चुकलं 2

मराठी कथा
वैशाली चांगलीच चाणाक्ष होती, घरात किराणा आणला की सुकामेवा हळूच बाजूला काढून तिच्याजवळ ठेवायची. गीताच्या मुलींना फारसं जवळ करायची नाही. सासूबाईंचा तिच्याबद्दलचा राग वाढतच चालला होता.

एके दिवशी संध्याकाळी गीताने छानपैकी स्वयंपाक बनवला आणि सर्वांना जेवायला वाढलं. वैशालीला ती भाजी आवडत नव्हती, तिने सर्वांसमोर म्हटलं..

"काय भाजी आहे..चवच नाही.."

गीताला वाईट वाटलं, सासूबाई चिडल्या..

"तुझ्यासाठी आता रोज श्रीखंड पुरी बनवायची का आता? आणि एवढंच असेल तर स्वतः बनवत जा...अजूनही ती बिचारी गीताच सगळा स्वयंपाक करतेय.."

वैशालीला राग आला आणि ती ताटावरून उठून गेली. गीता म्हणाली,

"बाई तुला नसेल आवडत भाजी तर दुसरं काहीतरी बनवून देते तुला, पण अशी उपाशी राहू नको.."

"कशाला लाड करतेय तिचे? जास्तच लाडावत चाललीये ती.."

वैशालीचा नवरा गपगुमानपणे सगळं ऐकत होता. त्याने वैशालीला चांगलंच सुनावलं.

घरात चांगलेच वाद झाले..गीताला घरात भांडण नको होतं म्हणून तिने सर्वांना शांत राहायला सांगितलं पण आता पाणी डोक्यावरून गेलं होतं..

सासूबाईंनी धाकल्या मुलाला आदेश दिला..

"वैशाली आणि तू गाशा गुंडाळायचा आणि दुसरीकडे राहायला जायचं.."

वैशाली आणि तिच्या नवऱ्याला धाक पडला...एक तर वैशालीचा नवरा फारसं कमवत नव्हता, इथे शेतातल्या उत्पन्नावर त्यांना आयतं सगळं मिळत होतं. नवीन घर आणि घरखर्च करण्याची दोघातही ताकद नव्हती. पण आता सासूबाईंनी ठामपणे सांगितलं मग काही पर्याय नव्हता..

त्यांना 2 महिन्याची मुदत दिली होती. या 2 महिन्यात वैशालीने नवीनच खेळी केली आणि आपल्या थांबण्याचा मार्ग मोकळा केला.

महिना उलटला आणि वैशालीने सासूबाईंना हळूच येऊन सांगितलं..

"सासूबाई, मला दिवस गेलेत.."

सासूबाईंना आनंद झाला, पुढे वैशाली म्हणाली..

"चेक केलंय... मुलगा आहे.."

हे ऐकून सासूबाईंना काय करू अन काय नको असं झालं. आधीचा सगळा राग विसरून त्यांच्यावर नवीनच भूत सवार झालं..


"गीता...जायच्या आधी छान गुळाचा शिरा आणि नागलीची भाकर बनवून जा..आपली वैशाली पोटुशी आहे.."
******

🎭 Series Post

View all