Login

आयत्या बिळात सासुबा (ई)...

कोणीच आपल्याला बोलत नाही याचा काही लोक फायदा घेऊन दुसर्‍यांच्या गोष्टी बळकवतात
"काय सुंदर झोपाळा आहे हो सुनंदाताई."

"हो ना? माझ्या लेकाने बसवला आहे माझ्यासाठी." सुनंदाताई झोपाळ्यावर गिरकी घेत म्हणाल्या.

त्यांचे बोलणे आतून ऐकत असलेल्या कीर्तीच्या कानावर पडले. नकळत तिच्या डोळ्यात पाणी आले.

गेले कित्येक दिवस कीर्ती सुशांतच्या मागे लागली होती, झोपाळ्यासाठी. तिला बागेत झोपाळा बसवून घ्यायचा होता. तिला वाचनाचा छंद होता आणि कॉफी पीत पीत बागेत झोपाळ्यावर बसुन वाचायची इच्छा होती तिला. बर्‍याच दिवसानंतर तिचे बोलणे मनावर घेऊन सुशांतने दोन दिवसापूर्वी झोपाळा बसवला होता. पण त्यावर बसण्याचा योग अजुन कीर्तीचा आला नव्हता.
सुनंदाताई झोपाळा सोडतच नसत. आणि वर येणार्‍या जाणार्‍या लोकांना,' माझ्या लेकाने माझ्यासाठी झोपाळा बसवून घेतला आहे असे सांगत.' कीर्तीने झोपाळ्याचा विषयच मनातून काढून टाकला.

सुनंदाताईंचा स्वभावच असा झाला होता सुशांतचे लग्न झाल्यापासून. त्या दोघांनी स्वतःसाठी काही केले, तर या न विचारता आयत्या जाऊन त्या गोष्टीचा उपभोग घ्यायच्या. नवीन घर घेतले असताना कीर्ती व सुशांतची मास्टर बेडरूम त्यांनी न विचारता बळकावली होती. आणि वर सर्वांना सांगत,' माझ्या मुलाने माझ्यासाठी मी नको नको म्हणत असताना इतकी मोठी बेडरूम दिली.'
असे नव्हते की त्यांना कळत नसायचे की ही गोष्ट सुशांतने आपल्या बायकोसाठी केलीय. पण मुद्दाम तीच गोष्ट त्या बळकवायला बघत.

सुशांतला कळायचे, पण तो आईला फारसे काही बोलायचा नाही. सुनंदाताईंचे पती अशोकराव सुद्धा बायकोच्या अशा वागण्याला मूकसंमती द्यायचे. एकूणच कीर्तीच्या भावनांचा कोंडमारा व्हायचा.

एकदा सुशांतने कीर्तीसाठी महागडा ड्रायर आणला. आणि टेबलवर ठेवला. कीर्ती बाहेर गेली असल्याने सुनंदाताईंनी तो ड्रायर उचलला आणि स्वतःच्या रूममध्ये नेऊन ठेवला. त्या ड्रायर वापरतही नसत. स्वतःच्या केसाला तेल लावण्यापलीकडे त्या काहीही करत नसत. तरीही त्यांनी तो ड्रायर ठेवून घेतला.

घरी आल्यानंतर सुशांतने कीर्तीला विचारले," काय ग, कसा वाटला ड्रायर?"

त्यावर कीर्ती म्हणाली," कुठे आहे ड्रायर? मला तर मिळालाच नाही."

यावर सुशांत म्हणाला," मी टेबलवरच ठेवला होता बॉक्स." यावर कीर्ती समजून गेली की, बॉक्स सासूबाईंनी उचलला आहे. ती सुशांतला म्हणाली," बहुतेक सासूबाईंनी घेतला आहे." नेहमीप्रमाणे सुशांतला टोला बरोबर कळाला. पण तो शांत बसला.

इकडे सुनंदाताई मैत्रिणींच्या ग्रुप मध्ये सांगू लागल्या, की माझ्या मुलाने मला नवीन ड्रायर घेतला आहे.

मुलाने आईसाठी ड्रायर घेतला, ही गोष्ट त्यांना जरा विचित्रच वाटली. कारण सुनंदाताईंच्या डोक्यावर केस सुद्धा विरळच होते. पण त्यांनी तरीही माना डोलावल्या.

एक-दोन दिवसानंतर सुनंदाताई ट्राय करू लागल्या, ड्रायर वापरण्यासाठी. पण नवीनच हाताळत असल्याने त्यांना उठून कसे वापरायचे तेच कळेना. अचानक त्यांनी स्विच ऑन करून फास्ट स्पीडचे बटन दाबले. आणि त्यातून जोरात हवा यायला लागली. त्यांचे छोटे छोटे केस त्यातून आत जाऊ लागले. आणि त्वचेला एकदम गरम फटके बसायला लागले. केस मशीनमध्ये अडकत जरी नसले, तरी हा प्रकार त्यांना नवीन असल्याने त्या अतिशय घाबरून जोरात किंचाळल्या आणि त्यांच्या हातून ते ड्रायर खाली पडले.

त्यांचा आवाज ऐकून सुशांत आणि कीर्ती धावत आले. इतका महागडा ड्रायर खाली पडल्याने, त्याच्या आवरणाला तडा गेला. ते पाहून सुशांतला वाईट वाटले. रागाच्या भरात तो म्हणाला,

" वापरता येत नाही तर घ्यायचे कशाला आई?"
सुनंदाताई बावचाळलेल्या अवस्थेत तशाच बसून होत्या.

तो प्रकार बघून कुठेतरी कीर्तीला हळूच हसू आले. हे तात्पुरते मजेशीर प्रकरण घडले असले तरी हा सुनंदाताईंचा प्रकार थांबवण्यासाठी कायमचे काहीतरी केले पाहिजे, हे तिच्या मनात आले. ती मनातल्या मनात काहीतरी विचार करू लागली.

0

🎭 Series Post

View all