Login

रंग प्रेमाचा! - ११

रंग प्रेमाचा!
मागील भागात..

आदित्यला निशा सापडली. निशाने त्याला सगळं काही सांगितलं. तिला व्यवस्थित समजावून त्याने घरी पाठवून दिलं. त्या सेल्सगर्लचा जॉब काढून घेतला आणि मॅनेजरचीही सॅलरी हाफ कट केली आहे. मॅनेजरने त्या सेल्सगर्लला आदित्यच्या आईला किंवा निशाला भेटायला सांगितलं आहे.

आता पुढे..

         आदित्य घरी आला. त्याची नजर सगळीकडे फिरली. तो आपसूक अदाच्या रूमकडे वळला. निशा तिथे नव्हती आणि अदाही तिथे नव्हती. मग त्याने आरवच्या रूमचं दार उघडलं. आरवच्या रूममध्ये आरव आणि अदा झोपलेले होते. दोघांच्याही अंगावर पांघरूण व्यवस्थित घातलेलं होतं. त्यावरून निशा किंवा चार्ल्स त्यांना झोपवून गेले आहेत हे त्याला समजलं. तो मागे वळणार तोच चार्ल्स त्याला दिसला.

"फार रडत होते का?"

त्याने आपसूकच विचारलं.

"हो. मी किती सांगत होतो, तरी ऐकतच नव्हते. सारखं तुम्ही दोघे पाहिजेत म्हणून हट्ट चालवला होता. नंतर निशाताई आल्या ना, त्यांनी काहीतरी सांगून झोपवलं आहे."

आदित्यने मानेनेच समजलं असा इशारा केला आणि तो आपल्या रूमकडे वळला. तिथेच बेडवर उशीत तोंड खुपसून ती झोपलेली होती. तिच्या अंगावरचं ब्लॅंकेट अस्ताव्यस्त झालेलं होतं. त्याने ती ब्लॅंकेट तिला नीट ओढून दिलं आणि तिच्या केसांतून अलगद हात फिरवत तो स्टडी रूमकडे निघून गेला. जसा तो बेडरूमचं दार ओढून बाहेर निघून गेला, तसं तिने उशीत खुपसलेलं डोकं लगेच वर उचललं. हो जागीच होती ती! आपल्या केसांतून त्याने हात फिरवलेला आठवून ती गालातच लाजली आणि तिने पुन्हा तोंड उशीत खुपसलं.

         रात्री आदित्यने स्टडीरूममध्येच जेवण मागवून घेतलं होतं. त्यामुळे फक्त निशा, अदा आणि आरव गप्पा मारत जेवले. हट्टाने निशाने चार्ल्सलाही आपल्यासोबत जेवायला बसायला लावलं. ती खरंच एक प्रॉपर मिडल क्लास गर्ल होती. घरी काम करत असला म्हणून काय झालं? जेवताना सगळ्यांनी एकत्रच जेवायचं असंच तिच्या घरी चालायचं. तिची आई काम करायला आलेल्या लोकांनाही आग्रह करून सोबतच जेवायला बसवायची. तो गुण निशाने अगदी बरोबर उचलला होता. तसं अजून आदित्य किती जास्त संपत्तीचा मालक आहे याचा तिला अंदाजही नव्हता. आमंत्र ते समजल्यावरही तिची वृत्ती बदलणं शक्यच नव्हतं. चार्ल्स मात्र दबकत, दहावेळा विचार करत मग जेवायला बसला होता. त्याला मनोमन मात्र बरं वाटलं होतं. काल आलेली ती मुलगी, एव्हासारखं त्याच्यावर बॉसिंग न करता त्याला आपल्यासोबत आपल्या फॅमिलीचा भाग मानत होती. जेवल्यानंतर मुलांना परत झोपवून निशा आपल्या रूममध्ये येऊन बसली. निशाला दिसलं की निशांतचा मेसेज आलेला आहे. तिने तो मेसेज ओपन केला.

"हाय दीदी! आय मिस यु सो मच! तू तर विसरूनच गेली मला. म्हणून मी मेसेज केला. तू कशी आहेस? जीजू कसे आहेत? आणि ते बेबीज.."

तिला हसूच आलं त्याचा मेसेज पाहून. त्याला तिची फार काळजी आहे हे तिला माहित होतं.

"मी एकदम ठीक आहे बाळा. आम्ही सगळे ठीक आहोत. तू तर बेबीजना पाहिलंच नाहीस ना? त्यांना वेळ असेल तेव्हा तुझी आणि त्यांची व्हिडीओ कॉलवर ओळख करून देईन हा? इथे शाळांचं शेड्युल पण जबरदस्त आहे. आपण तर बोर्डाला पण एवढे शिस्तीत गेलेले आठवत नाही मला. असो.. देश बदलला की नियम बदलणारच."

निशांत नेमका ऑनलाईन होता.

"नशीब तू रिप्लाय केलास. हो तिकडे सगळं स्ट्रिक्ट असतं मुलांसाठी असं ऐकलंय मी. आपली शाळा बेस्ट होती गं!दीदी, बेबीजचे नाव काय आहेत गं? मी विसरलो ते."

"अदा आणि आरव."

"दोघेही खूप लहान आहेत का?"

"फार नाही. अदा पाच वर्षांची आहे आणि आरव सात वर्षांचा आहे."

"वा! जीजू तर कंटाळत असतील ना? तीन-तीन लहान मुलं आहेत घरात."

"तीन?"

तिने आधी रिप्लाय केला आणि मग तिच्या लक्षात आलं.

"गधड्या, माझी थट्टा करतोस! बघ हा, रागावले तर रिप्लायच करणार नाही."

"आली मोठी! मग मी जीजूना कॉल करेन."

"त्यांचा नंबर आहे का तुझ्याकडे? आला मोठा कॉल करणार!"

"मग काय? आहे की माझ्याकडे नंबर. त्यांनी मला मेसेज पण केलेला तुम्ही पोहोचलात ते सांगायला. तुला बोलले नाहीत काय?"

निशा तो मेसेज पाहतच राहिली.

'फक्त माझ्याकडेच कॉन्टॅक्ट नंबर नाही का ह्यांचा? पण ह्यांनी कधी विचारलं पण नाही. त्यांच्याकडेही माझा कॉन्टॅक्ट नंबर नाही आहे. काय चाललंय कळत नाही मला!'

"झोपलीस काय गं?"

निशांतचा पुन्हा मेसेज आला होता.

"हो मी जातेय झोपायला. अकरा वाजत आले इथे."

"अगं दीदी इकडे सकाळ आहे. म्हणून तर मी जागा आहे. नाहीतर मी रात्री लवकर झोपतो."

"हो मग. गुणी बाळ ते. चल बाय! गुड नाईट!"

मेसेज टाकून तिला मोबाईल बाजूला ठेवला. पण पलीकडून 'गुड मॉर्निंग' टाकून ठेवायला निशांत विसरला नव्हता.

ती शांत बसून राहिली होती. तिला घरची फार आठवण येत होती. बेडवर झोपत तिने चेहऱ्यावरून ब्लॅंकेट ओढून घेतलं आणि ती मुसमुसत होती. नेमका त्याच वेळेला आदित्य आत आला. त्याने बाजूच्या टेबलवर आपला मोबाईल आणि लॅपटॉप ठेवला. त्याला तिच्या मुसमुसण्याचा आवाज आला. त्याला वाटलं की आज झालेल्या प्रकारामुळेच ती रडत आहे. तो पटकन बेडजवळ आला आणि त्याने अलगद तिच्या डोक्याला टॅप केलं.

"निशा, काय झालं? का रडत आहेस?"

ती काहीच बोलली नाही. पण तिच्या रडण्याचा आवाज पूर्णतः बंद झाला. त्याने हळूच तिच्या चेहऱ्यावरचं ब्लॅंकेट बाजूला ओढलं.

"काय झालं तुला? का रडत आहेस?"

त्याने बेडवर तिच्या बाजूला बसत विचारलं. तो बाजूला बसलेला पाहून ती उठून बसली. पुन्हा तिच्या गालावर अश्रू ओघळत होते.

"मला घरची आठवण येतेय. मला घरी जायचं आहे."

"काय?"

आदित्यला हसू आलं.

'दोन कमी वाटत होती म्हणून अजून एक लहान बाळ घेऊन आलो आहे मी. ते पण अगदी सातासमुद्रपल्याडहुन! कसं व्हायचं हिचं! अजून आठवडा नाही झाला तरी ही अवस्था आहे.'

"हसू नका. तुमच्या घरचे इथेच आहेत. त्यामुळे तुम्हांला माझ्या फीलिंग समजत नाही आहेत. तुम्हांला हे सगळं सोडून भारतात यायला लागलं असतं ना तर समजलं असतं."

तिने रागाने त्याच्याकडे पाहिलं. तो तिच्या जवळ सरकला आणि त्याने आपला एक हात तिच्या मागून बेडवर ठेवला. तिने ते पाहिलं.

"तुला आठवण येतेय यावर नाही हसलो मी. पण हे घरी जायचंय म्हणजे काय गं? चार पावलांवर आहे का माहेर तुझं?"

त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून तीही हसली.

"सॉरी! ते पटकन बोलून गेले. मला माहित आहे असं दरवेळेला आठवण आल्यावर माहेरी नाही जाता येणार."

"व्हिडीओ कॉल कर ना. आपल्याकडे रात्र आहे म्हणजे तिकडे दिवस असेल. थोडा वेळ सर्वांशी बोलत बसलीस तरी चालेल."

आदित्यने सांगितलं.

"नाही नको. निशांतला सांगितलं मी व्हिडीओ कॉल करते म्हणून. पण नंतर कधीतरी करेन. मुलं जागी असली पाहिजे. त्यांची भेट घडवून द्यायची आहे सगळ्यांसोबत."

निशा हसून म्हणाली.

तो तिच्याकडे पाहतच राहिला होता. अदा आणि आरव! नावं छोटीशी असली तरी जबाबदारी मोठी होती. अदाचं निशाला लगेच मॉम म्हणून स्वीकारणं यावरूनच आपली निवड आणि आपला निर्णय अचूक होता याची खात्री आदित्यला मिळाली होती. त्यात आरवने मॉम म्हणून नाही तर निदान आंटी म्हणून तिला एक्सेप्ट केलं होतं, हेही त्याच्यासाठी काही कमी नव्हतं. आरवचा स्वभाव त्याला माहित होता. काहीसा त्याच्यावरच गेला होता तो!

"जेव्हा व्हिडीओ कॉल करशील तेव्हा मलाही सांग. म्हणजे मीही बोलेन त्यांच्याशी."

तो म्हणाला. तसं तिनेही त्याच्याकडे पाहिलं.

'हे मात्र डेव्हील प्रिन्ससारखं वागणं नाही आहे. माझ्या फॅमिलीसोबत अटॅच व्हावंसं वाटलं हेच खूप आहे. नाहीतर आम्ही कुठे आणि हे कुठे असली परिस्थिती आहे.'

ती विचार करतच होती तोच त्याच्या बोलण्याने तिची तंद्री तुटली.

"रात्र खूप झाली आहे. मला उद्या ऑफिस आहे. मुलांच्याही शाळा असतील. झोपूया आता."

तिनेही होकारार्थी मान डोलावली. ते एकमेकांपासून अंतर राखून बेडवर झोपले. मात्र मनातलं अंतर हळूहळू कमी होत असलेलं दोघांनाही जाणवलं होतं. त्याचा नात्याला चान्स देण्याचा विचार सफल होत होता. तर तिचा अंतर मेंटेन करण्याचा विचार मात्र हळूहळू विरत चालला होता.