Login

रंग प्रेमाचा! - भाग १२

रंग प्रेमाचा!
मागील भागात..

आदित्यला चार्ल्सकडून समजलं की निशाने मुलांना झोपवलं आहे. निशा जागीच होती जेव्हा आदित्यने तिच्या केसांतून हात फिरवला. निशाने चार्ल्सलाही आपल्यासोबत जेवायला बसायला लावलं. निशांत आणि निशाचं बोलणं झालं. तिला घरची फार आठवण येत होती. आदित्य आणि निशा एकमेकांपासून अंतर राखून बेडवर झोपले. मात्र मनातलं अंतर हळूहळू कमी होत असलेलं दोघांनाही जाणवलं होतं.

आता पुढे..

            दुसऱ्या दिवशी आपल्या आधी निशाला किचनमध्ये पाहून चार्ल्सला आश्चर्य वाटलं. ती हे करण्यासाठी फार लवकर उठली होती.

"गुड मॉर्निंग निशाताई! काय करत आहात?"

"गुड मॉर्निंग चार्ल्स! मी नाश्ता बनवतेय. तू कधी कांदाभजी खाल्ली आहेस? नसेलच. इथे कुठे मिळते म्हणा. मी करतेय मस्त. इंडियन स्टाईलमध्ये प्रिपेअर करते."

"अं.. मी खाल्ली नाही कधी. पण आय थिंक सरांना आवडत नाही ऑईली जेवण. म्हणजे ते शक्यतो नाही खात ऑईली काहीही."

निशाने त्याच्याकडे रागानेच पाहिलं.

"त्यांना नक्की काय आवडतं आणि काय नाही ते आधीच तुला माहित नाही. त्यात तू काय सांगतोयस मला! तू फक्त मुलांच्या ब्रेकफास्टचं बघ जरा. म्हणजे मी नूडल्स केले आहेत तसे. पण टिफिनसाठी काय करावं ते बघ फक्त."

त्याला एवढंच सांगून ती पून्हा आपल्या कामाकडे वळली. तिचे हे उपद्व्याप आदित्यला कितीसे आवडतील याबाबत चार्ल्सला शंकाच होती. पण आपण कशाला बोलायचं म्हणून तो शांत राहिला.

**************

         ती शांतपणे समोर बसलेली होती. त्यांनी दिलेलं स्वीट लाईम ज्यूससुद्धा तिला गोड लागत नव्हतं. ती सुन्नपणे बसली होती.

"मॅम, प्लिज काहीतरी बोला. माझं असं इंटेंशन मुळीच नव्हतं. मला लक्षात आलं नव्हतं की निशा मॅम अशा हर्ट होतील. मुद्दाम स्वतःचा जॉब घालवून घ्यायला मला वेड नाही लागलंय."

"आपण कडवट बोललो की समोरचा हर्टच होणार. त्यात कॉमन सेन्स वापरला तरी चालतो नाही का? हे बघ, जर शक्य असतं तर मी तुला मदत केली असती. कारण मला त्यात काही प्रॉब्लेम नाही. पण याबाबतीत आदित्य माझं ऐकेल असं मला वाटत नाही. आधीच निशासोबत त्याचं लग्न जरा गडबडीत झालेलं आहे. ती त्याची जबाबदारी आहे. तू त्याला हलक्यात घेतलंस हीच तुझी मोठी चूक आहे."

तिला अक्षरशः रडावंसं वाटत होतं.

"मॅम, काहीच ऑप्शन नाही का? मला कुठे जॉबच नाही मिळणार. तुम्हांला माहित आहे बॉसची पॉवर किती आहे. असं नका करू प्लिज! बॉस ऐकतील तुमचं."

आदित्यच्या आईने नकारार्थी मान डोलावली.

'हिला आता काय सांगावं मी? फक्त मी आणि त्याच्या डॅडने फोर्स केला म्हणून त्याने लग्न केलं. मात्र हा एक निर्णय सोडता त्याच्या आयुष्याच्या कुठल्याच निर्णयात तो मला हस्तक्षेप करू देणार नाही. शेवटी काहीही झालं तरी मी त्याची सावत्र आई आहे. तो माझ्यावर तेवढा विश्वास, तेवढं प्रेम नाही करू शकत जेवढं तो स्वतःच्या आईवर करत होता. तो मला मॉम म्हणतोय, माझा आदर करतोय आणि घरातल्या प्रत्येक निर्णयात माझ्या मताला प्राधान्य देतोय हेच खूप आहे माझ्यासाठी. उगाच त्याच्या आयुष्यात बाहेरच्या कोणासाठी तरी इंटरफेअर करायला गेले तर आमचं आधीच कमकुवत धाग्याने बांधलेलं नातं तुटून जाईल.'

त्यांना विचारात गढलेलं पाहून ती अजूनच घाबरली.

"मॅम, प्लिज से समथिंग."

त्यांनीही तोवर काहीतरी विचार केला होता. या प्रकारात न पडता तिला मदत करण्याचा एकमेव पर्याय त्यांना सुचत होता.

"यात माझी तुला कितपत मदत होईल मला माहित नाही. पण निशा तुला नक्की मदत करू शकते. खूप गोड मुलगी आहे ती! तू जर ती माफी मागितलीस तर कदाचित ती आदित्यसोबत बोलू शकेल."

"मग मी त्यांना कसं भेटू?"

"त्यांच्या घरी गेलेलं तर आदित्यला आवडणार नाही. थोड्या वेळाने मी तिला खाली बोलवून घेईन. तू इथे थांब. ती इथे येऊ दे. मग तिच्याशी बोल."

"थँक यु सो मच मॅम!"

ती आता निशाची माफी कशी मागावी याचा विचार करत होती.

**************

मुलांना थोडीशी कांदाभजी आणि नूडल्स देऊन निशा आदित्यची वाट पाहत होती. तिने अजूनही नाश्ता केला नव्हता. ती त्याच्यासाठी थांबली होती. टाय एडजस्ट करत आदित्य बाहेर आला होता. निशाने मस्त निळा पंजाबी ड्रेस घातला होता. तिच्यासाठी कितीही शॉपिंग केली असली तरी ती आपल्याला आवडतं ते घालायला काही सोडणार नव्हती. पण तिचा साधा आणि सिंपल लूक तिला छान दिसतो असं त्याचं मत होतं. फार गोड दिसत होती ती!

"गुड मॉर्निंग!"

आदित्यचा आवाज कानावर आला तसं सगळ्यांनी वळून त्याच्याकडे पाहिलं आणि गुड मॉर्निंग विश केलं. चार्ल्स तर पटकन उठला. निशाने त्यालाही कांदाभजी खायला बसवलं होतं. आदित्यसमोर बसलेलं बरोबर दिसणार नाही या विचाराने तो उठला होता.

"तू काय करत आहेस चार्ल्स?"

आदित्य तोवर तिथली एक खुर्ची ओढून बसला होता.

"सॉरी बॉस. ते.."

चार्ल्सचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधी निशाच बोलली.

"मी सांगितलं त्याला नाश्ता करायला आमच्यासोबत बसायला. तो नंतर एकटा कशाला बसायला हवा? आपल्याच फॅमिलीत राहतो. सर्वानी एकत्रच करायचा ना नाश्ता?"

निशाने थोडंसं घाबरतच म्हटलं. तिची ती भीती आदित्यलाही जाणवली. खरंतर त्याला फार फरक पडत नव्हता या गोष्टीने.

"फाईन. बस रे. बसून खा."

आदित्य म्हणाला. तसा चार्ल्स शॉक झाला होता. हा आदित्य तो नव्हताच जो उठसूट त्याच्यावर ओरडत असायचा. त्याच्यातला बदल त्यालाही जाणवत होता.

"काय केला मग नाश्ता बेबीज?"

"डॅड, इट्स प्रीती गुड!"

अदा बत्तीशी दाखवत म्हणाली.

"येस डॅड. लूक, हे खूप क्रिस्पी आहे."

आरवने एक कांदाभजी आदित्यला दाखवत म्हटलं. कांदाभजी पाहून आदित्यचे हसरे एक्सप्रेशन्स रागात बदलले.

"चार्ल्स, हे का केलंय? तू हा ब्रेकफास्ट करायला कधी शिकलास?"

त्याचा आवाज अचानक चढलेला पाहून चार्ल्सच्या हातातली भजी खालीच पडली. अदा आणि आरवने तर आत धूम ठोकली. डॅडचा आवाज एवढा चढला की अजिबात एक क्षणही समोर थांबायचं नाही एवढं त्यांना समजत होतं. निशा बघत होती की इथे काय चाललंय. तिला आधीच काही समजत नव्हतं. त्याला ऑईली आवडत नाही असं चार्ल्सकडून समजल्यावर तिने दोन ते तीनदा टीश्यूने बरंचसं तेल टिपून घेतलं होतं.

"सॉरी बॉस, ते मी.. "

"वेट, तुला तर हे येतच नसणार. आय नेव्हर आस्क्ड यु फॉर इंडियन ब्रेकफास्ट! निशा, तू बनवलं आहेस का हे?"

त्याची रागीट नजर आता तिच्याकडे वळली.

"अं.. ते मी.. कमी ऑईली.."

निशा आता घाबरली होती.

"मूर्ख मुलगी! तुला सांगितलं नाही का चार्ल्सने की मला हे आवडत नाही? मला इंडियन ब्रेकफास्टच आवडत नाही. कधीतरी इंडियन फूड खातो मी. म्हणून दरवेळेला तेच नाही करायचं. नो मोअर इंडियन ब्रेकफास्ट इन द हाऊस! चार्ल्स, ते सगळं जसंच्या तसं डस्टबिनमध्ये फेकून दे."

निशाकडे रागीट कटाक्ष टाकत तो उठला.

"बॉस, निदान नूडल्स.."

चार्ल्स बोलतच होता. जो आदित्यच्या रागीट नजरेने थांबला.

"सकाळसकाळ असे काहीतरी उद्योग करा आणि मग विचारा. निशा, चार्ल्स किचन सांभाळू शकतो. तुला आयडिया नसेल की आम्हाला काय आणि कसं जेवण आवडतं, तर शिकून घे त्याच्याकडून. आमची जेवणाची पद्धत माहित नाही आहे तुला. उगाच काहीतरी करत बसतात. फूलिश पीपल!"

तो रागातच बाहेर निघून गेला. निशा पाहतच राहिली. तिच्या डोळ्यांतून कधी अश्रू ओघळू लागले ते तिचं तिला समजलं नाही. जितकं ती त्यांच्या घरात एडजस्ट होण्याचा प्रयत्न करतं होती तितकं दुसरंच काहीतरी होऊन ती त्याच्या रागाला कारण देत होती. चार्ल्स मान खाली घालून उभा होता. तिची ही अवस्था त्याला पाहवत नव्हती. ती फार गोंधळून जात होती. डायनिंग टेबलवरच्या आवाजाने तिचं लक्ष तिकडे गेलं. चार्ल्स ती सगळी भजी एका प्लेटमध्ये भरत होता.

"ए, ठेव ते तिथे."

ती जवळजवळ ओरडली. त्याला हे अपेक्षित नव्हतं. तो चटकन मागे झाला.

"निशाताई.."

"तू आणि तुझा बॉस दोघेही उडत जा. फुलिश, मूर्ख वगैरे सगळं तुमची आहात. मी नाही. परफेक्ट फॅमिली टाईप वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतेय मी. पण काही चांगलं करायला जावं तर किंमत नाही आहे त्यांना. स्वतः काहीतरी भाजीपाला खात राहतील आणि मुलांनाही तेच खायला लावतील. ३६५ दिवस तोच तोचपणा! आमच्या जेवणाची पद्धत माहित नाही म्हणे! खात बसा काहीतरी बाहेरचं. पाणी पण देऊ नये मी तुमच्यासारख्यांना असं वाटतंय मला. नाहीतर त्या पाण्यात पण दोष दिसतील तुम्हांला. हात नाही लावायचा त्या भजीला. अन्न आहे ते! डस्टबिनमध्ये टाकायचं नसतं अन्न हे सांग तुझ्या बॉसला जाऊन. आला मोठा मला मूर्ख म्हणणार. अक्कलशून्य डेव्हील प्रिन्स कुठला! मी खाईन ते. आता तूच जा ते टिफिन तयार कर आणि मुलांना पाठव तयार करून शाळेत. सगळं तुमचं तुम्ही करत बसा काय ते."

तिचा चढलेला आवाज, तिचा झालेला मनस्ताप पाहून चार्ल्सने तिथून काढता पाय घेतला. त्यात तिचं आदित्यला मूर्ख, अक्कलशून्य वगैरे बोलणं तर.. तो कसा aiknar होता? त्याला मुलांना शाळेत पाठवायची तयारी करायला हवी होती.

**************

त्या काळजीत पडल्या होत्या. घरातल्या स्टाफसमोर एवढा विकोपाला जाणारा वाद झालेला पाहून त्यांना वाईट वाटलं. त्यातही आता त्या सेल्सगर्लचं काम होणं कठीण दिसत होतं.

"मी भेटते तिला. कुठे आहे ती?"

"रूममध्येच आहेत."

त्यांनी मानेनेच समजलं असा इशारा केला आणि त्या तिच्या रूमचा दिशेने गेल्या. दार उघडाच दिसत होता. ती ब्लॅंकेट घेऊन झोपलेली होती. पण डोळे उघडेच होती. छताकडे डोळे लावून तिला असं एकटक पाहत बसलेलं पाहून त्या घाबरल्या.

"निशा!"

त्यांनी हाक मारली. तशी तिने आपली नजर चटकन दाराकडे वळवली. तिचा उतरलेला चेहरा त्यांच्या काळजाचं पाणी करून गेल्या होता. आपण आदित्यला हिच्याशी लग्न करायला तयार करून चूक तर केली नाही ना? असं त्यांना वाटून गेलं.