कौंसेलिंग-2

समुपदेशन जेव्हा फसतं
"अहो बोलेन ती, जरा थांबा.."

"आपण कौंसेलर कडेच पाठवूया यांना.." - जीजू

"तुम्ही जरा थांबा हो.." - मामा

सर्वजण निशा शांत व्हायची वाट बघू लागले, ती शांत झाली. बोलू लागली,

"मामा, जीजू...मला सांगा तुम्ही तुमच्या बायकांवर कधी आवाज चढवून बोलला आहात का? कधी तिच्याकडे दुर्लक्ष केलं का? नाही ना? मग हा का असा वागतो??"

मामा आणि जीजू एकमेकांकडे बघू लागले, त्यांच्या बायका त्यांच्याकडे बघू लागल्या,

चुलतबहीण म्हणाली,

"बोला की हो..केलंय का असं कधी?"

मामी म्हणाल्या,

"सांगा, आजवर एकदाही दुर्लक्ष केलं नाही तुम्ही माझ्याकडे.. बरोबर ना??"

मामा आणि जीजूला काय बोलावं कळेना..तेवढ्यात मामी म्हणाल्या,

"मागे एकदा तापाने फणफणले होते हो मी..या माणसाला चार दिवसांनी गांभीर्य कळलं अन मला दवाखान्यात नेलं..पार वाईट अवस्था झालेली माझी.." असं म्हणत मामींनी पदर घेऊन डोळे पुसले...

"तापाने आजारी होतीस हे सांगायला कुणी उशीर केला?"- मामा

"सांगायला हवं का? समजत नाही का तुम्हाला?" - मामी

"मी दिवसभर बाहेर, घरी आलो तेव्हा तू झोपलेली, कसं कळणार??"- मामा

"आपण कौंसेलर कडेच जाऊ.."- जीजू

मामाने जिजूंकडे रागीट कटाक्ष टाकला तेव्हा जिजूंनी पटकन मान वळवली...

आता चुलत बहीण सुरू झाली..

"तुम्ही बोला की हो...कधी आवाज चढवत बोललात माझ्याशी? तुला सांगते निशा, आजवर या माणसाने एवढूसा सुदधा आवाज चढवला नाही माझ्यावर.."

चुलतबहिणीच्या बोलण्यातील टोन आणि रोख सर्वांच्याच लक्षात आलेला..तसे जीजू म्हणाले,

"मग पाणी गळ्याशी येईपर्यंत कुणी हट्टीपणा करत असेल तर आवाज नाही चढणार का? मीही माणूस आहे.."- जीजू

"बघा...स्वतःच कबूल करताय..." - चुलतबहीण

हे सगळं निशा आणि अभिषेक मोठा आ वासून बघत होते..त्यांना कळेचना आपण कशासाठी जमलोय..

मामींच्या लक्षात आलं आणि त्यांनी पुन्हा विषय मूळ मुद्द्यावर आणला...

"आपण निशा आणि अभिषेकचा वाद मिटवायला आलोय..तर अभिषेक, तू बोल..काय त्रास आहे तुला?"

"काय सांगू मामी, हिचा मूड नक्की काय असेल थांगपत्ताच लागत नाही...बाहेर जायचं म्हटलं की नको म्हणते आणि नेलं नाही तर तक्रार करते की कुठेच नेत नाही म्हणून...घरात मदत करायला घेतली तर चिडते, म्हणते वस्तुंना हात लावू नका आणि मदत नाही केली तर म्हणते काहीच मदत करत नाही..मला कळत नाही नक्की वागावं तरी कसं?"

"सोपं आहे...तिला नीट विचारायचं, काय, कधी, केव्हा आणि कसं करू? तिच्या आदेशाचं पालन केलं तर दोघे सुखी व्हाल.."- चुलतबहीण

"हो, तेच करायला लग्न करून आणलं ना आम्ही बायकांना..त्यांच्या मूड नुसार वागायचं, त्यांचं मन सांभाळायचं.. आणि आमचं काय? आमचं कोण सांभाळणार??" - जीजू

जिजूंनी आपला मुद्दा उचलून धरला पाहून अभिषेकला बरं वाटलं,

"तेच ना भाऊ, तेच समजवा हिला.."- अभिषेक

"मी काय म्हणतो..."

"कौंसेलरचं नाव काढायचं नाही.." मामानी जिजूला गप केलं...

"हेच..हेच पटत नाही मला...दुसऱ्याच्या मताला किंमतच नाही..इतकी वर्षे संसार केला, पण घरात अगदी कुठली वस्तू कुठे ठेवायची याचा साधा निर्णयही घेऊ देत नाही हा माणूस.."- मामीने परत एकदा डोळ्याला पदर लावला..

क्रमशः


🎭 Series Post

View all