Login

रंग प्रेमाचा! - १४

रंग प्रेमाचा!
मागील भागात..

मिसेस राठोडनी निशाला त्या स्वतः आदित्यची सावत्र आई असल्याची कल्पना दिली. त्यांनी तिला आदित्यच्या खऱ्या आईबद्दल पण सांगितलं. निशाला ऐकून वाईट वाटलं की आदित्यच्या आयुष्यात काहीच सोपं नव्हतं का? कांदाभजीवरून का वाद झाला त्याचं कारणही समजलं. निशाने त्या सेल्सगर्लला पुन्हा जॉबवर जायला सांगितलं. आदित्य रूममध्ये आला तेव्हा निशा तिथे नव्हतीच.

आता पुढे..

आदित्य तसाच बाहेर आला. त्याने मुलांच्या रूममध्येही पाहिलं. पण निशा तिथे नव्हतीच. ती अशी कुठेच दिसली नाही की त्याचा जीव वरखाली व्हायचा. कारण तिला इथे काहीच माहित नव्हतं. कुठे हरवली तर शोधताना नाकी नऊ येण्याची परिस्थिती! तो तसाच खाली गेला.

"मॉम!"

त्याने बाहेरूनच मोठ्याने आवाज दिला.

"काय रे?"

त्या लगेच मुलांच्या खेळातून उठून समोर आल्या.

"मॉम, निशा कुठे आहे?"

"कुठे आहे म्हणजे? घरीच असेल रे. मगाशी इथून येऊन गेलेली. अदा आणि आरवसोबत बोलली पण. का, काय झालं?"

"मॉम, निशा नाही आहे तिथे. ना आमच्या रूममध्ये आहे आणि ना मुलांच्या."

त्याच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. इकडे अदा आणि आरव धावत त्याच्याजवळ आले होते. डॅड स्वतः प्लेयिंग एरियात आला म्हटल्यावर डॅडने आपल्यासोबत खेळायचं हा त्यांचा अट्टाहास होता. डॅड येत नाही म्हटल्यावर आरव परत गेला. पण अदा कसली ऐकते. ती त्याच्या हाताला धरून त्याला ओढण्यात व्यस्त होती.

"बेबी, वेट अ मिनट. मी मम्माला शोधतो आहे."

आदित्यने अदाला समजवलं.

"पण तू मम्माला का शोधतो आहे?"

अदाने पुन्हा विचारलं.

"कारण मम्मा घरी नाही आहे बेटा. तुला माहित आहे का कुठे गेली आहे ती?"

आदित्यने थोडं वैतागूनच विचारलं होतं. अदाने काहीही करून आता जरा गप्प बसावं या उद्देशाने आलेली रिएक्शन होती ती.

"हो, मला माहित आहे. मम्माने मला सांगितलं की ती गेस्ट रूममध्ये काहीतरी काम करायला गेली आहे. दादा ओरडला तर मी जाऊन मम्माला सांगणार आहे आणि मी मस्ती केली तर दादा जाऊन मम्माला सांगणार. आमचं डील झालंय तसं."

अदाने आपलं वाक्य पूर्ण केलं तसा आदित्य धावतच लिफ्टमध्ये शिरला.

"डॅड, असा काय वागतोय?"

अदाने नाराजी व्यक्त केली.

"बेटा, डॅड मम्माला शोधतो आहे ना? त्याला ऑफिसमध्ये भरपूर स्ट्रेस असेल. म्हणून तो चिडलेला आहे. जेवताना बोलूच ना आपण? तू ये इकडे. बघ हा, आरव जिंकेल नाहीतर."

मिसेस राठोडनी असं म्हणताच अदाने लगेच खेळण्यांकडे धाव घेतली. इकडे आदित्य गेस्ट रूममध्ये आला. तिथल्या एका रूमची लाईट ऑन होती. तो त्या रूमच्या दिशेने गेला. निशा तिथल्या बेडवरची बेडशीट व्यवस्थित करत गाणं गुणगुणत होती.

शायद कभी ना कह सकूँ मैं तुमको
कहे बिना समझ लो तुम शायद
शायद मेरे ख्याल में तुम एक दिन
मिलो मुझे कहीं पे गुम शायद
जो तुम ना हो रहेंगे हम नहीं
जो तुम ना हो रहेंगे हम नहीं
ना चाहिए कुछ तुमसे ज्यादा
तुमसे कम नहीं
(सॉंग- शायद - अरिजीत सिंह, सोर्स- गुगल)

तिला गाणं गुणगुणताना ऐकून त्याला वाटून गेलं की किती छान आहे हिचा आवाज. तरी आपल्याला काहीच येत नाही असं का म्हणते ही? एवढ्यात त्याच्या लक्षात आलं की तो इथे का आला आहे.

"निशा!"

त्याने किंचित रागातच हाक मारली. तिनेही मागे वळून त्याच्याकडे पाहिलं. तो इथे येईल अशी तिला अपेक्षाही नव्हती. आपण दिसलो नाही तरी तो रागात स्वतः जेवून वगैरे घेईल आणि झोपेल असं तिला वाटलेलं.

"तू इथे काय करतेयस?"

ती काहीच बोलत नाही हे पाहून त्याने विचारलं.

"झोपायची तयारी."

तिने दोनच शब्दांत उत्तर दिलं. बस, तिच्या ह्या एकाच सवयीचा त्याला फार राग यायचा. मोजक्याच शब्दांत उत्तरं देणं! मोजक्या नव्हे, तुटपुंज्या!

"तुझ्या डोक्यात काय चाललंय मला समजत नाही. पण असं काहीही होणार नाही आहे. वरती चल. जेवलीस का तू?"

त्याने काळजीने विचारलं होतं. पण ही कुठली समजून घेणार होती?

"हो, जेवले ना. कांदाभजी बरीच शिल्लक होती ना? अन्नाला पूर्णब्रम्ह मानतात आमच्या देशात. डस्टबिनमध्ये टाकून नाही देत आम्ही. मग संपवलं मी ते."

तिच्या बोलण्यातला राग त्याला जाणवला. तसा त्याचा राग विरघळला.

"निशा, तुला मॉमने सांगितलं ना सगळं? ती कांदाभजी माझ्या आयुष्यातली न भरणारी जखम आहे. आय डोन्ट वॉन्ट यु टू डू दॅट!"

"हे सरळ सांगता आलं ना आता? तसं सांगता येत नव्हतं का? एकतर तो चार्ल्स, त्याला तुमच्या आवडीनिवडी काही माहित नाहीत. ऑईली आवडत नाही एवढंच सांगितलं त्याने मला. मग मी कमी तेलकट बनवल्या होत्या. तुम्ही एक काम करा, एक लिस्ट तयार करा, काय आवडतं आणि काय नाही याची आणि लावून ठेवा घरात सगळीकडे. म्हणजे लक्षात राहील माझ्या. जाऊ दे. तसंही मी काही किचनमध्ये परत जाणार नाही. मला कुठे जमतंय तुमच्या पद्धतीचं जेवण, नाही का? उकडं, कच्चं काहीतरी स्वतःही खा आणि त्या बिचाऱ्या मुलांनाही खायला लावा. माझं काय, मी इथेच झोपणार आहे आजपासून. तुम्ही काहीही म्हणा, मी नाही.."

तिच्या मनात साचलेलं सगळं बाहेर निघत आहे हे पाहून आदित्यने तिला बोलू दिलं. मात्र ती परत गेस्ट रूममध्येच झोपण्याच्या निर्णयावर आलेली पाहून तो चटकन पुढे आला आणि त्याने तिला अलगद मिठी मारली. तसे तिचे शब्द तिच्या घशातच अडकले. तिला फार अनपेक्षित होतं ते! त्याच्या हातांचा तिच्या कमरेभोवती पडलेला विळखा तिच्या हृदयात कालवाकालव करून गेला होता. त्यालाही माहित होतं की तिला हे अनपेक्षित आहे. त्याला स्वतःला हे फार धक्कादायक होतं.

'काय करतोय मी! तिला अपेक्षित नसेल हे माझ्याकडून. मी जे नाही करायचं ठरवलं तेच करतोय. पण तू पर्यायच देत नाही आहेस निशा. दुसरा पर्यायच नव्हता तुला गप्प करण्याचा.'

तिचे तर डोळे मोठे झालेले होते.

'आई गं! मला तर ओरडावंसं वाटतंय. हार्टबिट्स किती वाढल्या आहेत! ऐकू जात असतील का डेव्हील प्रिन्सला? ह्यांना झालंय काय? असं कोण करतं? पण.. मला आवडतंय का हे?'

तिच्या मनात उठलेला भावनांचा कल्लोळ शांत होत नव्हता.

"अं..आदित्य.."

तिने कशीबशी त्याला हाक मारली.

"आय एम सॉरी निशा! मी काही गोष्टींवरून खूप जास्त फ्रस्ट्रेट होतो गं. मी तुझ्या घरी आलो होतो तेव्हा सर्वांसमोर सांगितलं होतं ना, की माझ्या वागण्यात एकच फॉल्ट आहे. मी खूप जास्त लगेच रिएक्ट करतो. तेव्हा तर तुला काही प्रॉब्लेम नव्हता. मला वाटलं तू मला माझ्या गुणदोषांसहित स्वीकारलं आहेस."

निशाच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. बोलावं की न बोलावं या संभ्रमात होती ती. कदाचित आदित्यला ते जाणवलं. तो चटकन तिच्यापासून बाजूला झाला.

"निशा, तू हे लग्न तुझ्या मनाने नाही केलं आहेस का? तुला कोणी फोर्स केलेला का?"

त्याच्या अचानक आलेल्या प्रश्नाने यावेळी तिच्या मनातली जखम उघडी पडली होती. पण तिने ठरवलं की ती एकदाच सगळं बोलून टाकणार आहे. परत मागाहून गैरसमज नको.

"फोर्स केला नव्हता. पण सगळी कल्पनाही व्यवस्थित दिली नव्हती. तुम्हांला समजणार नाही मी काय सांगतेय. पण माझे वडील आणि चुलत काका तुमच्या ग्रुपच्या इंडियन ब्रांचमध्ये काम करतात. तुमच्या पॅरेंट्सनी त्यांना अप्रोच केलं होतं. तुम्ही पाच- सहा दिवस सुट्टी काढून माझ्या घरी येण्याआधीच दोन्हीकडून होकार कळवून झालेला होता. माझ्या एका होकाराने माझं घर चालणार होतं. पण एका नकाराने कदाचित त्यांनी बाबांना आणि काकांना कामावरून काढून टाकलं असतं. त्यामुळे मीही काही जास्त विचार नाही केला. मला फक्त जुजबी माहिती देण्यात आली होती आदित्य. हेच की तुम्ही एक अब्जाधीश आहात. एका मोठ्या ग्रुपचे मालक आहात. अमेरिकेत राहता. तुम्हांला पहिल्या बायकोपासून दोन लहान मुलं आहेत आणि ती तुमच्यासोबतच राहतात. एवढंच सांगितलं गेलं मला! मला कोणी एकदाही विचारलं नाही की तुला आदित्य यांची बायको व्हायचं आहे का? खरंतर बायको होणं तरी ठीक आहे. कोणीतरी मला विचारलं पाहिजे होतं की तुला आई व्हायला आवडेल का? अदा आणि आरव फार गोड आहेत. एव्हा मॅम त्यांना सोडून गेल्या यात त्यांचा बिचाऱ्यांचा काहीच दोष नाही. हे सगळं ठीक आहे ओ! पण माझं वय काय? आई बनणं हे जबाबदारीचं काम आहे ना? झेपेल का तुला ही जबाबदारी हे कोणीतरी विचारलं पाहिजे ना? कदाचित अजून दोन-तीन वर्षांनी आपलं लग्न झालं असतं तर हे स्वीकारणं मला सोपं गेलं असतं. पण मीही हे सहज स्वीकारलं, कारण तुम्हांला माहित आहे. माझे मेडिकल रिपोर्ट्स तुम्ही पाहिले आहेतच. ते माझ्या वडिलांनी दाखवले असतीलच याची खात्री आहे मला. आय कॅन नेव्हर बी अ मदर! ते नाही आहे माझ्या नशिबात. त्यामुळे अदा आणि आरवची आई बनायला मला दोन दिवसांचा वेळही लागला नाही. माझी मुलं वाटतात ती मला."

आदित्यचे डोळे पाणावले. हे सगळं असं झालं आहे याची त्याला कल्पना नव्हती. तिचे रिपोर्ट्स त्याला माहित होते. मुळात दगड म्हणावा एवढा स्ट्रिक्ट असलेला तो तिच्यासाठी हळवा होत होता हेही अनोखं होतं.

"निशा.."

"मला सहानूभूती नको आहे आदित्य. आपलं लग्न का झालं, कसं झालं, असे विचार नाही येत माझ्या मनात. कारण मी स्वीकारलं आहे हे. पण तुम्हीच मला दर थोड्या वेळाने हे जाणवून देता की मी परकी आहे. माझी तुमच्या आयुष्यात काही जागाच नाही. मन म्हणेल तेव्हा येऊन ओरडा माझ्यावर. मला कधी समजून घ्यायचा प्रयत्न करू नका. मला माहित आहे तुमचं आयुष्यही सोपं नव्हतं. पण मी केला का तुमच्याकडे काही हट्ट? मागितलं का तुमच्याकडे काही? तुम्ही रागावल्यावर आदळाआपट केली का? मग तुम्ही पण मला नीट सांगाल की हे करू नको तर समजेल ना मला? सतत येऊन ओरडत रहा तर घर का ना घाट का अशी अवस्था होईल माझी. आय फील सो लॉस्ट हिअर!"

ती रडू लागली होती. नकळत तो पुन्हा पुढे झाला. यावेळेला तीही स्वतःहून त्याच्या मिठीत शिरली. त्याचे हात तिच्या कमरेभोवती आणि तिचे हात त्याच्या मानेभोवती घट्ट झाले होते.

"आय एम सॉरी डिअर! आय नेव्हर न्यू धिस! मला माहित आहे मी तुला हर्ट केलं आहे. वन लास्ट चान्स, विल यु गिव्ह इट? मी प्रयत्न करेन की काही गोष्टी समजावून सॉर्ट करता येतील. प्लिज! विल यु?"

तिने फक्त मानेनेच होकार दिला. निशब्दपणे ते तसेच एकमेकांच्या मिठीत उभे होते. अज्ञानातून किती गैरसमज होतात ना! व्यक्त होणं ही प्रेमातील महत्वाची स्टेप आहे. यु कान्ट अफॉर्ड टू मिस इट!

**************
क्रमशः


(हॅलो फ्रेंड्स!
या भागाचा एन्ड पाहून कथा संपली वाटतं असं वाटत नाही आहे ना? नाही बरं. कथा संपली नाही अजून. बहुत कुछ बाकी है!)

निशिगंधा..
0

🎭 Series Post

View all