कॉन्फिडेंशीअल (भाग ३)
‘शेवटी दाखवली ना स्वतःची लायकी. पुरुषच तो. तोंड मारायला मिळाल्यावर का म्हणून नाही मारणार. मला माहितीये ना, सवयच होती त्याला. कॉलेजपासूनची. जे हवं तो ते मिळवायचाच. माझ्याही किती मागे लागला होता. माझ्यावर खूप प्रेम होतं म्हणे. मग तोंड मारताना माझी आठवण नाही झाली त्याला? मी, लेकरंबाळं… आमचा काहीच विचार नाही. आताही अविर्भाव बघण्यासारखाच आहे, काय तर म्हणे दिल्लीची टीम आलीये आणि हा त्यांच्या मागे मागे करणार. आवडली असेल तिथंही कुणी… पण मग मला का शिक्षा या सगळ्याची? परमेश्वरा, कुठं चुकले मी? ह्याच्या प्रेमाला भुलले, हेच चुकलं का? आयुष्य सुरळीत सुरू आहे असं वाटताना हा वार कशालाच दिलास? बरं द्यायचा तर त्याला एकट्यालाच द्यायचा ना. मला ही शिक्षा का?’ तिच्या डोक्यात अगदी सैरभैर विचार सुरू होते. त्या विचारांच्या वादळातच तिला झोप लागली.
सकाळी जाग आली ती मुलांच्या आवाजाने. आज्जीसोबत गावाला जायची त्यांची सर्व तयारी झाली होती. ती उठून बाहेर गेली.
“जाऊ ना? नाही तर राहूच दे. चेहरा बघ किती उतरलाय. माझं काही मन लागणार नाही तिकडं.” तिला बघून सासूबाई म्हणाल्या.
“नाही ओ आई. तुम्ही जा बिनधास्त. मी काळजी घेईल स्वतःची.” ती म्हणाली आणि सासूबाईंच्या गळ्यातच पडली.
“अशी रडू नको गं. आधीच माझा पाय निघत नाहीये इथून.” सासूबाईंनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला.
“लग्न झाल्यापासून माहेर तुटलं; पण तुम्ही कधीच क्षणभरही ते जाणवू दिलं नाहीत.” ती
“तू पण काही कमी कष्ट घेतलेस का? अगं तू माझ्या पोराच्या आयुष्यात आलीस आणि बेजबाबदारपणे वागणारा माझा मुलगा एकदम जबाबदार झाला. तुमचं लग्न झालं आणि लगेच त्याला नोकरी लागली. त्यानं तिथंही मेहनत केली आणि तू त्याला खंबीर साथ दिलीस म्हणून हे घरदार, गाडी वगैरे सुख दिसतंय. आता दुखणं-खुपणं ह्या गोष्टी चालतच असतात. म्हणून काय आपण लगेच हात पाय गाळून टाकायचे का? ते काही नाही, मी परत येइपर्यंत अगदी ठणठणीत झाली पाहिजेस तू.” सासूबाई
“निघायचं का? मला उशीर होतोय. तुमचीही बस निघून जाईल ना.” तो म्हणाला. सासूबाई आणि मुलं तिचा निरोप घेऊन निघाले. घरात ती एकटीच होती. तिच्या मनात कसले कसले विचार येत होते. स्वतःच्या विचारांवर ताबा ठेवत ती कसाबसा वेळ पुढं ढकलत होती.
दुपार झाली. तिच्या फोनवर मेसेजची बेल वाजली. तिनं मेसेज पाहिला. लॅबवाल्याचा मेसेज होता, तिचा रिपोर्ट तयार होता. ती लगेच घराच्या बाहेर पडली. लॅबमध्ये पोहोचली. तिने रिपोर्ट घेतला. त्या पाकिटावर लिहिलं होतं कॉन्फिडेंशीअल…
क्रमशः
©® डॉ. किमया मुळावकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा