अमेरिकेत तनिषा आणि कुटुंबीय भारतात जाण्यासाठी तयारी करत होते. आठवडाभराने फ्लाईट होती. भैरवचा कार्यक्रम अगदी उद्याच होता. तनिषाला निमंत्रण आलेलं घरी समजलं आणि सर्वजण चिडले.
"किती कृतघ्न म्हणावा तो भैरव, तनीने इतकं केलं त्याच्यासाठी पण त्याने जराही जाणीव ठेवली नाही" - माई
"नाही तर नाही, वर आणखी कार्यक्रमाला आमंत्रण देतोय..कसला सूड उगवतोय हा?" - मानव
"आईनेच त्यांना डोक्यावर चढवून ठेवलं असणार, काय कमी होतं त्यांना?" - आर्या
तनिषाने सर्वांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं, नंतर शांतपणे म्हणाली,
"प्रत्येकाला स्वतःची प्रगती करण्याचा अधिकार आहे. आपल्या ठिकाणी काम करणारा व्यक्ती कायम आपल्याशीच बांधून राहील ही अपेक्षा करणं चुकीचं आहे. आपण गृहीत धरणं चुकीचं आहे. भैरव हुशार आहे, कामसू आहे..त्याला त्याच्या योग्यतेचं काम मिळालं..चांगलंच झालं ना. तो माझा एम्प्लॉयी नंतर, आधी चांगला परिचयातील माणूस आहे..लहान भावासारखा आहे, आणि लहान भावाचं कौतुक पाहायला मला आवडेलच की!"
तनिषाच्या जागी दुसरं कुणीही असतं तरी मनात डूख धरून बसलं असतं, पण तनिषा तशी नव्हती. व्यवसाय आणि नाती..दोन्ही आपापल्या जागेवर व्यवस्थित सांभाळले होते तिने.
दुसरा दिवस उजाडला. तनिषा कार्यक्रमाला जाण्याची तयारी करू लागली. कार्यक्रम दुपारी दोन वाजता होता. सकाळी आर्या आणि स्वराने तनिषाला नाष्टा, दूध देऊन औषधं दिली. तनिषा खूप दिवसांनी आज बाहेर पडणार होती. तिला जास्त धावपळ केलेली चालणार नव्हती. त्यामुळे मानव आणि दोन्ही मुलीसुद्धा तिच्यासोबत जाणार असं ठरलं. माई म्हणाल्या मी काय करू इथे एकटी? मीही येते. मग सर्वांनी जायचं ठरवलं.
ठरलेल्या वेळी सर्वजण कार्यक्रमाला पोहोचले. तनिषा तिथून गेल्यानंतर खूप दिवसांनी तिथे पाऊल ठेवलं होतं. ऑफिसचं रंगरूप मिस्टर रॉन यांनी बदलून टाकलं होतं. सुंदर इंटेरिअर, चकाचक केबिन्स..तनिषा भावुक झाली. मुलींसमोर तिने रडू आवरलं पण आर्याच्या लक्षात आलंच.
"आई, सावर स्वतःला.."
तनिषा हसली. पुढे जाताच मिस्टर रॉन आणि इतर इन्व्हेस्टर्स समोर आले.
"हॅलो मिस तनिषा.. मला वाटलं नव्हतं तुम्ही आज इथे याल म्हणून..स्वतःचा इतका अपमान करून घेतल्यानंतर आज स्वतःच्याच खुर्चीवर दुसऱ्याला बसलेलं पाहून तुम्हाला सहन होणार नाही असं वाटलेलं..असो, बरं वाटलं तुम्हाला पाहून"
मिस्टर रॉनने तनिषाचा अपमान करण्याची एकही संधी सोडली नाही. तनिषानेही हसत उत्तर दिलं.
"खुर्ची, सत्ता, मान, अपमान...यापलीकडेसुद्धा काही गोष्टी असतात मिस्टर रॉन. भैरव माझ्यासाठी काय आहे हे तुम्हाला नाही कळणार. तुम्ही फक्त व्यावसायिक नाती जपलीत, ज्यादिवशी माणसामाणसातील नाती जपाल ना, त्यादिवशी तुम्ही सर्वात मोठे व्यक्ती असाल"
मिस्टर रॉन तिचा अपमान करायला आलेले पण स्वतःचाच अपमान करून घेतला. ऑफिसचा काही जुना स्टाफ, ज्यांनी काही दिवस तनिषा सोबत काम केलं होतं त्यांच्या डोळ्यात मात्र अजूनही तनिषाबद्दल आदर दिसत होता. मॅम सोबत काम करत असतांना आलेला अनुभव आणि मिस्टर रॉनने दिलेली वागणूक यातला फरक त्यांना चांगलाच समजला होता..तनिषा मॅमची किंमत कळली होती. त्या सर्वांनी तनिषा मॅम येताच आदराने उठून त्यांना अभिवादन केले. हे पाहून मिस्टर रॉनला रागच आला. आपण इतके दिवस या स्टाफला पगार देतोय पण एकाच्याही डोळ्यात आपल्याबद्दल असा आदर दिसला नाही.
कसा दिसणार ! कारण बिझनेस करणं आणि बिझनेस जगणं यात फरक असतो. मिस्टर रॉनसाठी बिझनेस म्हणजे फक्त पैसा होता आणि तनिषासाठी तिचं विश्व.
सर्वजण समोर खुर्चीवर बसले. माई एवढ्यात 4-5 वेळा पडता पडता वाचल्या. बाकी काहीही असो, एका बिझनेस वूमनच्या त्या सासूबाई होत्या..बिझनेस वूमनला एवढा मान म्हटल्यावर सासूबाईंना किती असेल..त्याच तोऱ्यात त्यांचं राहणीमान.. आता अमेरिकेत आल्यावर जास्तच सुधारलं होतं.
"आई सांगत होतो चष्मा लाव म्हणून, हा गॉगल लावायचाच हवा का?"
"दिसतंय मला गॉगल मधून..तू गप बस"
मानवला गप करून माई समोर बघू लागल्या. कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. समोर चार पाच खुर्च्या, त्यावर मिस्टर रॉन आणि इतर मुख्य मंडळी बसली होती. कंपनी बद्दल माहिती सांगितली गेली, आपल्या एचिव्हमेंट्स बद्दल (?) माहिती देण्यात आली. तनिषाचे डोळे भैरवला शोधत होते. तो अजूनही दिसला नव्हता..
आता मिस्टर रॉन बोलण्यासाठी उठले.
"हॅलो ऑल. माझी वेगळी ओळख करून द्यायची मला गरज वाटत नाही. जगातील अनेक मोठमोठ्या कंपन्यांची दोर माझ्या हातात आहे. हा आता अनेक लहानसहान उद्योजक येऊन स्वतःला आजमवायचा प्रयत्न करतात, पण प्रत्येकाच्या नशिबी मिस्टर रॉन नसतात..आणि काहीजण तर स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतात"
तनिषाला टोमणा कळला खरा पण तिने दुर्लक्ष केलं. मिस्टर रॉन पुढे बोलू लागले.
"आता The Face Of America नवनवीन शिखरं पादाक्रांत करणार..नवनवे रेकॉर्ड रचणार आणि जगाच्या पाठीवर आपलं अढळपद प्राप्त करणार..कारण आपल्या कंपनीची धुरा आता सांभाळत आहे अशी एक व्यक्ती ज्यांना या क्षेत्रातील दांडगा अनुभव आहे, जे हुशार आहेत आणि जिद्दीही..ते सांभाळत आहे आपल्या कंपनीची धुरा..आणि आज ते घोषणा करणार आहे अश्या काही गोष्टींची की ज्यामुळे The Face Of America रचणाऱ एक नवा इतिहास..!!! या नवीन कल्पना ऐकून तुमचेही होश उडणार हे नक्की..! चला तर मग, कंपनीच्या नव्या कल्पनांबद्दल आणि नव्या घोषणेबद्दल ऐकूया स्वतः मिस्टर भैरव कडूनच.."
भैरवचं टाळ्यांच्या गजरात स्वागत झालं. तनिषाला भैरवचं असं कौतुक होताना पाहून खूप आनंद झाला. तिनेही पूर्ण ताकदीनिशी टाळ्या वाजवल्या. मानव, माई, आर्या, स्वरा तिच्याकडे पाहतच राहिले. भैरव पुढे जाऊन उभा राहिला.
क्षणभर तो शांत झाला, एक कटाक्ष तनिषाकडे टाकला आणि बोलायला सुरुवात केली.
"The face of America सादर करत आहे नव्या कल्पना. मिस्टर रॉन यांनी सांगितल्याप्रमाणे हे वृत्तपत्र इतिहास घडवेल. यात humorous कंटेंट आणि पेपर बॅग सारखा reuse अशी वैशिष्ट्य असतील. या सर्व गोष्टींमुळे आपलं वृत्तपत्र अल्पावधीतच लोकप्रिय होईल यात शंकाच नाही"
सर्वांनी टाळ्या वाजवल्या.मिस्टर रॉन यांनी उठून टाळ्या ठोकल्या.. ते यासाठी की त्यांना तनिषाला दाखवायचं होतं.. की तुझ्याच माणसाला तुझ्याचविरुद्ध वापरून मी कसं तुला चितपट केलं ते..तुझ्याच कल्पना चोरून कसं तुला नामोहरम केलं ते...
मिस्टर रॉन म्हणाले,
"वेरी गुड भैरव.."
असं म्हणत त्याला शेजारी येऊन बसण्याचा इशारा करू लागले..
तेवढ्यात भैरव म्हणाला..
"माझं बोलणं अजून संपलं नाहीये मिस्टर रॉन.."
"ओह..सॉरी मॅन.. प्लिज गो ऑन"
"मला सांगायला अतिशय आनंद होतोय..की या कंपनीची धुरा पुन्हा एकदा तनिषा मॅम कडे येणार आहे.."
हे ऐकताच सभागृहात एकच गडबड सुरू झाली..मिस्टर रॉन उठून उभे राहिले..
"भैरव, काय बोलतोय तू"
"मिस्टर रॉन..ज्यांनी अगदी मनापासून या कंपनी मध्ये इन्वेसमेन्ट केली होती.. त्यांनी या कंपनीतून स्वतःचे सर्व अधिकार काढून घेतलेत. कंपनी आता कोणत्याही इन्व्हेस्टर्सच्या नियंत्रणात नाही. या करारावर मिस्टर रॉन यांनी स्वतः आनंदाने सही केली होती. पण इतकं असूनही आज मनाचा मोठेपणा दाखवत ते इथे आले याबद्दल त्यांचे मनापासून आभार"
मिस्टर रॉनला आठवलं..जेव्हापासून भैरव आला होता तेव्हापासून त्याने मला भुलवून अनेक कागदांवर माझी सही घेतली होती.. भारतीय कायदे, अमेरिकन कायदे असं काहीबाही गोंधळात टाकून माझ्याकडून अनेक कामं करून घेतली होती..मला म्हणायचा, माझ्या बॉसला धडा शिकवायचा आहे..मला वाटलेलं की तो आता सगळं फ्रस्ट्रेशन तनिषावर काढणार, डोळे झाकून विश्वास ठेवला मी...एक मिनिट, माझ्या बॉस ला धडा शिकवणार असं तो म्हटलेला... पण..इथे बॉस तर मी होतो..!!!
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा