चुकलं 3 अंतिम

मराठी कथा
हे ऐकून गीताला आनंद झाला..तिने आनंदाने सगळं केलं. सासूबाई आता वैशालीची विशेष काळजी घेत होत्या.

एके दिवशी गीता नुकतीच शेतातील कामं आवरून घरी आली आणि वैशालीने तिला पाहताच घर झाडायला झाडू हातात घेतला. गीता घरात आली आणि हातपाय धुतले. सासूबाईंनी पाहिलं आणि त्या गीतावरच चिडल्या..

"तुला दिसत नाही का ती झाडू मारतेय? अश्या अवस्थेत तिला कशाला काम करायला सांगतेय?"

गीताला धक्काच बसला, आजवर आपलं गुणगान गाणारी सासू अचानक वैशालीची बाजू घेऊ लागल्या होत्या. वैशालीचा दुसरा डाव यशस्वी झाला होता.

गीताला आता सतत सासूबाईंच्या रागाचा सामना करावा लागत होता. वैशाली सासूबाईंना घेऱ्यात घेई आणि त्यांचे कान भरे..

"कितीही म्हटलं तरी मोठं कुटुंब येतं आपलं...किराणा पुरत नाही..अश्यात मला माझं असं वेगळं लक्ष देता येत नाही.."

सासूबाई तिची प्रत्येक गोष्ट ऐकू लागल्या. एके दिवशी गीताने सासऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे मसालेदार भाजी केली तर सासूबाई चिडल्या,

"मुद्दाम करतेस का तू? वैशालीला मसालेदार चालणार नाही म्हणून मुद्दाम करतेस का?"

गीताने गपगुमान सगळं ऐकलं पण तिच्या नवऱ्याला ते सहन झालं नाही..

"काय चाललंय आई तुझं..ही गीता सकाळी उठल्यापासून नुसती राबत असते, आणि तू तिलाच बोलतेय?"

"राबते म्हणजे उपकार करते का?"

"मग वैशालीने कशाला हात लावला नाही आजपर्यंत ते चालतं तुला?"

"हो तिचं सगळं चालतं... कारण ती आपल्या वंशाला जन्म देणार आहे.."

सासूबाईंच्या तोंडातून पटकन निघून गेलं आणि सर्वांना सगळं माहीत झालं. गीतालाही समजलं की मुलाचा गर्भ आहे म्हणून सासूबाईंचा वैशालीकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला होता.

"आणि दोन महिने होत आलेत, वैशालीला घर सोडायला लावलं होतं मी...पण तिची अवस्था बघता घर ती नाही तर तू आणि गीता सोडणार.."

गीताला धस्स झालं, आजवर घरासाठी घेतलेल्या कष्टांचा सासूबाईंना विसर पडला होता..त्याचंच तिला वाईट वाटलं..

"चालेल, आम्ही जाऊ घर सोडून..असंही इथे राहून सतत अपमान होत असेल तर काय फायदा.."

गीता आणि तिच्या नवऱ्याने दोन्ही मुलींना घेऊन घर सोडलं. दुसरीकडे कष्टाने घर उभारलं, दोघेही कष्टाळू असल्याने त्यांना नवीन संसार उभा करायला वेळ लागला नाही, घरात तीन तीन लक्ष्मी असल्याने घराची भरभराटच होत गेली..

काही वर्षांनी गावातली एक बाई गीताला सहज भेटायला म्हणून आली..

"काय म्हणताय काकू..तब्येत बरी आहे ना?"

"माझं सोड गं.. तुझी सासू, पार जाम झालीये.."

"का?"

"दिवसभर घरातलं यावर, शेतातली कामं बघ आणि आणखी नातवालाही सांभाळ..फक्त हाडं उरलीये तिची.."

"आणि वैशाली?"

"कसली बाई आहे ती..सासू काही बोलली तर मुलाला घेऊन निघून जायची धमकी देते...मग तुझी सासू रडत कुढत सगळं निमूटपणे करते.."

गीताला वाईट वाटलं. आपण नसताना घराची सगळी घडी बिघडली... तिला वाटू लागलं, सासूबाईंना आपल्याकडे आणावं, त्यांची सेवा करावी..

"त्यांना माझा एक निरोप द्या..त्यांना म्हणा तुमची थोरली सून आहे म्हणा अजून..इकडे यायला सांगा.."

"पोरी...तुझं मन मोठं गं.. पण तुझ्या सासूला जोवर तिची चूक कळत नाही तोवर होऊ दे त्यांना कष्ट...मुलाच्या हव्यासापोटी एवढी सोन्यासारखी सून आणि सोन्यासारख्या दोन नाती सोडल्या तिने...त्यांना त्यांचा कर्माची फळं भोगू देत..भोग संपले की स्वतःहून येईल तुझी सासू तुझ्याकडे... बघच तू.."

गीताच्या नवऱ्यानेही तिला बजावलं, तुझ्या भोळेपणाला बाजूला ठेव...गीताला ईच्छा असून सासूला बोलावता आलं नाही...

काही वर्षे उलटली, गीताने सकाळची कामं आवरली आणि खिडकीपाशी येऊन सहज बाहेर बघत बसली..

समोरून एक रोडावलेली बाई 2 अवजड बॅग घेऊन येताना दिसली..गीताला चेहरा ओळखीचा वाटला.. जेव्हा तिला समजलं की या सासूबाई आहेत तशी ती जोरात धावत गेली..

सासूने डोळ्यात पाणी आणून तिला म्हटलं..

"चुकलं बाई माझं...चुकलं..माफ कर.."

समाप्त


🎭 Series Post

View all