जलद लेखन स्पर्धा फेब्रुवारी २०२६
विषय :दुसरी बाजू
शिर्षक:"दादांच्या' आठवणीत सुनेत्रा भाग -३
आज घरातली शांतता बघून मला आतून गलबलून येतेय. अशी शांतता कधीच या घरानी पाहिली नाही.
आपल्या बारामतीच्या घरातील बऱ्याच सणावारांची आठवण येते. त्यातली त्यात दिवाळी सणाची प्रकर्षाने आठवण येतेय. आपल्या घरी पाडवा म्हणजे केवळ सण नसायचा, तो तर एक जनसोहळा असायचा.
पहाटे ५ वाजल्यापासून घराबाहेर कार्यकर्त्यांच्या रांगा लागायच्या. मी पहाटे उठून अभ्यंगस्नानाची तयारी करायचे, पण तुम्हाला तुमच्या लाडक्या जनतेला भेटण्याची इतकी घाई असायची की, घरातील पूजेपेक्षा बाहेरचे 'अभिवादन' तुम्हाला महत्त्वाचे वाटायचे.
मला आठवतंय, मी ओवाळणीचे ताट घेऊन तुमची वाट पाहत उभी असायचे. तुम्ही गडबडीत यायचात, मी ओवाळताना सुद्धा तुमचे लक्ष घराबाहेर थांबलेल्या लोकांकडे असायचे.
ओवाळणी म्हणून तुम्ही माझ्या हातात काहीतरी ठेवायचात, पण मला त्या पैशांपेक्षा किंवा दागिन्यांपेक्षा तुमच्या डोळ्यांतली ती दोन मिनिटांची निवांत साथ हवी असायची. पण तुमचं लक्ष नेहमी घड्याळाकडे असायचं.
"सुनेत्रा, लवकर उरक, बाहेर लोक लांबून आलेत," हे तुमचे शब्द आजही कानात घुमतात.
भाऊबीजेच्या दिवशी तर तुमची धावपळ बघून मला नवल वाटायचे. सख्ख्या बहिणींपासून ते मानलेल्या बहिणींपर्यंत सर्वांना तुम्ही वेळ द्यायचात.
पण त्याच वेळी, मी माझ्या भावाकडे, पद्मसिंह दादांकडे जाण्यासाठी निघताना तुमच्या चेहऱ्यावर एक आश्वासक भाव असायचा.
राजकारणात कितीही मतभेद झाले, तरी "सुनेत्रा, नाती जपावी लागतात," हे तुम्हीच मला शिकवलंत. पण आज बघा ना दादा, त्याच नात्यांच्या बाजारात मला 'परकी' ठरवण्यात आलं.
लोक म्हणतात दादांनी बारामतीचा कायापालट केला. पण या प्रवासात तुम्ही मला नक्की कितीसा वेळ दिलात? मी तर म्हणेन काहीच नाही.
सकाळी ५ वाजता घराबाहेर पडणारा माणूस रात्री उशिरा घरी यायचा. मुले मोठी झाली, घराचा व्याप वाढला. पण तुम्ही सर्व माझ्या खांद्यावर निर्धास्तपणे टाकून स्वतःला जनतेसाठी वाहून घेतले.
जनतेचे दादा नेहमीच जनतेचे राहिले, माझ्या वाट्याला ते आलेच किती? तुमच्या ध्येयासाठी मी माझे आयुष्य आणि माझ्या इच्छा बाजूला सारल्या. आज तुम्ही गेलात... मागे राहिली आहे ती फक्त एक शांतता.
खूप काही बोलायचे राहून गेले, खूप काही सांगायचे राहून गेले. तुम्ही जनतेसाठी महान असालच, पण माझ्यासाठी तुम्ही आपल्या उभयतांच्या संसाराच्या प्रवासातील सारथी आहात, ज्यानी ती साथ अर्ध्यावरच सोडली.
जेंव्हा राजकारणाच्या रणांगणात माझी आणि एक आई म्हणून माझी किती घुसमट झाली, हे दादा मी कसे विसरू?जेंव्हा
अस्तित्वाची आणि नात्यांची कसोटी लागली होती.
दादा, तुम्ही जनतेसाठी लढत राहिलात, पण मधल्या काळात नियतीने मलाच रणांगणात उतरवले.
बारामतीच्या त्या निवडणुकीत मी उभी राहिले, पण ती निवडणूक फक्त मतांची नव्हती तर ती माझ्या अस्तित्वाची आणि नात्यांची कसोटी होती.
क्रमश:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा