तरी दुर्गा वन्स ह्या घरच्याच आहेत. त्या सुद्धा मला अजूनही सर्व देतात. 
आपण आपली नाती जपली की समोरचा पण जपतो.
हो कळल तुझ बोलण. साक्षी थोडी तोऱ्यात बोलली.
राग असेल ना तुला माझा? सकाळच्या बोलण्या वरून.
पण एक सांगते, आशू जे चांगल करते ते मी चांगलच म्हणणार. जिथे ती चुकेल तिथे बोलेन.

साक्षी, मी वहिनी म्हणून दुर्गा वन्स ना बोलायची कधीतरी, पण मायेने सर्व द्यायची पण. कारण मला एक चांगली वहिनी व्हायचं होत. दुर्गा वन्स माझ्या पेक्षा लहान, म्हणून वागायच्या फटकळ. पण माझ्या सासू ने त्यांना कधी माझ्या बाबतीत मर्यादा ओलांडू दिल्या नाहीत. सर्वच माणसे नसतात सारखी. पण आपण कधी मोठं तर कधी लहान व्हायचं. अजून एक ह्या दोन साड्या घे तुझ्या सासू आणि नणंदला दे. 
काय गरज त्यांना द्यायची? माहित आहे ना? मागे माझी साडी बेडरूम मधून कश्या बाहेर आणून बघत होत्या. मी नाही देणार. साक्षीच्या ह्या बोलण्याने आई हसली.
अग, मगाशी तू तुझ्या त्या कुर्त्या वर ओढणी आशू ची घेतली होती ना? 
हो, अग आरु अनिकेतशी खेळत त्यांच्या बेडरूम मध्ये होती. तेव्हड्यात बाबांनी मला आवाज दिला, म्हटल आता ह्या ड्रेस वर ओढणी कुठे शोधत बसू, बॅग मध्ये. म्हणून आशू वहिनीची दिसली ती घेवून गेली. पण ठेवली मी परत. 
तू घेतली, ठेवली. पण आशुला विचारलं का?
आईच्या ह्या प्रश्नावर साक्षी…नाही अस बोलली
तिला तर माहित सुद्धा नाही तू ओढणी घेतली होती ते.
पण तिला जेव्हा कळेल ना तेव्हा ती करेल हो कांगावा.
करू दे ना साक्षी तसे तिने? 
काही पण काय आई? आशू वहिनी तशी नाही आहे. ती मला समजून घेईल. एक ओढणी तर घेतलेली.
मग…तू समजूतदार वहिनी नाही आहे तर? हो ना?
आई च्या प्रश्नाने साक्षी गोंधळून गेली.

साक्षी, तुझी नणंद, रश्मी ने पण तुझी साडी बघायला घेतलेली. ती घेवून नव्हती गेली. 
स्त्रियांना साडी, दागिने दिसले की बघावेसे वाटतात. तिने ते चोरले नव्हते. पण तू तिला लगेच आरोपी केलं.
ते पण तिच्याशी चर्चा न करता. मान्य आहे ती येते माहेरी सतत, पण ती का येते? हे कधी तू शोधल का? तिला काही त्रास आहे का? कधी विचारलं का तू?
आधी ती सतत नाही यायची पण आताच का येते? विचारलं का तू तिला?
अग येते ती तिच्या आईचे कान भरायला….जावू दे आपण नको तो विषय का घेतोय आई.
गप्प बस साक्षी…माणसाने आधी सत्य काय आहे ते जाणून घ्यावे. आईच्या रागवण्याने साक्षी हडबडली.
आई…तू मला ओरडते, ते पण त्या दोघी साठी.
हो साक्षी…कारण माझ्या मुलीला कोणी दोष देवू नये म्हणून,माझी मुलगी उद्या कोणासमोर तोंड पाडून राहू नये म्हणून. 

ऐक आता. तुझ्या नणंदेला फायब्रोएड चा आजार आहे, त्याची आयुर्वेदिक औषधे चालू आहेत. त्यामुळे तिला आराम हवा, म्हणून तिची सासू तिला माहेरी पाठवते. 
कारण तिच्या सासूला वाताच्या त्रासामुळे सतत रश्मी कडे लक्ष देता येत नाही. त्यात रश्मीचा नवरा जातो ऑफिसला. म्हणून रश्मी त्याच आवरून तुमच्याकडे येते. कधी जास्तच त्रास झाला तिला की राहते तुमच्याकडे. घरी असली की टेन्शन घेते. म्हणून मग येते हो तुझ्या घरी. त्यात ती साडी. त्या दिवशी रश्मी ने चार्जर आणला नव्हता म्हणून तू घरी नसताना ती तुमच्या बेडरूम मध्ये चार्जर घ्यायला गेलेली. तेव्हा तुझी ती साडी तिला बेडवर दिसली, ती पण तुझ्या सासू ने तुला दिलेली. रश्मी फक्त ती साडी घेवून बाहेर ह्यासाठी आलेली की आईला दाखवायला की आई मी दिलेली साडी तू वहिनीला दिली पण का? हे विचारायला.
तेवढ्यात तू तिथे आली, आणि मग तू काय केलं ते तुला माहीतच आहे.
आई हो..डोळे पाणावत साक्षी बोलली.

मी रश्मीला नको ते बोलली. पण मला जे दिसल ते मी समजले. आई मी चुकले ग. मला रश्मी ची माफी मागावी लागेल. पण हे तुला कस कळल?
अग तुम्ही आलात तेव्हा तू झोपलेली, त्या वेळी तुझ्या सासूचा फोन आलेला,त्यांनी मला हे सर्व सांगितलं.
साक्षी तू पण नणंद आहेस. उद्या तुला पण आरोपी पिंजऱ्यात ठेवलं जावू शकत. त्यामुळे नाती ही दुधावरच्या साये प्रमाणे जपायची. तरच त्यापासून साजूक तूप अगदी वर्षानुवर्ष टिकणारे तयार होत.
आई मी आताच फोन लावून त्यांची माफी मागते.

थांब साक्षी आता फोन नको लावू, आज रात्री सचिनला त्याच्या आई बहीण आणि भावोजी सर्वांना इकडे घेवून या सांगितलं. तसे पण आज शनिवार आहे मग आज थांबून उद्या ते सर्व निघतील. तू रहा आठवडाभर इकडे.
ते आले की तू माफी माग. 
आई…हे तू खूप छान केलस, मागेन मी माफी कारण मी सुद्धा एक नणंद आहे….हे मला विसरून चालणार नाही. अस म्हणत साक्षी ने आईला मिठी मारली. तेव्हड्यात आरु, मम्मी मी बघ काय खाते म्हणत. पाव भाजी डिश मध्ये घेवून आली. माझी आशू मामी बेस्ट आहे अस बोलत आरु बोटे चाखत होती. तिचा तो बालिशपणा बघत सर्व हसू लागतात.

त्याच क्षणी साक्षी आशूला जावून बिलगत माझ्या बेस्ट वहिनी प्रमाणे मी सुध्दा आता माझ्या नणंद रश्मीची पण मी बेस्ट वहिनी होणार अस बोलते.
त्या रात्री साक्षीची सासू, नणंद, नवरा येतात. त्याच क्षणी साक्षी त्यांची माफी मागते, अग पोरी होत अस. सोड आता सर्व म्हणत तिची सासू तिला समजावते.  साक्षी वहिनी माझी पण चूक झाली असे म्हणत रश्मी ही साक्षी समोर हात जोडून उभी राहते. अग, ए वेडा बाई काही नाही तू चुकली. फक्त मला तुझ तू तब्बेती बद्दल सांगितलं नाही हेच तुझ चुकल. मी आली तिकडे की आता तू आमच्याकडे यायचं. बघ तुझे सर्व आजार पळवून लावते. सर्व जण हसत हसत जेवणाचे आवरून मस्त रात्रीच्या चांदण्यात गप्पा मारत कुल्फिचा आस्वाद घेतात.