Login

कॉफी

Short Story..
"कधीपासून वाट पाहतेय बसची. गडबडीच्या वेळी एक बस वेळेत येईल तर शपथ." हातातलं घड्याळ बघत ती पुटपुटली. तिची ही चिडचिड अगदी साहजिक होती. कारण ही तसंच होतं. लग्न ठरल्यापासून आज पहिल्यांदा ती अजिंक्यला बाहेर एकटी भेटणार होती. लग्न ठरवताना बोलणं झालेलं दोघांचं एकांतात, पण ते अगदी जुजबी.. कारण, घरच्यांनी आधीच होकार कळवला होता. असं स्थळ त्यांना हातचं जाऊ द्यायचं नव्हतं. ते स्थळ होतंच लाखात एक. अजिंक्य सरनाईक. उच्चशिक्षित, देखणा, एकुलता एक. वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळत होता. आई, वडील आणि तो, असं त्रिकोणी कुटुंब. श्रीमंत आणि सुसंस्कृत घराणं. असं स्थळ कोण नाकारेल?

आज त्याने मीराला अचानक भेटायला बोलावलं होतं. छान तयार होऊन ती निघाली होती.
"ही बस काही वेळेत यायची नाही" पुन्हा एकदा तिची चिडचिड झाली. मनात कित्येक प्रश्नांचं वादळ घोंगावत होतं. का बोलावलं असेल त्याने? काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे म्हणत होता. काय बोलायचं असेल त्याला? काहीच कळत नव्हतं तिला. वाढत जाणारी चिडचिड तिची तिलाच जाणवत होती. शेवटी बसची वाट न पाहता तिने रिक्षा थांबवली.

रिक्षा कॉफी शॉपच्या समोर येऊन थांबली. रिक्षाचे पैसे देऊन ती कॉफी शॉपच्या दाराशी आली. वाटेत अजिंक्यचा फोन येऊन गेलेला की तो पोहोचलाय. तिने ओढणी पुन्हा एकदा नीट केली आणि ती आत आली. इकडे तिकडे फार शोधावं लागलं नाही तिला. दोन टेबल सोडून तिसऱ्या टेबलवर तो मेन्यूकार्ड पाहत बसला होता. ती समोरच्या खुर्चीत येऊन बसली..

ती : हाय

तो : हाय

ती : सॉरी, थोडा उशीरच झाला.

तो : It\"s ok. मलाही फार वेळ नाही झालाय येऊन.

ती : ok.

तो : कॉफी चालेल?

ती : हो.

त्याने दोन कॉफीची ऑर्डर दिली. मीरा पुन्हा विचार करू लागली. मुड तर छान दिसतोय याचा. म्हणजे नॉर्मल भेट आहे ही. जरा रिलॅक्स वाटलं तिला. इतक्यात त्यांची कॉफी आली.

"अगं रिलॅक्स, मी असं काही जगावेगळं बोलायला नाही आलोय. मला फक्त काही गोष्टी तुला सांगायच्या आहेत. त्यामुळे टेन्शन घेऊ नकोस बिलकुल." वाफाळत्या कॉफीचा एक मग तिच्या समोर ठेवत तो बोलला. तिने फक्त हुंकार दिला.

" माझ्या काही गोष्टी क्लीअर आहेत. म्हणजे मला पुढे काय करायचं आहे, कसं जगायचं आहे वगैरे.. तुला थोडक्यात सांगतो. आमचा हा बिझनेस वडिलोपार्जित आहे. म्हणजे अगदी सेटल आहे. काही न करता ही आम्ही आरामात जगू शकतो इतका सेट झालाय. पण मला हे असंच जगायचं नाहीये. मी हा बिझनेस आणखीन डेव्हलप करणार आहे. माझ्या डोक्यातले प्लॅन मला एक्झिक्युट करायचे आहेत. गेले सात आठ महिने मी त्यासाठी प्रयत्न ही चालू केलेत. त्यात अचानक लग्नाचा विषय आला. लग्न ठरलं ही. मग हे सगळं तुझ्याशी बोलावंसं वाटलं." तिच्या रिऍक्शनचा अंदाज घेत तो बोलत होता.

"Thanks, तुला हे माझ्याशी बोलावंसं वाटलं." किंचित हसून ती बोलली.

"हां तर मला तुला हे सांगायचं आहे की या प्रोजेक्टमुळे मी इतर नवऱ्यांसारखा तुला सतत वेळ देऊ शकणार नाहीये. निदान दोन वर्ष तरी. म्हणजे newly married couple म्हणून जे जे लाड होतात, अटेंशन दिलं जातं ते मला प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत तरी शक्य नाही." तो मीराचा चेहरा वाचत म्हणाला. "मला माहितेय तुझ्याही खूप साऱ्या अपेक्षा असतील, स्वप्न असतील. पण.."

"आणखीन काही सांगायचं आहे का?" त्याचं वाक्य अर्धवट तोडून तिने अतिशय शांत आणि संयमी आवाजात प्रश्न विचारला.

"हो. एक महत्वाचं बोलायचं आहे." कॉफीचा मग टेबलवर ठेवत तो बोलू लागला. "तू स्वतः सुशिक्षित आहेस. चांगली नोकरी पण आहे. माझं सगळं ऐकूनही तुझा होकार असेल तर मी एकच सांगेन की तू लग्नानंतर ही तुझी नोकरी कंटिन्यू करू शकतेस. तुझा पगार कसा वापरायचा, कुणाला द्यायचा हे सगळे निर्णय सर्वस्वी तुझेच असतील. मी किंवा माझ्या घरचे तुला कधीच काही विचारणार नाही." तिने पुन्हा फक्त हुंकार दिला.

उरलेल्या कॉफीचा मग टेबलवर ठेवत तिने पर्स हातात घेतली. तसा अजिंक्य बेचैन होऊन म्हणाला, "हे बघ मीरा.." त्याच्या तोंडून स्वतःच नाव ऐकताना ती किंचित लाजली. पण त्याने ते नोटीस केलं नाही बहुधा.

"हे बघ मीरा, लग्न करून मग पटत नाही, वेळ देत नाही, अपेक्षा पूर्ण करत नाही या कारणांवरून वाद विकोपाला जाण्यापेक्षा आताच या गोष्टी तुला स्पष्ट सांगणं योग्य वाटलं मला. तू थोडा वेळ घे हवं तर आणि मग मला तुझा निर्णय कळव. मी तुझ्या निर्णयाचा रिस्पेक्टच करेन." त्याचं सगळं ऐकून तिने नेहमीप्रमाणे हुंकार देत पर्स हातात घेतली. पर्समधून एक छोटी डायरी आणि पेन काढून एका पानावर काहीतरी लिहिलं. तो कागद दुमडून कॉफीच्या मग खाली सरकवत ती उठली. "यात माझं उत्तर आहे" असं सांगून पाठमोरी होत निघूनही गेली.

आता अजिंक्यची धाकधूक वाढली होती. खरं तर त्याला ती मनापासून आवडली होती. म्हणून तर त्याने होकार कळवला होता. फक्त पुढे जाऊन काही गैरसमज, वाद नको म्हणून तिला सगळं सांगायचं ठरवलं होतं त्याने. डोक्यातलं विचारांचं जाळं बाजूला सारून त्याने तो कागद हातात घेतला. कागद उघडून तो वाचू लागला.

"Thanks. माझ्याशी हे सर्व शेअर केल्याबद्दल. निर्णय घ्यायला मला आणखीन वेळ घ्यायची बिलकुल गरज वाटली नाही. कारण तू बोलत असतानाच माझा निर्णय ठाम होत गेला. बरं आता माझा निर्णय सांगते. मला आपल्या लग्नात तुझ्या चॉईसचा शालू नेसायला आवडेल.."

शेवटचं वाक्य त्याने परत परत वाचलं तरी त्याचं मन भरत नव्हतं. तो कागद खिशात ठेवत त्याने तिच्या मग मध्ये उरलेल्या थंड कॉफीचा घोट घेतला. आधीपेक्षा जास्त गोड लागत होती ती कॉफी..

© वृषाली प्रभुदेसाई. कोल्हापूर.