जलदलेखन स्पर्धा फेब्रुवारी २०२६
विषय :दुसरी बाजू
शिर्षक :दादांच्या आठवणीत सुनेत्रा" भाग-४
लोक म्हणत होते मी उमेदवार आहे, पण माझ्या मनात मात्र सतत कालवाकालव सुरू होती.
अखेर निकाल लागला आणि मी हरले.पण त्या पराभवाच्या वेदनेपेक्षाही जास्त क्लेश मला त्यावेळच्या परिस्थितीने दिले.
निवडणूक म्हटली की हार-जीत आलीच, पण या निवडणुकीने माझ्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे केले.
जनता मला 'वहिनी' मानत होते, पण त्याच वेळी घराघरात नात्यांची चर्चा होत होती. माझ्या नावाला 'परकी' हे संबोधन लावण्यात आले, जे माझ्या जिव्हारी लागले.
आपल्या संस्कृतीप्रमाणे एक स्त्री लग्नानंतर माहेरची पाहुणी होते आणि सासर तिचे हक्काचे घर होते. लग्नानंतर सासरची माणसं आपली होतात, त्यांच्या सुखादुखात आपण एकरूप होतो.
मग ऐन निवडणुकीच्या धामधुमीत या 'परकी' शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? मी तर फक्त एक 'प्यादे' होते का,ज्याचा वापर सोयीनुसार केला गेला? हे प्रश्न आजही माझ्या मनात काहूर माजवतात.
पार्थच्या बाबतीतही राजकारणातील प्रवेशावेळी आणि त्यानंतर जे काही घडले, त्याने माझ्या मनाला मोठा मनस्ताप झाला.'मी आई आहे हो शेवटी!' मुलाच्या वाट्याला आलेले अपयश, त्याच्यावर झालेली बोचरी टीका आणि त्या सगळ्यातून त्याला सावरताना माझी जी ओढाताण झाली, ती कोणीच पाहिली नाही.
राजकारण निष्ठुर असते म्हणतात, त्याचा प्रत्यक्ष अनुभव मला पार्थच्या रूपाने आला. मुलाचे करिअर आणि घराण्याची प्रतिष्ठा या दोन चाकांत मी अक्षरशः भरडली गेले.
एका बाजूला आईचं प्रेम होतं आणि दुसऱ्या बाजूला कुटुंबाची परंपरा; या संघर्षात माझी जी घालमेल झाली, ती शब्दांत मांडणे कठीण आहे.
सत्ता येते आणि जाते, पण नात्यांची वीण एकदा उसवली की ती पुन्हा सांधणे कठीण असते. निवडणुकीच्या रिंगणात विजय कोणाचाही झाला तरी, जेव्हा घरचीच माणसं एकमेकांसमोर उभी ठाकतात, तेव्हा पराभव हा केवळ एका व्यक्तीचा नसून संपूर्ण कुटुंबाचा होतो.
माझ्या वाट्याला आलेल्या या 'परकेपणाने' मला अंतर्मुख केले. पण त्याही वेळी मी शांत राहिले, कारण माझ्या पाठीशी संस्कारांची शिदोरी होती.
आज मी सावरले आहे. या अनुभवाने मला शिकवले की, राजकारणाच्या खेळापेक्षा माणसांची मने जपणे जास्त महत्त्वाचे असते.
मी निवडणुकीत हरले असेन, पण स्वतःच्या नजरेत आणि माणुसकीच्या परीक्षेत मी आजही खंबीर आहे. हा 'परकेपणा' आणि ही 'ओढाताण' मला भविष्यासाठी अधिक कणखर बनवून गेली आहे.
आता दुःख करत बसण्यापेक्षा, त्याच अनुभवाच्या शिदोरीवर मला पुढची वाटचाल करायची आहे.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा