Login

कन्फेशन विस्कटलेल्या नात्याचे

नवरा बायकोच्या गोड नात्याला कधी कधी तिखटचा हात लागतो आणि सगळं विस्कळीत होऊन जातं पण त्याचं वेळी कोण्या मोठ्या व्यक्तीने वेळीचं पुढाकार घेऊन प्रश्न मिटवले कि सगळं काही परत अलबेल होऊन जातं अश्याचं आशयची ही कथा


दीप्तीच्या मनात विचारांचं नुसतं काहूर माजलं होतं. कोणत्याही कामात तिचं लक्ष लागत नव्हतं. वेगळे विचार यावेत म्हणून ती काही वेळापूर्वी बागेत जाऊन फेरफटका पण मारून आली होती पण अस्वस्थतेनं तिला तिथेही फारसं करमलं नाही. ती लागलीच घरी परतली होती.

"सांगावं का सगळं आईला? बोलावं एकदा तिच्याशी म्हणजे निदान मन तरी मोकळं होईल. जे काही आहे ते किती दिवस असं मनात साठवून ठेवणार आहे आपण..." दीप्ती मनाशी विचार करत होती.

"पण आपण हे सगळं तिला सांगितल्यावर आई आपल्याला धीर तर देईल पण तिच्या मनाला किती काळजी लागून राहील आपली. सांगावं कि नको मग?" दीप्ती आपल्याचं विचारांच्या गुंत्यात गुंतत चालली होती.

शेवटी नं राहून तिने आपल्या आईला फोन लावला.


"हॅलो आई मला आज जरा बोलायचं आहे तुझ्याशी. मनातलं साठलेलं सगळं रीतं करायचं आहे. मला न नं अगं फार काही नकोय स्वराजकडून. बायको म्हणून त्याने फक्त अडचणीच्या वेळी मला समजून घेणं, सुखदुःखात मला त्याची सोबत वाटणं, त्याचं फक्त माझ्यासाठी वेळ काढणं किंवा अगदी छोट्या गोष्टींसाठी प्रोत्साहन देणं एवढचं मला अपेक्षित आहे. ह्यात काही अवास्तव आहे का सांग आई...." म्हणत दीप्ती फोनवरून रडू लागली.


"नेमकं काय झालं आहे दिपू? स्वराज रागावले आहेत का तुला?" गोंधळून गेलेली आई काळजीने विचारत होती.


दीप्ती आणि स्वराजच्या लग्नाला पाच एक वर्ष उलटली होती. लव्ह मॅरेज असल्याने आणि सुयोग्य स्थळ असल्याने दोन्हीकडुन आनंदाने लग्नाला होकार होता. स्वराज मेकॅनिकल इंजिनिअर तर दीप्तीही नामवंत कंपनीत इन्शुरन्स एजंट म्हणून कामाला होती. एकमेकांना समजून घेत, घरच्या जबाबदाऱ्या पेलत लग्नाच्या सुरुवातीची वर्ष तर भुरकन उडाली होती. आणि अचानक एक दिवस झालेल्या स्वराजच्या आईच्या दुःखद अकाली मृत्युने त्यांच्या हसऱ्या कुटुंबाला ग्रहण लागलं. आई गेल्याच्या दुःखात जणू मोडून पडलेल्या स्वराजने कायमस्वरूपी अमेरिकेला स्थाईक व्हायचं नक्की केलं.


दीप्तीचं शिक्षण काही त्या देशात उपयोगी येणार  नव्हतं. आणि तिला वर्षभर आई वडील भाऊ भेटणारही नव्हते. पण केवळ आपल्या प्रेमाच्या माणसाच्या आग्रहाखातर सगळं मागे सोडून ती कायमस्वरूपी अमेरिकेत राहायला तयार झाली. तिकडे सुरुवातीला त्यांना जड गेलं खरं पण एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या त्या दोघांनी सगळं सावरून घेतलं. पण नियतीच्या मनात मात्र वेगळं चक्र सुरू होतं. स्वराज आणि दिप्तीच्या संसार वेलीवर उमलू पाहणारं इवलसं फुल जन्माला यायच्या आधीचं दैवाने हिरावलं आणि दोघे पुन्हा उदास झाले पण अशाही परिस्थितीत स्वतःला सावरुन स्वराजने दीप्तीला हिम्मत दिली होती.


एकमेकांवर प्रेम करणारे हे दोघे कधी साधं लुटूपुटूचे भांडलेले सुद्धा सिंधूकाकूंच्या कधी कानावर नव्हतं आणि आज अचानक हे असं दिप्तीचं रडणं. तिचं असाह्य असणं. काकूंना आता मात्र टेंशन आलं. हजारो किलोमीटर दूर असणारी आपली लेक सुखात आहे असं समजून आपण सोन्याचा घास खात होतो पण आजचं तिचं अगतिक होऊन बोलणं आणि रडवेला आवाज त्यांच्या कानात घुमत होता.


मनात भावनांचा कोंडमारा सहन करत एकटेपणाने जगणारी आपली लेक त्यांच्या डोळ्यासमोर उभी राहिली. कितीही पैसे, ऐश्वर्य असलं तरी जर जोडीदाराच्या साथीचं सुख नसेल तर कोणतीही स्त्री मानसिक खचणारचं.


एकमेकांच्या सतत सोबत असल्यानेसुद्धा त्यांच्यात भांडण किंवा वाद होत असावेत असं दीप्तीच्या आईला वाटून गेलं. कारण नात्यात स्पेस देणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. सतत सोबत असल्यामुळे आणि इतर कोणाचाचं इंटरफेअरन्स नसल्याने सतत एकमेकांच्या आयुष्यात ढवळाढवळ करत राहणे आणि त्यामुळे वाद वाढून अबोला वाढणे हे पण कारण असेल स्वराजच्या बदललेल्या वागण्याचे.


काही करून हे वाद मिटवयाला हवेत आणि त्यासाठी आपणचं आता प्रयत्न करायला हवेत म्हणून सिंधूकाकू उठल्या. त्यांनी आपल्या लेकीला फोनवर धीर दिला. थोडं जावईबापूंनाही समजून घे म्हणाल्या.

फोनवर जावईबापूंशी बोलल्यावर त्यांना नेमका काय गुंता झाला आहे हे लक्षात आलं. दीप्ती तिचं बाळ गेल्यानंतर प्रचंड मानसिक तणावाखालून जात होती आणि नेमकं त्या वेळी तिला मनातल्या लहानमोठ्या गोष्टी "कन्फेस" करायलाचं जवळ कोणी नव्हतं त्यामुळे ती डिप्रेशनच्या उंबरठ्यावर उभी होती. तिच्या ह्या मानसिक परिस्थितीमुळे स्वराजही भरडला जात होता. ह्यासगळ्यावर उपाय म्हणजे दिप्तीने स्वतःला कुठेतरी गुंतवून घेणं गरजेचं होतं जेणेकरून ती घडल्या गोष्टींचा विचार कमी करेल.

दिप्तीने मनातलं सगळं आईकडे "कन्फेस" केल्यामुळे तिला डिप्रेशनमध्ये जाण्यापासून आता रोखता येणार होतं. तिचं नेमकं कुठे बिनसलं आहे ते आता आई आणि स्वराजच्या लक्षात आलं होतं आणि आता ते दोघे तिच्या नकळतपणे दीप्तीला सांभाळून घेणार होते.

मनाच्या आजारांनी कळत नकळत मोडकळीस आलेला लेकीचा संसार आई सांधणार होती. लेक जावयाचे परस्पर संगनमत करून देऊ आणि मगचं निवांत होऊ असं मनाशी म्हणत ही अनुभवी सिंधूताई सोफ्यावर विसावली. गडबडलेल्या नात्याचा गुंता वेळीचं सोडवुन काकूंनी सफाईदारपणे प्रेमाची पाखरं परत त्यांच्या लाडक्या घरट्यात पाठवली होती.