कौंसेलिंग-1

कौंसेलिंग गॉन रॉन्ग


दारावरची बेल वाजली तशी निशा पटकन दाराकडे धावली. तिचे मामा मामी आत आले, घरात सुतकी वातावरण असेल याची जा
णीव त्यांना होतीच.

मामीने किचनमध्ये एकदा नजर फिरवली, चकाकणारी ढीगभर भांडी आणि आतून अभिषेकच्या मोबाईलची लो बॅटरीची सतत वाजणारी रिंगटोन बरंच काही सांगून जात होती.

निशाने त्यांना बसायला लावलं आणि आत जाऊन चहा टाकला, येताना पाणी भरून आली. कुणीतरी आलं आहे याची चाहूल लागताच अभिषेक तोंड पाडून बाहेर आला आणि बळेबळेच मामा मामींना नमस्कार केला.

तेवढ्यात परत एकदा बेल वाजली, निशाची चुलत बहीण आणि जीजू आलेले. निशाने त्यांनाही बसवलं आणि चहा वाढवला.

आज या दोन्ही जोडप्यांचं येण्याचं कारण काहीतरी वेगळंच होतं. निशा आणि अभिषेकचे सततचे वाद सुरू असायचे, त्यात निशाने तिच्या मामाला कळवलं की तिला अभिषेक सोबत अजिबात राहायचं नाहीये, तिकडे अभिषेकने चुलत बहिणीच्या नवऱ्याला सांगितलं की निशाचं वागणं सहन होत नाहीये.

या दोघांचं नातं धोक्यात आहे लक्षात येताच दोन्ही जोडपी समुपदेशन साठी घरात जमले होते.

जीजूंनी विषय काढला,

"कौंसेलरकडे गेला होतात का तुम्ही?"

तेवढ्यात मामा ओरडले,

"कशाला हवा कौंसेलर? पैसे जास्त झाले का? अश्यावेळी नातेवाईक काय कामाचे..?"

"तसं नाही मामा, पण.."

"ते काही नाही..आपण इथेच काय आहे ती समस्या सोडवून टाकू.."

निशा आणि अभिषेक दोघेही शांत होते. कुठून सुरवात करावी त्यांना कळत नव्हतं.

निशाची चुलतबहीण म्हणाली,

"निशा तू बोल, काय प्रॉब्लेम आहे नक्की?"

हे ऐकताच निशाला रडू फुटलं..ती काही बोलेचना..

वातावरण अजून गंभीर झालं..

तेवढ्यात तिची चुलतबहीण तिच्या बाजूला जाऊन बसली आणि तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला धीर देऊ लागली.

हे पाहून निशाला अजूनच रडू फुटलं,

अभिषेक चिडला..

"हेच...हेच आवडत नाही मला..कुठल्याही प्रॉब्लेम वर उपाय शोधायचा सोडून असं रडत बसायचं, म्हणजे समस्या राहिली बाजूलाच.. हिचं रडणं सुरू, आणि वर मी तिचं सांत्वन करत नाही, तिला रडताना बघून मला काहीच वाटत नाही हे आरोप वेगळे..त्यावरून वेगळा वाद.."

मामाला अभिषेकचं बोलणं पटलं आणि मामा म्हणाला,

"निशा आधी रडणं बंद कर.."

मामाचा आवेष बघून निशा शांत झाली, तेवढ्यात मामी म्हणाली,

"अहो बायकांना मन मोकळं करायला हेच तर एक साधन असतं.. रडू द्या तिला मनमोकळेपणाने.."

"कशाला रडू द्या? म्हणजे इथे आपण फक्त रडणं ऐकायला आलोय का?" मामा मामीवर चिडले..

क्रमशः

🎭 Series Post

View all