Login

द बॉस - The Boss (पर्व 2- भाग 32 अंतिम)

एका पर्वाचा अस्त..!!!


इथे सगळं नीट झालं होतं. तनिषाला कंपनी परत मिळाली होती. सर्व अधिकार तिच्याकडे आले, तिच्या कल्पनांना प्रत्यक्षात साध्य केलं जाणार होतं आणि तेही तिच्या नावाने. पण माई आता अडून बसल्या होत्या, भारतात परत जायचं. तनिषा समोर मोठा पेच उभा राहिला, आत्ताशी सगळं पूर्वतत झालंय, आता खरं काम सुरू होणार, त्यातच तनिषा भारतात परत येणार म्हणून माई आणि मानव खुश होते. आता सगळं चित्रच पालटलं होतं..

सर्वजण आनंदाने घरी आले होते,पण माईंनी घरी येताच खडा टाकला..

"तने, काय निर्णय घेतलास?" माई रागाने तिला विचारू लागल्या.

तनिषा मौन होती, आज निर्णय घेणं तिच्यासाठी कठीण होतं. इथे दुसऱ्याच्या हातात धुरा सोपवण्यात तिला विश्वास वाटत नव्हता, आर्या आणि स्वरा जरी असले तरी इथे काम करण्यासाठी अनुभव असणं गरजेचं होतं. तनिषाने मानवकडे पाहिलं,

"मानव, आता तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य असेल. आत्तापर्यंत घर, कुटुंब सोडून मी इतके दिवस राहिले. तो काळ तुमच्यासाठी कठीण होता याची जाणीव मला आहे. आता तुम्हीच सांगा.. मी काय करावं!"

"इथे थांबू नकोस, भारतात परत चल हेच म्हणेल तो..हो ना मानव?" - माई

मानवने काहीवेळ विचार केला. एक दीर्घ श्वास घेतला, आणि माईंना म्हणाला,

"आई, तुला रामायणातील कथा माहितीये ना? उर्मिला, लक्ष्मणाची बायको..आपल्या नवऱ्याने कर्तव्य आधी पूर्ण करावं यासाठी चौदा वर्षाचा विरह तिने हसत हसत पत्करला... संत, महात्मे यांच्या सहचारिणीने सांसारिक अपेक्षा न ठेवता पतीला साथ दिली...कारण त्यांना माहीत होतं, की आपल्या क्षुल्लक सांसारिक सुखाहून मोठं कार्य आपल्या साथीदाराने उचललं आहे.."

"बघ तर..कश्या या बायकांनी आपल्या नवऱ्याला साथ दिली...त्यांच्यासोबत राहून पावलोपावली त्यांना समर्थन दिलं.."

"चुकीचा अर्थ घेतलास आई तू..हा त्याग फक्त स्त्रियांनीच का करावा? एखाद्याची बायको कर्तृत्ववान असेल, तिने जर एखादं महान कार्य हाती घेतलं असेल तर पतीने आपल्या बायकोला तिच्या कामाप्रती समर्पित करू दिलं तर काय बिघडलं? बायकोने फक्त सांसारिक गोष्टींप्रति समर्पित व्हावं हा अट्टहास कशासाठी? तनिषा खूप मोठी आहे आई, आपण जितकं समजतो त्याहून कितीतरी मोठी...तिचं काम हीच तिची ओळख आहे, तिचा श्वास आहे..आपण हा श्वास तिच्याकडून काढून घेतला तर तिचं फक्त शरीर आपल्यासोबत असेल, प्राण नाही..तनिषा इथेच राहील, तिचं विश्व उभं करेल, दाहीदिशा जिंकून घेईल आणि जगाच्या पाठीवर तिरंग्याला अजून एक सन्मान प्राप्त होईल.."

माई निःशब्द झाल्या.

****

(काही वर्षानंतर, headlines)

"The real face of America वृत्तपत्र जगातील सर्वात जास्त खप होणारं पहिलं वृत्तपत्र..."

"The real face of America ने वृत्तपत्र आणि मासिक विक्रीचे सर्व रेकॉर्ड तोडून नवा विक्रम उभा केला आहे"

"मिस तनिषा यांना अमेरिकेकडून विशेष पुरस्कार जाहीर"

"जगातील टॉप 10 शक्तिशाली व्यावसायिकांमध्ये मिस तनिषा यांचे नाव, भारतीयांसाठी सन्मानाची बाब"

(शब्दांतर)

शब्दांतरला खूप दिवसांनी एक नवं तेज आलं होतं. अमेरिकेत आपलं बस्तान बसवून तनिषा मायदेशी परतली होती. तिकडचा व्याप भैरवकडे दिला. तनिषाने शब्दांतर मध्ये परतायचा दिवस..
शब्दांतर ऑफिस सजवण्यात आलं होतं. सर्वजण तनिषा मॅमला बघण्यासाठी उत्सुक होते. निकिता तर सर्वात जास्त!

काही वेळाने ऑफिसमोर गाडी उभी राहिली.तनिषा गाडीतून उतरली. पूर्ण डोळ्यात शब्दांतरची बिल्डिंग साठवू लागली. मोठ्या प्रवासानंतर स्वतःच्या घरी परतल्यावर जी भावना निर्माण होते तीच भावना आज उफाळून आलेली. तिने शब्दांतर कडे पावलं टाकायला सुरवात केली.

इथला प्रत्येक क्षण तिला आठवू लागला. माईंपासून लपूनछपून ऑफिसमध्ये येणं, घर आणि ऑफिसची कसरत, वीर भोसले सोबतचा वाद, इनायाची साथ, अवॉर्ड घेतांनाची कसरत, सायबर वॉर...सगळं सगळं आठवत होतं. अंतःकरण इतकं जड झालेलं की मोठया मुश्किलीने ती स्वतःला आवरत होती. आत शिरताच स्टाफने टाळ्या वाजवण्यास सुरवात केली. तनिषाने हसून अभिवादन केले. बराच स्टाफ नवीन होता, जुन्या स्टाफमधील माणसं दिसली की तिला विशेष आनंद व्हायचा. ती आत गेली,
इनाया तिची वाट बघत होती. आत पाहिलं तर, तनिषाची खुर्ची सोडून बाजूला एक साधी खुर्ची टाकलेली.तनिषाला सगळं समजलं..इनाया आणि तनिषाने मिठी मारत भेट घेतली..काय बोलावं ,कुठून सुरवात करावी...दोघींना कळत नव्हतं..त्यांचं मौनच त्यांच्या भावनांची साक्ष देत होतं.

"ही जागा तुझी आहे, तुझीच राहणार.."

असं म्हणत इनायाने तिला खुर्चीवर बसवलं.

काही दिवस तिने ही धुरा सांभाळली, पण नंतर तब्येतीच्या तक्रारी पुन्हा वाढू लागल्या..आर्या पुन्हा एकदा CEO पदावर विराजमान झाली. तरीही तनिषा रोज कंपनीत येऊन काम बघत असे.

***
आता अमेरिकेतील कंपनी आणि शब्दांतर दोघांचाही आलेख वाढतच होता. नवनवीन कल्पनांचा ओघ आटतच नव्हता..विक्रीच्या बाबतीत दोन्ही कंपन्या एक नवा विक्रम रचत..

हे होतं तनिषाचं विश्व, तिचं कार्य, तिचं कर्तृत्व, तिचा स्वाभिमान आणि तिचं सर्वस्व..!!!

एके दिवशी तनिषा नेहमीप्रमाणे शब्दांतरमध्ये आली. पण आज तिची चाल जरा मंदावली होती. तिची नजर शब्दांतरचा कण अन कण मिठीत घेऊ बघत होती. अगदी पार्किंग मध्ये लावलेल्या झुडुपांकडेही ती प्रेमाने बघत होती आणि कृतज्ञता दर्शवत होती.

स्टाफ कामात व्यस्त होता. त्यांना व्यस्त पाहून तनिषाला एक वेगळंच समाधान मिळालं..ऑफिसमध्ये ती प्रत्येक भिंतीकडे बघत होती..काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती..

आत गेली, ज्या प्रिंटिंग मशीनमधून मासिकं छापली जायची त्याच्याजवळ गेली. त्याच्यावर डोकं टेकवून त्याला नमस्कार केला.

शेजारी खुर्चीवर जाऊन बसली..भैरवला फोन लावला. तो हॅलो हॅलो करत होता पण ही काहीच बोलत नव्हती, त्याचा आवाज तिला फक्त ऐकायचा होता.

इनायाच्या केबिनमध्ये गेली, काहीही न बोलता इनायाकडे बघून फक्त हसली..नजर वळताच डोळ्यात पाणी आणलं आणि निघून गेली..

नंतर ती आर्याच्या केबीनमध्ये गेली. आर्या खिडकीपाशी उभी राहून फोनवर बोलण्यात व्यस्त होती. तनिषा खुर्चीजवळ गेली. त्यावरून एकदा हात फिरवला, नमस्कार केला..त्यावर हळूच जाऊन बसली..चेहऱ्यावर वेगळंच हास्य होतं.. वेगळंच समाधान होतं..तिने शांतपणे आपले डोळे मिटले..

आर्याचं फोनवर बोलून होताच ती वळली,

"आई...अगं 10 मिलियन डॉलर ची एक डील करतोय आपण..खूप वाट बघत होते यासाठी.. तुला महितीये आई...आई..ऐकतेय ना? आई काय झालं????? स्वरा, रघु...sssss , आईला काय झालं....बघा ना..!!!"

आणि अश्या प्रकारे एक झंझावात शमलं... कायमचं...चौफेर आपली प्रकाशकिरणं पेरून एका तेजस्वी सूर्याचा अंत झाला..ती गेली, पण तनिषा मात्र कणाकणात जिवंत होती...वृत्तपत्रात, मासिकात, लोकांच्या मनात तिने कायमस्वरूपी आपलं अस्तित्व कोरलं होतं..

समाप्त

*****

तनिषा संपली आणि सगळंच संपलं, तिला असं जातांना वाचून तुम्हाला जेवढं भरून आलं असेल तेवढंच मीही लिहिताना भावुक झाले होते .

तनिषा हे फक्त पात्र नाही, ती एक तेजस्विता आहे..आपल्या प्रत्येकात दडलेली, तिने बाहेर यायला हवं, आपल्या कर्तृत्वाने दशदिशा गाजवायला हव्यात आणि कर्तृत्व काय असतं याच्या सर्व व्याख्या बदलायला हव्यात..

आता अजून काही लिहीत नाही, हा प्रवास इथवरच...

नियमित वाचकांनी कमेंट्स मध्ये नक्की व्यक्त व्हा, द बॉस चा प्रवास, कसा होता, काय आवडलं..नक्की सांगा..
0

🎭 Series Post

View all