मागील भागात..
निशा आणि आदित्य त्यांच्या रूममध्ये बसून बोलत होते. ती निशब्द! तो वैतागला होता. पण स्वतःला तिच्यावर ओरडू देत नव्हता. त्यांनी एकमेकांना आपण दिवसभर काय करतो ते सांगितलं. त्याने तिला आजपासून ह्याच रूममध्ये झोपायला सांगितलं. तिने बॅग्ज अनपॅक करायला सुरुवात केली.
आता पुढे..
संध्याकाळची वेळ होती. अचानक निशाला किचनमध्ये आलेलं पाहून चार्ल्स दचकला.
"निशाताई, तुम्ही इथे काय करताय?"
"मी काहीतरी मस्त खायला बनवायचा विचार करत आहे चार्ल्स. मला सांगशील का की कुठे काय सामान ठेवलंय?"
चार्ल्स जरासा चमकलाच. तिने आल्यापासून किचनमध्ये काही खास इंटरेस्ट दाखवला नव्हता.
"तुमची तब्येत ठीक नाही आहे निशाताई. मला बोलणी खावी लागतील जर तुम्ही अशा परिस्थितीत काम केलं."
तिने काहीश्या निश्चयाने त्याच्याकडे पाहिलं.
"मला जे करायचं आहे ते मी माझ्या घरात करू शकत नाही का आता?"
तिच्या प्रश्नाने तो गडबडला.
"तसं नाही ताई."
"बरं झालं की तसं नाही आहे. आता मला सांगशील का सामान काय कुठे ठेवलं आहे?"
त्याने फक्त होकारार्थी मान डोलावली. एकेक शेल्फ उघडत, एकेक ट्रॉली ओपन करून तो तिला दाखवत होता की कुठे काय ठेवलेलं आहे. याआधी किचनमध्ये फार रेअरली दिसणारी ती सगळं नीट लक्षात ठेवत होती. आदित्यच्या बोलण्याचा परिणाम होता तो. हे आपलंही घर आहे हे तिच्या मनात पक्कं बसलं होतं. तसंही आता आपला संसार आपल्यालाच पाहायचा आहे हा विचार करूनच ती बाहेर आली होती.
"आरव आणि अदाला काय आवडतं खायला?"
"चॉकलेट कुकीज आवडतात दोघांनाही. तसं तर गोड असं काहीही बनवलंत तर आवडतं त्यांना. पण चॉकलेट कुकीज वीकपॉईंट आहे दोघांचाही."
चार्ल्सने तिला माहिती दिली.
"बरं. मला चॉकलेट कुकीज बनवता नाही येतं. पण मला त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीचं काहीतरी बनवायचं आहे. तुला येतात का बनवता?"
"हो. मी मेन कुक आहे इथला गेली काही वर्षे."
त्याच्या बोलण्यात गर्व होता. तिला तो जाणवला. पण तिला काही वाईट वाटण्याचा प्रश्न नव्हता.
"चांगलंय. मला शिकव मग कसे करायचे ते."
त्याने नाईलाजाने होकार दिला. त्याच्या मनात नव्हतं की तिला शिकवावं. जर तिला सगळं यायला लागलं तर तो काय करणार होता इथे? आदित्यने त्याला बाहेरच काढलं असतं.
"डोन्ट वरी चार्ल्स! मी रोज नाही बनवणार आहे. तुझीच आहे ही जबाबदारी. तसंही मी तुला जॉबवरून काढू नाही देणार. सो रिलॅक्स."
ती वरचा एक शेल्फ बंद करत म्हणाली. तसा तो चमकला. ती साधी आणि शांत होती. पण चौकस आणि हुशार होती.
"नाही, तुम्ही काय विचार करताय! मी शिकवतो तुम्हांला."
"आणि हा, आदित्यना काय आवडतं?"
तिच्या तोंडून आदित्यचा असा उल्लेख ऐकू चार्ल्सला समजेना की अर्ध्या तासाच्या बोलण्यात एवढं काय बदललं.
"साहेबांना काहीही आवडतं. म्हणजे शक्यतो ते घरी जेवत नाहीत. बाहेर मीटिंग्ज असल्या आणि उशीर होणार असला की बाहेरूनच जेवून येतात. त्यामुळे कधी घरी आले तर असेल ते खातात."
तिने चार्ल्सकडे एक थंड कटाक्ष टाकला.
'इतकी वर्षे काम करून काय फायदा जर तुला हेच माहित नाही आहे की तुझ्या मालकाला काय आवडतं? ठीक आहे. आज मी काहीतरी बनवून देईन. पण मला तरी माहित हवं की डेव्हील प्रिन्सची आवड काय आहे. डेव्हील प्रिन्स असला म्हणून काय झालं, प्रिन्ससारखी ट्रीटमेंट तर मिळाली पाहिजे ना!'
स्वतःशीच विचार करत ती हसली.
"काय झालं हसायला? माझं काही चुकलं का ताई?"
चार्ल्सने तिला असं अचानक हसताना पाहून विचारलं.
"न.. नाही काही. ते मला काहीतरी दुसरंच आठवलं. बरं तू कुकीज कसे करायचे शिकव मला. चल लवकर."
त्यानेही लगेच होकार दिला.
रात्री सर्वजण एकत्र जेवायला बसले होते. आदित्य आरवसोबत बोलत होता. अदा आपल्या नेहमीच्या कंप्लेंट करायला विसरली नव्हती की दादा तिला फार त्रास देतो. निशाने चार्ल्सच्या मदतीने सगळं जेवण डायनिंग टेबलवर आणलं. आदित्य तिची लगबग पाहत होता.
"निशा, तुझी तब्येत कशी आहे आता?"
त्याने अचानक विचारलं.
"मी ठीक आहे."
तिने उत्तर दिलं आणि परत काहीतरी आणायला आत गेली.
"तू एवढी दगदग का करते आहेस? मी तुला रेस्ट करायला सांगितली होती. इव्हन डॉक्टरनेही तेच सांगितलं."
आदित्य वैतागूनच म्हणाला. किती वेळा लहान मुलांना समजवतात तसं समजावावं लागणार आहे देव जाणे! असे भाव त्याच्या चेहऱ्यावर होते.
"मी ठीक आहे आदित्य. चला जेवायला सुरुवात करूया."
तिने कुकीज आणत समोर ठेवले आणि ती त्याच्या बाजूला असलेल्या रिकाम्या खुर्चीवर बसली. त्याचं लक्ष तिच्या त्या हाकेतच अडकलं होतं. छान वाटत होतं तिच्या तोंडून स्वतःचं नाव ऐकणं! आरव आणि अदा मात्र त्या कुकीजकडे पाहत होते.
"थँक्स चार्ल्स! फक्त तुलाच माहित आहे आम्हांला काय हवं असतं."
आरव हसून म्हणाला. अदानेही तोवर एक कुकी उचलला होता.
"यम..! पण चार्ल्स टेस्ट डिफरंट आहे. आय मिन तू बनवल्यासारखे वाटत नाही आहे."
अदाच्या पटकन फरक लक्षात आला होता. आरवनेही टेस्ट केले. त्याला जाणवलं की चव वेगळी आहे.
"मी नाही केले ते आज. तुमच्या मम्माने बनवले आहेत तुमच्यासाठी."
चार्ल्स हसून म्हणाला.
"ओह, रिअली? थँक्स मम्मा! आय लव्ह यु!"
अदाने हसून अजून एक उचलला. आदित्यला हे पाहून फार बरं वाटत होतं. ती किचनमध्ये याआधी कधी गेली नाही जास्त हे तिनेच त्याला सांगितलं होतं. ती त्यांना फॅमिली म्हणून स्वीकारतेय यापेक्षा बेस्ट काहीच नव्हतं. त्यानेही त्यातला एक कुकी घेतला. आरवने मात्र आपल्याला आवडत असूनही तो कुकी प्लेटमध्ये परत ठेवला आणि आपल्यासमोर वाढलेलं बाकीचं जेवण खायला सुरुवात केली. आदित्य आणि निशा दोघांनीही ते एकाच वेळी नोटीस केलं. निशाचा तर चेहरा उदास झाला होता.
"आरव, व्हॉट इज धिज? तू एक बाईट घेतला आहे ना त्याचा? त्या प्लेटमध्ये का ठेवलं मग परत? फिनिश इट!"
आदित्य रागानेच बोलला. तसं त्याने रागाने सर्वांकडे पाहिलं.
"आय टोल्ड यु बिफोर, ती माझी मम्मा नाही आहे. आय डोन्ट वॉन्ट हर. मला तिच्या हातचं काहीही नको आहे. तिने मम्मा म्हणून काही नाही करायचं माझ्यासाठी. चार्ल्स तुला माझ्यासाठी जेवण बनवता येत नसेल तर तसं क्लिअर सांग. मी काहीतरी ऑर्डर करेन ऑर एल्ज स्वतः बनवून घेईन."
आरव रागातच म्हणाला.
आदित्यला मात्र फार राग आला होता. तो रागाने उठणार तोच त्याच्या बाजूला बसलेल्या निशाचा हात त्याच्या हातावर होता. ती त्याला थांबवत होती.
"आरव!"
तिने हाक मारली. तसं त्याने आपली रागीट नजर तिच्यावर वळवली.
"आरव, लिसन. जेवणावर राग काढायचा नाही. असं केलं तर देवबाप्पा रागावतो. मी तुझी मम्मा म्हणून नाही बनवलं जेवण. हे कुकीज अदाच्या मॉमने आणि तुझ्या आंटीने बनवले आहेत असं समज. तुझे फेव्हरेट आहेत ना? मग असं नो नाही म्हणायचं."
निशाने सांगितलं. तसं त्याने विचार केल्यासारखं तिच्याकडे पाहिलं. निशा उठून त्याच्या बाजूला येऊन बसली.
"लूक आरव, माझा फोर्स नाही आहे की तू मला मम्मा म्हणून एक्ससेप्ट करावंसं. मी तुझ्या डॅडची वाइफ आहे आणि अदानेही मला तिची मॉम म्हणून स्वीकारलं आहे. पण ते दोघेही तुला फोर्स नाही करणार की तुही तेच करावंसं. तू डॅडला अजिबात घाबरू नकोस. मॉम तर नाही, पण आंटी म्हणून तरी एक्ससेप्ट करू शकशील का मला?"
त्याने मान हलवत होकार दिला. तसंही समकर असलेले चॉकलेट कुकी तर विकपॉईंट होता ना! तशी ती हसली. तिने तो कुकी घेऊन त्याच्या हातात दिला.
"धिस इज फॉर यु फ्रॉम युअर आंटी!"
ती हसून म्हणाली. त्यानेही तो कुकी खाल्ला. आदित्यला ते आवडलं नव्हतं. मात्र त्याने निशाकडे पाहिलं. ती स्वतःच कसल्यातरी विचारात हरवली होती.
**************
क्रमशः
निशिगंधा..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा