Login

"दुसरी बाजू" दादांच्या आठवणीत सुनेत्रा भाग - २

Jachye Dukhaa tayla Thave
जलदलेखन स्पर्धा फेब्रुवारी २०२६ "
विषय :दुसरी बाजू
​शिर्षक :"दादांच्या आठवणीत सुनेत्रा"
भाग-२
आज घराची ही शांतता मला अस्वस्थ करतेय दादा.तुम्हाला लोकांच्या गराड्यात राहायची सवय आणि मला तुमची वाट पाहण्याची. राजकारणाच्या या धकाधकीत 'सुनेत्रा' नावाचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे, हे जणू जग विसरूनच गेलं होतं.
तुमच्या सावलीत राहताना मी स्वतःला इतकं विसरले की, कधीकधी आरशात पाहताना मला माझ्यातही तुम्हीच दिसायचात.
​तुम्ही म्हणायचात, "कामाचा धडाका असावा की समोरच्याने पाहत राहावं." तुम्ही ते करून दाखवलंत.
बारामतीचा कायापालट झाला, रस्ते चकाकले, संस्था उभ्या राहिल्या. पण या विकासाच्या वेगात आपल्या दोघांमधला संवादाचा पूल मात्र थोडा कच्चाच राहिला.
रात्री उशिरा तुम्ही घरी यायचात, जेवतानाही फोनचे रिंगटोन वाजत असायचे. मी वाढलेलं ताट समोर असायचं, कारण तुम्हांला जेवायला वाढायचे काम मुद्दामहून मी माझ्याकडेच घेतले होते. कारण तेवढा तरी आपल्यात सुसंवाद होईल ही भाबडी आशा.
पण तुमचं लक्ष फाईल्समध्ये असायचं. कधीतरी वाटायचं, तो फोन हिसकावून घ्यावा आणि म्हणावं, "अजित, आज जेवण कसं झालंय ते तरी सांगा!" पण तुमच्या चेहऱ्यावरचा तो थकवा पाहून शब्द ओठांवरच विरून जायचे.
नात्याची कसोटी तेव्हा लागली जेव्हा राजकारणाने नवीन वळण घेतले. कुटुंबात, पक्षात आणि विचारांत जेव्हा दोन तट पडले, तेव्हा माझी अवस्था एखाद्या दोरीवरच्या कसरत करणाऱ्या डोंबारणी सारखी झाली होती.
एका बाजूला माहेरचे नाते, दुसऱ्या बाजूला सासरची परंपरा आणि मधोमध 'तुम्ही'. लोक टीका करत होते, जवळची माणसं अंतर ठेवून वागत होती. त्या काळातही मी तुमच्या मागे खंबीरपणे उभी राहिले.
लोक म्हणायचे की मी तुमच्या राजकारणात ढवळाढवळ करतेय, पण त्यांना काय माहीत की मी केवळ तुमची साथ निभावत होते.​त्या काळात तुमच्या एकाकीपणाचे साक्षीदार फक्त मी आणि हे घर होतं.याची कल्पना इतरांना कशी असणार?
बाहेरून फणसासारखे दिसणारे तुम्ही, आतून किती हळवे झाला होतात हे फक्त मलाच दिसत होतं. पण तेव्हाही मला वाटायचे तुम्ही माझ्या जवळ बसून शांतपणे दोन शब्द बोलावेत,पण सगळे पण ही परंतु ही देखिल माझी अपेक्षा अधुरीच राहिली.
दादा, आयुष्याच्या शेवटच्या वळणावर तरी तुम्हाला वाटलं होतं का, की आपण आपल्या हक्काच्या माणसाला खूप गृहीत धरलं? की तुम्हाला खात्री होती, "काहीही झालं तरी सुनेत्रा कुठे जाणार नाही, ती तिथेच उभी असेल.दादा किती हे गृहीत धरणे एखाद्याला!
क्रमशः
0

🎭 Series Post

View all