Login

रंग प्रेमाचा! - ०४

Colour Of Love
मागील भागात..

निशाला तिथल्या लाईफस्टाईलसोबत थोडं मॅनेज करावं लागत आहे. तिची अदा आणि आरवसोबत भेट झाली. अदाने लगेच तिला स्वीकारलं. मात्र आरवने तिला स्वीकारायला स्पष्ट नकार दिला. आदित्यने चार्ल्सला बजावलं की आरवला निशाचा अपमान करु देऊ नकोस.

आता पुढे..

       थोड्या वेळाने अदा आणि आरव खेळायला निघून गेले होते. निशा चार्ल्ससोबत गप्पा मारत होती. तिला त्याला बरंच काही विचारून घ्यायचं होतं.

"चार्ल्स, ह्या बिल्डिंगमधले किती फ्लॅट आपले आहेत? म्हणजे काल मी जिथे गेलेले तो एक फ्लॅट होता. हा तर पूर्ण फ्लोअरच आपला आहे बहुतेक. आदित्यचे मॉम-डॅड तर तिथे खाली राहतात. म्हणजे मी ना थोडी गोंधळले आहे. माझा गृहप्रवेश इथे झाला. पण त्यांनी खाली ओवाळलं होतं मला."

चार्ल्स हसला. त्याने तिच्यासाठी मस्त व्हेज सूप बनवलं होतं. त्याने सूप तिच्यासमोर आणून ठेवलं आणि भाजी घेऊन तो तिथे डायनिंग टेबल शेजारची खुर्ची ओढून बसला.

"माझ्यासोबत भाजी निवडता का? जेवणही होऊन जाईल आणि गप्पाही होतील."

खरंतर त्याने असं विचारण्याचं धाडस केलं नसतं. ती मालकीण होती तिथली. पण तिच्या स्वभावावरून त्याला लक्षात आलं होतं की ती खूप साधी मुलगी आहे. सगळं आपलंसं करून वागणारी! तिने लगेच सूप संपवलं आणि त्याच्या शेजारी येऊन बसली.

"हो करते ना. उद्यापासून ना तू एकटा काही करत नको जाऊ. मीही मदत करत जाईन. मला घरी बसून बसून काही काम नाही तसंही. खरंतर माझी इच्छाच नव्हती की जॉब वगैरे करायची."

ती हसतच भाजी निवडायला बसली.

"बरं तुम्ही विचारलेलं सांगायचं राहिलंच. ही पूर्ण बिल्डिंगच साहेबांची आहे."

"काय?"

चार्ल्सचं वाक्य पूर्ण होतं न होतं तोच ती जोरात किंचाळली.

"मॅम, अहो हळू. किती जोराने ओरडलात! खरं सांगतो आहे. ही सगळी बिल्डिंगच साहेबांची आहे. ती डिव्हाईड करण्यासाठी फ्लोअरचा वेगवेगळा वापर केला आहे. आपलं बोलून झालं की नंतर सगळे फ्लोअर फिरवतो तुम्हांला."

तिने होकारार्थी मान डोलावली. तिला बरंच काही विचारायचं आहे हे त्याला जाणवलं. सगळं काम झाल्यावर तो टीव्ही पाहत बसलेल्या तिच्याजवळ आला.

"मॅम, चला. जाऊया ना?"

"हो."

ती टीव्ही बंद करून उठलीच. त्यावरून तिला सगळं जाणून घ्यायची किती उत्सुकता आहे ते जाणवत होतं.

"चार्ल्स, मी तुला नावाने हाक मारते आणि तू मला मॅम म्हणतोस. बरोबर नाही वाटत ते. तू पण मला निशा म्हण."

तिने हॉलमधून बाहेर पडताना म्हटलं. तसं त्याने चमकून तिच्याकडे पाहिलं.

"असं नका म्हणू ताई. एकवेळ मी ताई म्हणेन तुम्हांला. नावाने हाक मारणं नाही जमायचं. साहेबांच्या पॅरेंट्सना आवडणार नाही ते आणि ते बरोबरही नाही."

तिला यावर अर्ग्यू करावंसं वाटत होतं. पण सर्वांचे स्वभाव माहित नसताना उगाच दुसरंच काहीतरी होऊन बसेल म्हणून ती गप्प बसली.

"ही आठमजली बिल्डिंग आहे. आपण आता ज्या फ्लोअरवर होता ती सेवन्थ फ्लोअर होता. तिथे साहेब, अदा, आरव आणि मी असे राहायचो. चार बेडरूम आहेत तिथे. अदा आणि आरवची वेगवेगळी बेडरूम आहे. साहेबांची वेगळी बेडरूम आहे आणि माझी वेगळी. आता आपण सिक्स्थ फ्लोअरला जाऊया."

ते दोघे सिक्स्थ फ्लोअरला आले. काल ती इथेच झोपली होती. सगळं वेल प्रिपेअर्ड दिसत होतं.

"इथे मी काल आले तेव्हा सगळ्या रूम अगदी हॉटेल रूम्ससारख्या तयार होत्या. ह्या फ्लोअरवर काय आहे?"

आता मात्र चार्ल्स थोडासा कचरला. पण सांगावंच लागणार होतं.

"इथे गेस्ट रूम्स आहेत. गेस्ट जेव्हा येतात तेव्हा त्यांनी फॅमिलीच्या पर्सनल स्पेसला डिस्टर्ब करू नये म्हणून साहेबांनी फ्लोअर सेपरेट ठेवला आहे."

निशाला हे ऐकून वाईट वाटलं. मग तो काल तिला इथे का घेऊन आला होता? ती गेस्ट होती का? ती तर ह्या जागेला आपलं घर समजून आली होती. तिच्या अचानक शांत होण्याने आणि उतरलेल्या चेहऱ्याने चार्ल्सला तिच्या मनात काय चाललंय ते समजलं होतं.

"ताई, तुम्ही उगाच विचार करत आहात. खरंतर साहेबांची रूम अस्ताव्यस्त असते. मी क्लीन करत नाही तोवर ते लक्ष देत नाहीत. तुम्हांला तिथे नेणं त्यांना बरोबर वाटलं नाही. म्हणून त्यांनी काल तुम्हांला इथे आणलं. काल रात्रीच त्यांनी रूम माझ्याकडून सेट करून घेतली आहे."

निशाने फक्त होकार दिला. चार्ल्स खरं बोलतोय की आपल्या मनाचं समाधान करतोय हे तिला काही समजलंच नाही. विचारलं तरी तो खरं बोलणार नाही म्हणून तिने विचारलंच नाही.

"चला खाली जाऊया."

त्याने पुन्हा लिफ्टचं बटण प्रेस केलं. ते दोघे पाचव्या फ्लोअरवर आले. तिथे येताच मात्र तिची कळी खुलली.

"वाव! हे किती भारी आहे!"

हा पूर्ण फ्लोअर इनडोअर गार्डनसाठी वापरण्यात आलेला होता. मधे दोन ठिकाणी फिश टँक्स पण होते. वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं वगैरे कुंडीत चांगल्या पद्धतीने लावलेली होती.

"हे सगळं कोण करतं? म्हणजे मलाही बागकामाची आवड आहे. मला छान गप्पा मारायला आवडतात यावर. म्हणजे माहिती घ्यायला आवडते."

निशा त्याला सांगत होती.

"साहेबच करतात. त्यांना राग आला की इथे येऊन शांत वाटतं असं म्हणतात. इथे आर्टिफिशियल फुलपाखरं पण आहेत. पण ती कुठून येतात ते मला नाही माहित. ते साहेबच दाखवू शकतील."

निशा हसली.

"असुदे. जेवढं तुला माहित आहे तेवढं दाखव."

तिने सांगितलं. थोडा वेळ तिथे फिरून ते पुन्हा लिफ्टमध्ये शिरले. तो थेट थर्ड फ्लोअरला आलेला पाहून तिला आश्चर्य वाटलं.

"फोर्थ फ्लोअरला नाही जायचं का?"

निशाने विचारलं .

"मी मुद्दामून नाही जात. मोठ्या साहेबांना पण आवडत नाही. त्या फ्लोअरवर सगळी व्यवस्था आपल्या सेवन्थ फ्लोअरसारखीच आहे. फक्त तिथे साहेबांचे मॉम आणि डॅड राहतात."

"अच्छा!"

"तुम्हीही लक्षात ठेवा, सतत आपल्या फ्लोअरवर आलेलं तुमच्या सासूला आवडणार नाही. सो बेटर आहे की त्या स्वतःहून बोलवत नाहीत तोवर तुम्ही जाऊ नये."

चार्ल्सची अशी वॉर्निंग देणं निशाला आवडलं नव्हतं. म्हणजे एवढी वाईट असेल का सासू असं तिच्या मनात येऊन गेलं. पण इथे तिला समजून घेईल असा फक्त चार्ल्सचंच वाटत होता. त्यामुळे सध्या तो सांगतोय ते ऐकायचं हे तिने ठरवलं होतं. ते थर्ड फ्लोअरवर आत आले.

"इथे मोठ्याने बोलू नका."

तो हळू आवाजात म्हणाला. तसं निशाने त्याला नजरेनेच का म्हणून विचारलं. त्याने दूर खेळत असलेल्या अदा आणि आरवकडे बोट दाखवलं.

"हा गेमिंग झोन आहे. सुट्टी असते तेव्हा आणि संध्याकाळी शाळेतून आल्यावर दोघेही इथेच असतात. शक्यतो आवाज करू नका. अदाचं लक्ष गेलं तर तुम्हांलाही इथेच खेळत बसावं लागेल."

चार्ल्सने तिला हळू हातानेच लिफ्टमध्ये चलण्याचा इशारा केला. तो फ्लोअर न्याहाळत ती लिफ्टमध्ये शिरली. मुलांसाठी पण हाय क्लास व्यवस्था केली होती त्याने. ते तसेच सेकंड फ्लोअरवर आले. तिथे अगदी प्रशस्त अशी जिम होती. त्यात स्विमिंग पूलही होता.

"ही जिम पण ह्यांची आहे?"

"हो. साहेब रेग्युलर येतात. तुम्हांला सवय असेल तर तुम्हीही येऊ शकता. साहेबांचे कजीन्स वगैरे येतात तेव्हा तेही इथे असतात मॉर्निंगला."

त्याने माहिती दिली.

"मला आवड नाही व्यायामाची."

तिने हसूनच सांगितलं. ते तिच्या दिसण्यावरून समजतच होतं. आधीच बारीक होती ती! त्यात फक्त बारीक व्हायला जिम जॉईन करायची असते असे तिचे विचार होते.

"चला आता. जाऊया परत."

त्याने सेवन्थ फ्लोअरचं बटणंम दाबलेलं पाहून तिने विचारलं,

"अरे, बिल्डिंग आठ मजली आहे ना? मग पहिला आणि आठवा फ्लोअर नाही दाखवलास."

"तिकडे फिरकुही नका. मलाही जायला परमिशन नाही. पहिल्या फ्लोअरवर मीटिंग रूम आहे. बऱ्याचदा अदा आणि आरवच्या हट्टामुळे साहेबांना घरी थांबावं लागतं. मग ते तिथूनच काम करतात. आठव्या फ्लोअरवर स्टडी रूम आहे मोठी, ओपन टेरेस आहे आणि ड्रिंकिंग सेक्शन आहे. त्या फ्लोअरला लॉक असतं. चावी साहेबांकडे असेल."

तिने फक्त मान डोलावली.

'डेव्हील प्रिन्स! ड्रिंक तर करणारच! अजून काय काय ऐकावं लागणार आहे काय माहित! कसं मॅनेज करणार मी इथे? मुळात यांच्या जगात मी कुठे आहे तेच मला समजत नाही आहे.'

विचार करतच ती वर आली.

"तुम्ही थोडा वेळ आराम करा."

चार्ल्सने तिला सांगितलं. तिने होकार दिला. ती आदित्यच्या बेडरूमपर्यंत आली. पण तिला गेस्टरूमचा प्रसंग आठवला. त्याला नाही वाटत असेल मी त्याच्या रूममध्ये जावं तर? तिने आपला विचार बदलला. ती अदाच्या रूममध्ये आली आणि तिथेच झोपली.