झाडांचे कम्युनिकेशन

अद्भुत माहिती
संवाद, हा कुठल्याही सजीवांचे एक प्रमुख लक्षण मानले जाते. एकमेकांना माहिती पुरवणं, मदत करणं, ह्या सजीवाच्या जीवन्तपणाच्या, सचेतनपणाच्या काही मुख्य खाणाखुणा. पण ह्याच लक्षणाने एक प्रश्न आपल्याला पडतो, झाडे किंवा वनस्पती, ह्या सजीव आहेत की नाही? त्यांची भाषा आहे का? ते एकमेकांशी संवाद साधू शकतात का? साधत असतील, तर कसा साधतात? आपल्याशी झाडं बोलू शकतात का? आपलं बोलणं, स्पर्श झाडांना समजतो का? झाडं आपल्याला ओळखू शकतात का? झाडं बोलत असतील तर ते आपल्याला कसं समजेल?

काही शास्त्रज्ञांनी ह्या कोड्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला. संशोधन सुरू झालं. आणि चक्क झाडांचा संवाद ऐकू यायला लागला. हो हो! अहो झाडं बोलतात! काही शास्त्रज्ञांच्या मते झाडं जमिनीखाली मुळांच्या आणि फंगीच्या माध्यमातून जोडलेली असतात. आणि ह्याच माध्यमांच्या मदतीने झाडं एकमेकांशी संवाद साधतात. संशोधनात असं आढळून आलं, की झाडं एकमेकांना धोक्याचे संदेश पाठवतात. एकमेकांना सावध करतात. दुसऱ्या झाडांच्या संदेशानुसार संरक्षक पावलं उचलतात. ह्याला वूड वर्ल्ड वेब असही म्हणलं जातं.

जसजसं संशोधन पुढे जातंय तसतशा अनेक आश्चर्यकारक बाबी समोर येतायत. मोठ्या जंगलांमध्ये काही जुनी जाणती झाडं असतात. एखाद्या कुटुंबप्रमुखाप्रमाणे ते झाड आजूबाजूच्या झाडांची काळजी घेतं. छोट्या झाडांना त्यांच्या अडचणीच्या काळात जरुरी मूलद्रव्य पुरवतं. जंगलांमध्ये वनस्पती परस्परसंबंध निर्माण करून एकमेकांना जगण्यासाठी, जगवण्यासाठी मदत करत असतात. रसायनांच्या आधारे एकमेकांना संदेश दिले जातात. त्यामुळे आजूबाजूची झाडं अशा एखाद्या झाडाशी कुटुंबाप्रमाणे जोडलेली असतात.

झाडं ही इतर सजीवांप्रमाणे गोष्टी लक्षात ठेवू शकतात. काही शास्त्रज्ञांच्या मते, झाडं काही महत्वाच्या आठवणी आपल्या पुढच्या पिढीला देतात. इतर सजीवांप्रमाणे झाडांना स्पर्शाची जाणीव असते. झाडाची मुळे स्पर्श समजून घेऊन त्याप्रमाणे आपली दिशा ठरवू शकतात. तसच झाडांना ऐकू देखील येतं. झाडांची पाने अळ्या खातात तेव्हा जो आवाज किंवा ध्वनी उत्पन्न होतो तो निरोगी झाडांना ऐकवल्यावर ती झाडे संरक्षक रसायनं तयार करतात असे आढळून आले आहे.

ह्या अद्भुत संशोधनामुळे वनस्पती जगतातला एक वेगळाच आयाम समोर येऊ पाहतोय. त्यामुळे वनस्पती सचेत असतात हे गूढ हळूहळू उलगडत आहे. हा प्रवास अतिशय रोचक होणार आहे, हे मात्र नक्की. हळूहळू मनुष्य आणि वनस्पती ह्यांच्यातील संबंधांवर प्रकाश पडतोय. निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार उलगडतोय.