कौंसेलिंग-3 अंतिम

समुपदेशन
"निशा..तुझ्या काय अपेक्षा आहेत?" मामाने विषय परत मूळ मुद्द्यावर आणला..

"फार काही नाही..या माणसाने मला वेळ द्यावा, मला समजून घ्यावं, माझी किंमत ठेवावी.. बस इतकंच.."- निशा

"वेळ द्यावा म्हणजे ऑफिस सोडून हिच्या मागे फिरावं..समजून घ्यावं म्हणजे अवाजवी हट्ट पुरवावे आणि किंमत ठेवावी म्हणजे चोवीस तास हिचे गुणगान गावे अश्या अवाजवी अपेक्षा आहेत हिच्या.."- अभिषेक

"कौंसेलर..."- जीजू

"गप्पssss.."- मामा

"मुळात माणसाने कुणाकडून अपेक्षाच ठेऊ नये. अपेक्षा नसतील तर दुःखही नसतं.."- जीजू

"हो का? मग आम्ही बायकांनी तुमच्यासाठी सकाळी उठून डबा द्यावा ही अपेक्षा सोडून द्या..तुमच्या घरात सर्वांचं आवरवं, तुमच्या नातेवाईकांची तोलतोल करावी हे अपेक्षा सोडून द्या..जमेल??"- चुलतबहीण

"तुम्हा बायकांना असं साधं सरळ काही नकोच असतं... हवं तर अगदी टोकाचं नाहीतर नकोच हा तुमचा अट्टहास.."- मामा

"नवऱ्याने बायकोकडून अपेक्षा ठेवली नाही तरी बायको न चुकता आपलं कर्तव्य पूर्ण करते..माणसं तसं करतात का?"- मामी

"माणसांची कर्तव्य माणसं बरोबर पार पाडतात.. घराबाहेर पडून आपल्या कुटुंबासाठी राब राब राबतात, घरी निवांत क्षण मिळावे म्हणून यावं तर बायकांचे वेगळेच नखरे.."- मामा

"मग बायका काय दिवसभर झोपा काढतात का? त्यांना नाही वाटत निवांत क्षण मिळावे म्हणून? बोला ना आता, बोला..बोलती बंद झाली का...बोला बोला.." -चुलत बहीण

हे सगळं जिजूंना असह्य झालं..त्यांच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला, जीजू आवेशाने उभे राहिले आणि समोरचा ग्लास हातात धरून खाली आपटणार तोच अभिषेकने त्यांना सावरलं..

एका बाजूने मामा आणि दुसऱ्या बाजूने अभिषेक जिजूंना शांत करत होते..

"बघ, हे असं असतं या माणसांचं, जरा म्हणून रागावर नियंत्रण नसतं.."- मामी

मामाने जिजूंना सोडलं आणि जवळच असलेलं वर्तमानपत्र कराकरा फाडलं..

"बोला, आम्हालाच बोला..आम्हीच वेडे, आम्हीच नालायक, आम्हीच दोषी.." मामा भिंतीवर डोकं आपटू लागले,

ते बघताच जिजूंनी आपला राग आवरला आणि मामांना आवरायला हातातला ग्लास अलगद खाली ठेवला..

ते पाहताच मामींनी डोकं झोडायला सुरवात केली, चुलतबहीण मात्र डोक्यावर हात मारून सुशिक्षितपणा दाखवत आपला राग व्यक्त करत होती..

एव्हाना शेजारीपाजारी सगळेजण घरात डोकावू लागलेले..

निशा आणि अभिषेक किलकिल्या डोळ्यांनी सगळं बघत होते..त्यांना लक्षात आलं, आपला प्रॉब्लेम इतकाही मोठा नाहीये...इथे तर एक वेगळंच संकट समोर येऊन उभं राहिलेलं..

अभिषेकने थरथरत मोबाईल काढला..

जिजूंनी पाठवलेल्या कौंसेलरचा पत्ता काढला..

आणि दोन्ही जोडप्यांना कौंसेलरच्या हवाली करत दोघेही बाहेर उभे राहिले...

आत बराच मोठा कल्ला सुरू होता. निशा आणि अभिषेकचं कौंसेलिंग करायला आलेले दोन्ही जोडपे आज स्वतः समुपदेशन घेत होते...

आणि निशा आणि अभिषेक बाहेर उभं राहून शांतपणे सगळं बघत होते,

नजर चुकवत, एकमेकाला बघत...हसावं की रडावं त्यांनाच उमजत नव्हतं...

समाप्त

🎭 Series Post

View all