Login

द बॉस - The Boss (पर्व 2- भाग 31)

Arya's Mastermind Revealed


भैरव ज्या बॉसची वाट लावायचं म्हणत होता तो मीच होतो? मिस्टर रॉन भांबावून जातो. त्याच्या मते त्याने भैरवला पैसा आणि सत्ता यांची लालसा दाखवून जाळ्यात ओढलंय. पण हा तर तनिषाच्या वरचा निघाला? मिस्टर रॉनचा जबरदस्त अपमान होतो, इतका अपमान त्याच्या स्वतःच्याच देशात, स्वतःच्याच एम्प्लॉयीसमोर झालेला असतो.

"कोणत्या मातीतून बनलेत हे भारतीय लोक..एक सामान्य बाई..माझ्यासारख्या तगड्या बिझनेसमनला पायचीत करते..आणि तिच्या हाताखालचा तो भैरव..साला मलाच त्याच्या षड्यंत्रात गोवलं त्याने...सोडणार नाही मी..कुणालाच सोडणार नाही.."

भर कार्यक्रमात मिस्टर रॉन पाय आपटत निघून गेले. त्यांना तोंड दाखवायला जागाच उरलेली नव्हती. भैरवने घोषणा केली आणि तनिषाला आता स्वतःला आवरणं कठीण झालं. कंपनीची धुरा परत तिच्याकडे आली यापेक्षा भैरवने माझी लाज राखली, तो फुटला नव्हता..माझ्या शत्रूला फोडण्यासाठी इतका मोठा प्लॅन त्याने केला होता. हे सगळं पाहून तनिषा आनंदाने भारावून गेली. सर्व स्टाफ ही घोषणा ऐकताच टाळ्या वाजवू लागला. कंपनी पुन्हा एकदा एका कर्तृत्ववान आणि हुशार व्यक्तीकडे आली होती. मिस्टर रॉनने तनिषाचा अपमान व्हावा म्हणून या घोषणेचा लाईव्ह टेलिकास्ट करण्यासाठी अनेक मीडिया पत्रकारांना बोलावून ठेवलं होतं.. आज त्यावरच त्यांनी स्वतःची इज्जत अतिशय वाईट पध्दतीने घालवली होती.

कार्यक्रम संपला, सर्वांनी तनिषा मॅमचे अभिनंदन केले.

"मॅम, तुम्ही होतात तेव्हा आमच्या कल्पकतेला वाव मिळायचा, आम्हाला आमचं कौशल्य पूर्णपणे वापरता यायचं आणि आमच्या कामाचं आम्हाला समाधान मिळायचं.. मिस्टर रॉन आम्हाला जे काम सांगायचे ते काम न वाटता एक शिक्षाच वाटायची. पण आता पुन्हा चित्र बदलणार..!!! Welcome back to The Face Of America"

"नाही..वेलकम बॅक टू "द रिअल फेस ऑफ अमेरिका", दोन कंपन्या मर्ज झाल्या आहेत..आणि याचे सर्वाधिकार तनिषा मॅम कडे आहेत"

भैरव गर्दीतून वाट काढत पुढे आला आणि बोलू लागला. सर्वांनी पुन्हा टाळ्या वाजवल्या. हळुहळु गर्दी पांगली..आता तिथे फक्त भैरव, तनिषा, माई, मानव, आर्या, स्वरा, हेझल आणि कार्ल उभे होते. भैरव तनिषाच्या समोर आला, डोळे डबडबलेले..समोर येताच त्याने तनिषाचे पाय धरले..

"माफ करा मॅडम, हे नाटक मला करावं लागलं..माझ्यामागे मिस्टर रॉनने माणसं लावली होती...मी खरंच त्यांची ऑफर स्वीकारली आहे की दुसरा काहीतरी प्लॅन करतोय याच्या खात्रीसाठी ते माझ्या मागे होते. त्यामुळे अनपेक्षित तुमच्याशी भेट घडली तेव्हा मला जाणीवपूर्वक तुसड्याने वागावं लागलं..पण घरी गेल्यावर मी स्वतःलाच थोबाडीत मारून घेत होतो मॅम..मला माफ करा मॅम.."

तनिषाने त्याला उठवलं आणि कसलाही विचार न करता त्याला मिठी मारली..जणू कितीतरी दशकानंतर भावा बहिणीची भेट होत होती.

"भैरवा..अरे तुला माहीत नाही तू माझ्यासाठी काय केलं आहेस ते..अरे प्रेमापोटी इतकं सगळं कुणी करतं का? भैरव, तू माझाच माणूस होतास आणि माझाच राहिलास, याहून मोठा आनंद तो नाही भैरव.."

भैरव आणि तनिषा, शब्दांतरचं जादुई रसायन होतं. आज ते पुन्हा एकत्र आलं आणि त्यातून आज घडलेला आविष्कार तुम्ही पाहिलाच..!!!

काय माणसं तयार केली होती तनिषाने, भैरव फक्त एक एम्प्लॉयी नव्हता, तनिषा आणि शब्दांतरशी तो एकरूप झाला होता. इतका की तनिषावर आलेलं संकट दूर करण्याकरिता भारतातून अमेरिकेत आला, इथे येऊन वकिलांशी चर्चा केली, वेगवेगळे प्लॅन तयार करून मिस्टर रॉनचा विश्वास संपादन केला आणि त्याच्याकडून इन्व्हेस्टर्स म्हणून अधिकार काढून घेण्याच्या सह्या मिळवल्या. तनिषाची कंपनी तिला परत मिळवून दिली. मिस्टर रॉनने जेव्हा शब्दांतरची माहिती काढून भैरवपर्यंत एक माणूस पोहोचवला होता तेव्हाच भैरवचा संताप झालेला. पण असं चिडलं तर आपल्याला संकटाच्या मुळाशी जाऊन सिस्टीम बदलता येणार नाही हे त्याने तनिषाकडूनच शिकलं होतं.

"भैरव..पण हे सगळं कसं..केव्हा.."

"मी शब्दांतरमध्ये माझं काम करत असतांना एक माणूस मला भेटायला आला आणि त्याने तुमच्याविषयी नकळतपणे मला भडकवण्याचं काम केलं. मला कळत नव्हतं हा माणूस कोण आहे, मी शांत राहिलो..काहीतरी गडबड मला वाटली. तो गेल्यानंतर मी तनिषा मॅमच्या ऑफिसमध्ये फोन लावला, तेव्हा तो फोन आर्याने उचलला..आणि आर्यानेच हा सगळा प्लॅन सांगितला.."

"आर्या???"

तनिषाला धक्का बसतो, हे सगळं आर्याने केलं? आर्याच्या त्या हसण्यामगाचं कारण तनिषाला समजलं.

"आर्या..तुझ्या डोक्यात हे सगळं आलं तरी कसं?"

"मला भैरव सरांनी ही गोष्ट सांगितली आणि मला वाटलं की भैरव सरच आहेत जे आईला तिचा सन्मान परत मिळवून देतील. त्यांना इथे आणणं भाग होतं. पण ते मिस्टर रॉन चे शत्रू बनून आले असते तर काहीही फायदा नसता झाला..याउलट शत्रूच्या गोटात शिरून काहीतरी होण्याची शक्यता होती. त्यामुळे त्यांना मी ही ऑफर स्वीकारायला लावली, त्यातून ते अमेरिकेला आले. आणि त्यांनी पुढचं काम अगदी लीलया पेललं..आईला मुद्दाम हे सांगितलं नाही, कारण मिस्टर रॉन आईवरही नजर ठेवून होता. भैरव सोबत वाईट पणाचं नाटक करणं तिला जमलं नसतं आणि मिस्टर रॉनला संशय आलाच असता. त्यामुळे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आईला कळू दिलं नाही. या काळात जेव्हा आईला त्रास झाला तेव्हा वाटलेलं की आईला खरं खरं सांगून द्यावं..पण तेव्हा परिस्थिती अशी होती की काय करावं काहीच सुचेना..आपण नव्या कंपनीत आखलेले प्लॅन्स आहे त्या बजेटमध्ये पूर्ण होणार नाही हे माझ्या लक्षात आलं..याला एकच पर्याय होता, the face of America चं ऑफिस आणि इथला स्टाफ एकत्र यावा, कंपनी एकत्र व्हावी, कारण इथलं बजेट खूप आहे, इथे पैशाची चिंता नसणार आहे...आईवर आलेलं आर्थिक संकट मला समजत होतं, त्यामुळेच हे सगळं..आणि भैरव सरांना आपल्या आयडियाज मीच सांगितल्या..जेणेकरून मिस्टर रॉन त्याच्यावर खुश होतील, त्याला सर्वाधिकार देतील आणि मिस्टर रॉनचा फुगा खूप फुगेल...आणि आज मुद्दाम असं सगळं घडवून आणलं गेलं ज्याने तो फुगा फटकन फुटेल.."

तनिषा आर्याकडे फक्त बघत राहिली. काहीच बोलली नाही, आज तनिषाने स्वतःला आर्यामध्ये पाहिलं होतं..आपलंच प्रतिबिंब आपल्यासमोर..!! तनिषा निःशब्द झाली. तिने माईंकडे एकदा पाहिलं.. माईंनी अगदी तंतोतंत भविष्य कथन केलं होतं..

"तू उभी केलेली माणसं, तुझ्या रक्ताच्या नात्यातील माणसं आणि तुझं वलय...हेच तुला मोठ्यातल्या मोठ्या संकटातून तारून नेईन.."

आज अगदी हेच झालं होतं. एका बीजापासून तयार झालेली अनेक रोपटी पुन्हा बीज निर्माण करून निसर्गचक्र अव्याहतपणे सुरू ठेवतात. तिचं वलय इतकं शक्तिशाली होतं की कुठलाही माणूस, कुठलाही पैसा, कुठलीही वेळ आणि कुठलाही देश..तिच्या अढळपदाला धक्का लावू शकणार नव्हत्या...

"चला, चांगलं झालं...भैरव, छान काम केलंस रे बाळा..बरं चला, आपण निघुया, थोड्याच दिवसात भारतात परतायचं आहे..हो ना तने?"

क्रमशः
0

🎭 Series Post

View all