कॉन्फिडेंशीअल (भाग ४)
रिपोर्ट उघडून बघायची तिच्यात हिम्मतच नव्हती. ती सरळ दवाखान्यात गेली.
“माझी शंका खरी ठरली. तुमच्या मिस्टरांचीही टेस्ट करून घ्या. दोघांची सोबतच ट्रीटमेंट सुरू करता येईल.” डॉक्टरांचे शब्द ऐकले आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. ती रडतच केबिनच्या बाहेर पडली.
“आत्ताच्या आत्ता घरी ये.” तिनं रडतच त्याला फोन लावला.
“रडायला काय झालं? मी आत्ता नाही येऊ शकत. कामात आहे.” तो
“मग माझं मेलेलं तोंड बघ.” तिनं रागातच फोन बंद केला आणि तडक घरी निघाली. ती घरी पोहोचली आणि पाचच मिनिटांत तो घरी पोहोचला.
“काय झालं? महत्वाची मिटिंग सोडून आलोय.” त्यानं विचारलं. तिनं रिपोर्टचे कागदं त्याच्या अंगावर भिरकावले.
“हे रिपोर्ट आहेत माझे. पॉसिटिव्ह आहेत. एच. आय. व्ही. कशामुळं होतो माहितीये ना तुला? का केलंस माझ्यासोबत असं? का? कुठं कमी पडले रे मी? काय कमी पडलं माझ्या प्रेमात? अरे तुला शेणच खायचं होतं ना तर सगळं स्वतःपुरतं मर्यादित ठेवायचं ना. त्याची शिक्षा मला का?” ती रडतच म्हणाली. तिचे रिपोर्ट बघून त्यालाही धक्का बसला.
“बोल ना काही. आता का वाचा बंद झाली तुझी?” ती अतिशय चिडली होती.
“हे बघ, मी असलं काही केलं नाहीये.” तो
“हो! मग कुणी केलं! सारखं आपलं दिल्ली, मुंबई, बंगलोर, चेन्नई कोण हिंडत राहते रे? मी येते का तुझ्यामागं बघायला तू काम करतोस की अजून काही. तसंही कॉलेजमध्येही तू मुलींच्या मागे फ्लर्ट करत फिरायचास ना. आताही आवडली असेल कुणी किंवा तूच भाळला असशील कुणाच्यातरी रूपावर.” ती
“हे बघ, हे कसलेही आरोप मी खपवून घेणार नाही.” तो
“आरोप करतच नाहीये मी. हेच सत्य आहे.” ती
“काय गं, काय माहितीये तुला? अगं तुला, मुलांना काही कमी पडायला नको म्हणून चार पैसे जास्त कमवायला मरमर करतोय तर तू माझ्यावरच आरोप लाव. मी बाहेर गेल्यावर तूच कुठंतरी तोंड मारलं असशील आणि आता माझ्यावर आरोप करतेय.” तोही चिडला होता.
“हे बघ, मी असलं काहीच केलं नाहीये.” ती
“मी पण केलं नाहीये. माझ्या मुलांची आणि आईची शप्पथ घेऊन सांगतो.” तो म्हणाला आणि तावातच घराबाहेर पडला. ती मात्र तिथंच बसून होती. स्तब्ध. एका रिपोर्टने तिच्या आयुष्याच्या जणू चिंध्या चिंध्या केल्या होत्या.
तो रात्री उशिरा घरी आला. ती अजूनही तिथंच सोफ्यावर बसून होती. तिच्या आयुष्यातल्यासारखा घरातही सगळीकडं अंधार पसरलेला होता.
क्रमशः
©® डॉ. किमया मुळावकर
©® डॉ. किमया मुळावकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा