Login

समजुतीची वाट साथसोबतीने भाग ४

समजुतीची वाट सहजीवनातील
टीम: श्रावणी
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
समजुतीची वाट साथसोबतीने

भाग ४

ठरल्याप्रमाणे  पुढच्या रविवारी रीमाच्या घरी माधवराव गीता ताई आणि राहुल पोचले. त्यांच्या घरी छोले पुरी गोडाचा शिरा आणि चहा असा छानसा बेत नाश्त्यासाठी होता.
नाश्त्याचा आस्वाद घेऊन दोन्ही कुटुंबीयांनी चर्चेला सुरुवात केली. आपापल्या घरी आधी चर्चा झालेलीच होती. त्यामुळे मुलांच्या म्हणण्याला होकार द्यायचा हे ठरलेच होते.


दिवाळीनंतरचा पहिला मुहूर्त काढावा आणि लग्न करावे असे ठरले. साखरपुडा दोन्ही घरच्यांनी घरच्या घरी जमून करावेत. सोशल मीडियावर फोटो अपलोड केले म्हणजे सगळे नातेवाईक आणि मित्रमंडळींना लग्न ठरल्याचे कळूनच जाईल हे माहित होते.
त्यामुळे घरच्याघरी साखरपुडा दसऱ्याच्या मुहूर्तावर करूया असे ठरले.


त्याप्रमाणे दोन्ही मुलेही आपण बराच खर्च वाचवला आणि आपल्या भविष्याची तरतूदही छान झाली अशा आनंदातच आपल्या भावी वैवाहिक आयुष्याची स्वप्ने बघायला लागली.

बघता बघता दसरा आला. एक छानसा घागरा घालून रीमा तयार झाली. कुर्ता पायजमा घालून राहुलही तयार होता. गीताताई,विणाताई,माधवराव,वसंतराव आणि गौरव तसेच रीमा राहुलचे दोन-तीन अगदी जवळचे मित्र मैत्रिणी यांच्या सानिध्यात रीमाच्या घरी राहुल आणि रीमाचा साखरपुडा पार पडला.
फेसबुक इंस्टाग्राम वर फोटो अपलोड झाले. सगळ्या मित्र मंडळांकडून आणि नातेवाईकांकडून अभिनंदनचा पाऊस पडला.
रीमा आणि राहुल यांना आता दिवाळीनंतर लग्नाची जी तारीख निघाली त्याचे वेध लागले होते. खूप काही तयारी करायचीच नव्हती. जवळच्या नातेवाईकांना फोनवरून आमंत्रण गेले. लग्नाच्या आदल्या दिवशी सारे नातेवाईक त्या त्या घरी जमले.
दुसऱ्या दिवशी देवळामध्ये विवाह सोहळा पार पडला. देवा ब्राह्मणाच्यासाक्षीने राहुल आणि रीमा जन्मभरासाठी एकमेकांचे झाले.

आत्या, काका, मामा, मावशींनी आशीर्वाद दिले. लग्नाचे फोटो, व्हिडिओ बनवले गेले.
काही कारणांमुळे आम्ही अगदी साधा विवाह सोहळा पार पाडलेला आहे. आपला आशीर्वाद आमच्या प्रती असणारच आहे याची खात्री आहे. अशा आशयाचा मेसेज दोघांनी आपल्या फोटोसहीत सोशल मीडियावर टाकला. ज्यांना कळायला हवे होते त्या साऱ्या जणांना राहुल रीमा यांची लग्नगाठ बांधल्या गेल्याचे कळले.
काहींनी आपापसात कुजबुजही केली की


"काय हे त्यांनी अगदी थोडक्यातच लग्न आटोपले. काही धुमधडाका केलाच नाही. शोभते का?"


पण चार आठ दिवस या विषयावर आपापसात चर्चा झाल्यावर हा विषय वाढलाच नाही आणि राहुल रीमा आपल्या संसाराला लागले.
ठरविल्याप्रमाणे नव्याची नवलाई महिनाभरामध्ये संपली. चार दिवस माथेरानला फिरून आल्यावर आपले रुटीन चालू केले. वसंतराव - माधवरावांच्या मदतीने रीमाने त्यांच्या घरापासून जवळ पडेल अशा ठिकाणी स्वतःचे दुकान विकत घेतले.
स्वतःची बुद्धिमत्ता आणि वसंतराव यांचे मार्गदर्शन यांच्या आधारे 'प्रथमेश स्टेशनरी स्टोअर' चे जोरदार उद्घाघाटन झाले.


आजूबाजूचे राहणारे..बिल्डिंग मधले.. सगळ्यांना सत्यनारायणाची पूजा करून तिथे दुकानातच प्रसादाला बोलावले गेले. दुकानाची जाहिरात आपोआपच झाली. दुकानाच्या मागच्या साईडला..आजूबाजूला शाळा आहेत हे बघूनच रीमाने तिथे दुकान घेतले होते. साधारण सात-आठ महिन्यांमध्ये रीमाचा आपल्या दुकानांमध्ये चांगला जम बसला होता.


सकाळी घरातले आवरून साधारणता नऊ-साडेनऊला रीमा दुकान उघडत असे. दुपारी दोन-तीन तास दुकान बंद ठेवून घरी येई. संध्याकाळी पुन्हा आठ वाजेपर्यंत दुकान उघडे असे. यामध्ये घरातून गीता ताईंची तिला पूर्ण साथ होती.
हळूहळू रीमाचे 'प्रथमेश स्टेशनरी स्टोअर' चांगलेच नावारूपाला आले.
त्यातच रिमा आणि राहुलच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आला.
तोही छान साजरा झाला. दुसऱ्या दिवशी राहुल ऑफिसला गेला पण अर्ध्या दिवसातच घरी परत आला. ते उदासवाणा चेहरा घेऊनच.
काय झालं असेल राहुलच्या आयुष्यात.
बघूया पुढच्या भागात.