"इनाया मॅडम याक्षणी तुमची कंपनीला गरज आहे, तुमच्याशिवाय हे काम कुणीही करु शकत नाही"
"या जागेवर दुसरं कुणी हवंच होतं तर भैरव सर का नाही? एकदा मी त्यांच्याशी बोलते आणि मग बघू"
इनायाने भैरवला ऑफिसमध्ये बोलावून घेतलं. भैरव ऐकेल की नाही शंका होतीच, पण एक शेवटचा प्रयत्न इनाया करत होती.
"भैरव, तुला CEO बनायची ईच्छा होती ना? आज ती संधी तुला आहे. इथे या खुर्चीवर तू बस, गेले कित्येक वर्षे तू कंपनीसाठी योगदान दिलं आहे..जाणीव आहे आम्हाला"
"मॅडम , ही जाणीव फार उशिरा झाली तुम्हाला, आता वेळ निघून गेली आहे. मला असं भीक देऊन मिळालेलं पद नकोय"
"भीक? ही कुठली भाषा भैरव?"
"खरं तेच बोलतोय"
"तुला ती ऑफर मिळाल्यापासून तू खूप बदलला आहेस भैरव. आधी नव्हतास असा"
"कारण आधी माझ्या योग्यतेला मान नव्हता जो आता मिळाला आहे"
"तुला अमेरिकेत बोलावताय कारण त्यांना तनिषा मॅमला टक्कर द्यायची आहे. तनिषा मॅम ने शिकवलेल्या गोष्टी त्यांच्याच विरुद्ध वापरण्यासाठी तुझा वापर केला जाणार आहे"
"मग हरकत काय आहे? हे कार्पोरेट जगत आहे, इथे या सर्व गोष्टी होतच असतात"
भैरवला समजवण्यात काही अर्थ नाही हे इनायाला अखेर समजलं. भैरवला अमेरिका, तिथलं वातावरण, तिथलं स्टेटस याची भुरळ पडली असावी, दुसरं काय !
*****
(शब्दांतर कॅन्टीन)
(शब्दांतर कॅन्टीन)
"तनिषा मॅम पण कमाल आहेत हा, अमेरिकेत जाऊन तिथून अवॉर्ड घेऊन आल्या? खरंच कौतुक आहे" - निकिता
"ते तर आहेच गं, ती बातमी वाचल्यानंतर सर्वांची तोंडं बंद झाली. नाहीतर इथे काय काय अफवा पसरवल्या जात होत्या.. मॅम काय ड्रग्सच्या आहारी गेल्या, मॅम ने तिकडेच एका माणसाशी संसार थाटला अन काय अन काय.." - अनुष्का
"पण एक संकट गेलं की दुसरं उभं राहतं मॅम समोर" - निकिता
"आता कुठलं?" - अनुष्का
"भैरव सर, इतकी वर्षे इथे काम केलं..आणि आता सोडून जाताय" - निकिता
"आपल्या सारख्याचं ठीक आहे, पण इतक्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीने, ज्यांनी आपलं सर्वस्व कंपनीला दिलं त्यांनी असा निर्णय घेणं म्हणजे..." - अनुष्का
"आजकाल स्वार्थासाठी माणसं काहीही करू शकतात, दुसरं काय" - निकिता
"बरं ऐक ना, मी युरोप टूर प्लॅन करतेय..खूप आवडतं मला फिरायला.. " - अनुष्का
"कुणासोबत?" - निकिता
"आहे 1-2 फ्रेंड्स, तुही चल.."- अनुष्का
"बापरे, मी कधी मुंबई सोडलं नाही, अचानक युरोप टूर?"
"आत्ता नाही तर कधीच नाही.."
****
(The real face of America office)
कार्ल, आर्या, हेझल आणि तनिषा. तिघेही मिटिंग साठी एका बंद खोलीत बसतात. खोलीत अंधार असतो आणि टेबलच्या वर मध्यभागी एक छोटा बल्ब चमकत असतो. तनिषा कुठलाही नवीन महत्वाचा निर्णय घेतांना असाच घेत असे. जेणेकरून मिटिंग मधल्या सदस्यांचं लक्ष पूर्णपणे आपल्या बोलण्यावर केंद्रित होईल.
"तर आजची आपली ही मिटिंग असणार आहे आपल्या नव्या प्लॅन साठी, वर्तमानपत्र.. the real face of America newspaper. वर्तमानपत्र प्रकाशित करणं सोपं आहे पण त्याला उंचीवर नेऊन ठेवणं कठीण आहे..पण अशक्य नाही. अवाजवी स्वप्न बघत असलो तरी वास्तवतेचं भानही आपल्याला ठेवायचं आहे..सर्वात प्रथम, आपल्याला चार महत्वाचे डिपार्टमेंट लागतील, एडिटर्स.. जे कार्ल आणि हेझल असतील.दुसरं डिपार्टमेंट पत्रकार, जे आपल्याला नवीन नेमावे लागतील, तिसरं असेल डिझायनर्स, जे काम आर्या बघेन आणि चौथं प्रिंटिंग आणि डिस्ट्रिब्युशन..खूप मोठी जबाबदारी आहे आपल्यावर , बोला, जमेल?"
सर्वांना वाटलेल्या कामाच्या दडपणापेक्षा मॅमचा आत्मविश्वास जास्त भावला होता, तनिषाने खूप सचोटीने ही उर्जा तिच्या टीम कडे प्रवाहित केली होती.सर्वजण एकसुरात म्हणाले,
"येस मॅम"
"आता सर्वात महत्वाची गोष्ट.. लोकांनी आपलं वर्तमानपत्र का घ्यावं? इतकी सगळी वर्तमानपत्र अस्तित्वात असतांना आपलंच का निवडावं.."
"कारण...आपली news चांगल्या पद्धतीने present केलेली असेल.."
"लोकांना presentation नकोय, मजकूर हवाय..जो बायडन अमेरिकेचे नवीन प्रेसिडेंट.. ह्या बातमीत वेगळेपण काय असेल?"
सर्वजण विचार करू लागतात, तो एक धागा हवा होता ज्याने हे वर्तमानपत्र लोकांना आवडायला हवं. विचार करूनही कुणाला काही सुचलं नाही..मग शेवटी तनिषा म्हणाली,
"लोकांना आजकाल काय हवं आहे? सर्वजण त्यांच्या रोजच्या रुटीनला कंटाळलेले, वैतागलेले अशी लोकं. सकाळी सकाळी डोकं फिरवणाऱ्या आणि गंभीर बातम्या वाचायला कुणाला आवडेल? पर्याय नसतो म्हणून ती सवय लोकांनी अंगिकारली आहे फक्त!"
"म्हणजे...लोकांना मनोरंजन हवंय"
"एक्साक्टली, तुम्ही वर्तमानपत्र जेव्हा फक्त चाळता, तेव्हा सर्वात आधी लक्ष कुठे जातं? एखादं व्यंगचित्र असेल तिथे, किंवा एखादा विनोद लिहून आलेला असेल तिथे..बरोबर?"
"बरोबर.. मग, आपण फक्त विनोदी लेखन लिहायचं?"
"बातमी आणि विनोद, यांची सांगड घालायची. Saracastic लेखन करायचं.."
सर्वांच्या डोळ्यात चमक दिसायला लागली. हा विचार आपल्या डोक्यात का येत नाही हाच विचार सर्वजण करू लागले. पण फक्त आर्याला माहीत होतं, की हा विचार फक्त आईच्या डोक्यातच येऊ शकतो.
तरी कार्लला अजून पूर्णपणे कन्सेप्ट समजली नाही, त्याचे भाव ओळखून तनिषा त्याला म्हणाली,
"कार्ल, ही बघ..एक बातमी आहे. कोरोंना काळात फक्त 50 लोकांचा कार्यक्रम बंधनकारक असतांना एका कार्यक्रमाला संख्या जास्त झाली आणि पोलीस तेथे आले. आसपासच्या व्यक्तिंनी तक्रार करताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आढावा घेतला"
"आता संख्या जास्त झाली ही बातमी कुणी दिली असेल माहितीये? त्याच्या शेजाऱ्याने.."
या बातमीत विशेष असं काहीच नाही, पण हीच बातमी खालीलप्रमाणे दिली तर?
"शेजारी लग्नाच्या पंगती उठत होत्या, आम्हाला निमंत्रणच नव्हतं ना राव ! मग काय, खिडकीत बसलो माणसं मोजत, जशी पन्नास च्या वर माणसं गेली तसा लावला ना पोलिसांना फोन, आम्हाला बोलावत नाही काय..! घ्या आता"
सर्वजण हसू लागले..
"सॉरी पण मी हे आमच्या भारतीय भाषेत सांगितलं..पण इथला homour वापरून लिखाण करण्याची जबाबदारी कार्ल आणि हेझल तुमच्यावर.."
सर्वजण टाळ्या वाजवू लागतात.
"अजून एक..आपलं वर्तमानपत्र सर्वांहून विशेष असेल..मला सांगा वर्तमानपत्र जुने झाल्यावर त्याचं काय करतो? रद्दीत देतो..बरोबर?"
"पण आपलं वर्तमानपत्र घराघरात, प्रत्येक दुकानात, प्रत्येक विक्रेत्याकडे, प्रत्येक व्यवसायिकाकडे असेल.."
"ते कसं???" सर्वांच्या चेहऱ्यावर प्रचंड उत्सुकता..!!
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा