चुकलं 1

मराठी कथा
"तुझ्या जावेकडून शिक जरा, कसा कामाचा चपाटा आहे तिला..तुझं अजून चाललंच आहे कासवाच्या गतीने.."

"अहो वेळेत काम झालं म्हणजे बस ना? लवकर आटोपून कुठली ट्रेन पकडायला जायचंय.."

सासूने शेवटी सोडून दिलं तिला सांगणं..सासुच्या प्रत्येक बोलण्यावर वैशालीचं उलट उत्तर तयारच असायचं. याउलट तिची मोठी जाऊ गीता..कामाच्या बाबतीत सर्वात पुढे. सकाळी लवकर उठून सर्वांचा नाष्टा, जेवण बनवून शेतातल्या कामाला जाई. तिथली कामं झाली की घरी येऊन कपडे, भांडी, झाडाझुड करत असे. इतकं करूनही ती कधी दमत नव्हती. तिला वैशाली धाकटी जाऊ म्हणून आली. तिला वाटलेलं तिचा कामाचा भर कमी होईल, पण कसलं काय...वैशालीला घरातल्या कामांसाठी घरातच ठेवलं होतं, जाऊ शेतात गेली की वैशाली मोबाईल धरून बसे, थोरली जाऊ घरी आली की तिच्यासमोर फक्त झाडू मारताना दिसावी म्हणून झाडाझुड तेवढी करे.

गीता दमून थकून आल्यावर तिला घरातला सगळा पसारा दिसायचा, पण उगाच वाद नको म्हणून ती स्वतःहून सगळं करायची.

पण सासूबाई सगळं बघत असायच्या, त्यांनी वैशालीला बरंच समजवल, रागवलं पण पालथ्या घड्यावर पाणी..गीता त्यांना समजावे,

"जाऊद्या सासूबाई, आपलीच माणसं आपलंच घर..कशाला थोड्या थोडक्या कामांसाठी नातं बिघडवून घ्यायचं?"

गीताच्या या भोळवट स्वभावामुळे वैशालीचं चांगलंच फावलं होतं.
गीताला दोन मुली. हुशार आणि अत्यंत गुणी. सासूबाईंना मनोमन वाटायचं की एक तरी मुलगा हवा, पण गीताचा स्वभाव बघता तिला बोलून त्रास द्यायची हिम्मत त्यांच्यात नव्हती. त्याकाळी मुलगा व्हावा म्हणून तपासणी करून गर्भ ठेवायचा की नाही असं लपूनछपून चालत असे. पण गीताने स्पष्टपणे सांगितलं होतं, की देवाने जे दिलं त्यात सुख मानायचं..तिच्या या ठामपणामुळे कुणी काही बोललं नाही. पण सासूबाईंनी सुप्त ईच्छा तशीच राहिली.

🎭 Series Post

View all