मागील भागात आपण पाहिले की सर्वांनी तेजलने केलेल्या पोह्यांना नावे ठेवली. तेजलने पोहे खाल्ले तेव्हा तिला समजले की तिने मीठ जरा जास्तच टाकले होते.पण तरीही सासूबाई मात्र पोहे छान झाले असे म्हणाल्या.आता पाहूया पुढे..
तेजल विचाराधीन असतानाच,
" तेजल,दे ती प्लेट इकडे.मी करते चांगले पोहे झटपट."
" हो वहिनी .चुकलंच माझं.मी तुम्हाला कांदा ,हिरवी मिरची,कोथिंबीर चिरून देते."
" बर ठीक आहे चालेल."
सर्व जण सुजाता वहिनींनी केलेले पोहे खावून तृप्त होतात आणि आपापल्या कामात गुंतून जातात.
दुपारची वेळ होते.
" वहिनी मला ना आज तुम्ही पोळ्या शिकवाल का?"
" हो शिकवीन की."
" मग मी कणीक घेऊ का मळायला?"
" थांब नाहीतर जराशी.आज नको.मी तुला उद्या शिकवीन.सर्वांना जेवायला लवकर वाढायचे आहे ना म्हणून."
" बर चालेल."
तेजल तिथेच घुटमळत उभी राहते.वहिनी सारा स्वयंपाक उरकतात.
जेवण झाल्यावर तात्या म्हणतात," खरी अन्नपूर्णा आहेस सुजाता तू! वाह तुझ्या हातचं जेवण केलं की माझा आत्मा तृप्त होतो."
तेजललाही अशा कौतुकाची हाव वाटते. सासुबाईंचा गुणी सुना हा शब्द सुजाता वहिनींप्रमाणेच आपणही तंतोतंत पाळावा या अट्टाहासापाई, दुसऱ्या दिवशी ती लवकरच सुजाता वहिनींकडे जाते.
" वहिनी आज पोळ्या मीच करणार आणि कणिक सुद्धा मीच तिंबून ठेवणार. मला ना फक्त एकदाच दाखवून द्या.मला जरा वेळ लागेल म्हणून मी तुमच्याकडे जरा लवकरच आले. "
" ठीक आहे .तू चल मी आलेच."
सुजाता वहिनींनी तेजलला पोळ्या करण्याचे प्रात्यक्षिक एकदाच दाखवले आणि क्विक लर्नर असल्याने तेजलने पूर्ण रेसिपी अल्पावधीतच अवगत केली.
सुजाता वहिनी आता तेजलला भाज्या चिरून देणे,निवडणे अशी कामे सांगू लागल्या.आता रोजच तेजल पोळ्या करू लागली.
" वाह छान. त्या मानाने खूप लवकर शिकली तू पोळ्या."
" थँक्यू.खरतर आईला बऱ्याचदा करताना पाहिले होते,कदाचित त्यामुळे लवकर शिकले."
मनीषला विविध रेसिपीज तसेच खाण्याचे विशेष वेड आहे,हे तेजलला माहीत होते.त्यामुळे आज सर्वांसाठी काहीतरी वेगळं करावं असा विचार करत तिने यूट्युब वर लच्छा पराठा ची रेसिपी पाहिली. आजतरी सासूबाईंनी माझे खरे कौतुक करावे असे तिला वाटत होते.म्हणून तिने पराठा करायला घेतला तोच वहिनी म्हणाल्या,
" अगं,काय करतेस हे? अशी काय पोळी करतेस?"
" काही नाही म्हणजे मी यु ट्यूब वर लच्छा पराठा रेसिपी पहिली. ती ट्राय करत होते."
" हे बघ तेजल स्वयंपाक घरात मी जे म्हणेल तीच भाजी,भात आणि पोळी केली जाते.तसेही विविध प्रयोग मनीष सोडून कोणाला आवडत नाहीत.त्यामुळे एकट्यासाठी एवढे कुटाणे कशाला करायचे? साध्या पोळ्या कर लवकर .मी भाजी करते."
तेजलचा जरा हिरमोड झाला.एकीकडे सुजाता वहिनींच्या सूचना तर दुसरीकडे सासूबाईंच्या " गुणी सूना " या शब्दाला जागण्याची तळमळ! हे द्वंद्व खरच तिला अवघड वाटू लागले होते.काय होईल आता पुढे? तेजल बनू शकेल का गुणी सून?
पाहूया पुढील भागात !
भाग २ समाप्त.
फोटो: साभार गुगल
©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा