Login

दागिना.. भाग २

कथा एका दागिन्याची..
दागिना.. भाग २
©अनुप्रिया

भार्गवीचं मन आक्रोश करत होतं. बाबांचं सोडून जाणं पचवतेय नं पचवतेय तोच बाबांच्या मागोमाग अवघ्या आठ दिवसांनी तिच्या आईने देह सोडला होता. भार्गवी पूर्णपणे ढासळली होती. डोळ्यातल्या सागराला राहून राहून भरती येत होती. आईचा प्रेमळ चेहरा पुन्हा पुन्हा नजरेसमोर येत होता.

“किती माया करायची आई! आम्हा तिघाही भावंडांवर तितकंच प्रेम केलं. कधीही भेदभाव केला नाही.. कोणाच्याही प्रेमात दुजाभाव केला नाही. सर्वांना समान वागणूक दिली. मग आता तिच्या पोटी जन्म घेतलेली आम्ही भावंडं अशी कशी निपजलो? का असं झालं? का प्रेमापेक्षा स्वार्थ मोठा झाला? घासातला घास काढून देणारी भावंडं आज संपत्तीच्या वाटणीवरून वाद करताहेत? अंधाऱ्या खोलीत भीती वाटत असताना दादा हात घट्ट पकडून तुला मी कधीच कुठेच सोडून जाणार नाही असं म्हणत असताना आता अचानक त्याला त्याचा स्वतंत्र संसार आठवतोय? त्याचा हात माझ्या हातातून निसटतोय.. काय सुरू आहे सगळं?”

भार्गवीच्या डोळ्यासमोर जुन्या आठवणी पिंगा घालू लागल्या. आपल्या आईबाबांचा दुष्ट लागण्याजोगा संसार आणि प्रशांत, भावेश आणि तिचं चाळीतलं ते रम्य बालपण आठवू लागलं. कडक शिस्तीचे बाबा आणि माया करणारी आई आठवून डोळे भरू लागले. चाळीतले तिचे मित्रमैत्रिणी, त्या गंमतीजंमती आठवू लागल्या आणि मग तिच्या ओठांवर किंचित हसू उमललं. तेंव्हा चाळीतली सर्व लहान मुलं आपल्या बाबांना खूप घाबरायची. बरोबरच होतं म्हणा! प्रत्येकाचे बाबा होतेच कडक स्वभावाचे! मुलांनी वाईट मार्गाला जाऊ नये म्हणून त्यांना धाक दाखवायचे. कधी कधी फटकेही मिळायचे. सर्वच मुलांना आपापल्या बाबांचा खूप धाक वाटायचा. बाबा म्हणतील तीच पूर्व दिशा असायची.

प्रत्येकाच्या घरी एक नियम असायचा. काहीही झालं तरी, दिवेलागणीच्या वेळीस मुलांनी आपापल्या घरी असायलाच हवं नाहीतर मग कोणाचंच काही खरं नसायचं; पण सारी मुलं इतके अतरंगी होती ना काय सांगायचं, एकदा का खेळात रमली की, मग कशाचंच भान उरायचं नाही. तहानभूक हरपून खेळत राहायची. मग घरी आल्यावर बाबांचा मार खावा लागायचा. यावर मग मुलांनीच एक उपाययोजना केली, कोणालाही कोणाचेही बाबा चाळीत शिरताना दिसले की लगेच सूचक आवाज करून एकमेकांना सावध करायचं. प्रत्येकाच्या बाबांना त्यांच्या नावाव्यतिरिक्त एक टोपण नाव होतं. त्या नावाने मोठमोठ्याने ओरडायचं. मग काय, मुलं कुठेही खेळत असली तरी, मित्रांचा आवाज कानी पडताच घराच्या दिशेने धूम ठोकायची आणि बाबा घरात पोहचायच्या आधीच घरात हजर राहायची. वह्या पुस्तकं समोर ठेवून अगदी शहाण्या मुलासारखं अभ्यास करत बसायची. किती तो निरागसपणा! बिचाऱ्या बाबांनी घरात पाऊल टाकलं की त्यांना मुलं समोर अभ्यास करताना दिसायची. मुलं शांतपणे अभ्यास करताहेत बघून बाबा खूष व्हायचे. आणि समजा कधी घरी यायला उशीर झालाच आणि हे सगळं करायला वेळ पुरला नाही; तर मग दुसरा सोप्पा उपाय म्हणजे, डायरेक्ट बाथरूममध्येच लपून बसायचं. बाबांच्या क्रोधापासून वाचण्याचा हा तात्पुरता उपाय असायचा. भार्गवीचे बाबा अतिशय कडक स्वभाव असल्याने कधी काय घडेल याचा नेम नसायचा. त्यामुळे तेच काय पण चाळीतली इतर मुलंही त्यांना वचकून असायची. तिच्या बाबांनी नुसतं डोळे मोठे करून पाहिलं ना तरी हातपाय थरथर कापू लागायचे.

आईबाबा आणि त्यांची तीन मुलं आनंदाने राहत होतो. घराचं अगदी नंदनवन झालेलं. दहा बाय दहाच्या खोलीत थाटलेला तिच्या आईबाबांचा संसार आता हळूहळू बहरू लागला. भार्गवीचे बाबा एका खाजगी कंपनीत ‘मशीन ऑपरेटर’ म्हणून काम करायचे. तिथे त्यांना प्रचंड काम असायचं; पण त्यामानाने पगार फारच तुटपुंजा होता; पण आईच्या रूपानं घरात साक्षात लक्ष्मीच नांदत होती. उसवलेल्या आयुष्याला ठिगळ लावता लावता दमछाक व्हायची खरी, पण मातृत्वाचा, पितृत्वाचा प्रवास खरंच फार गोड होता. तिचे बाबा रात्रंदिवस मेहनत करायचे. त्यांचे सगळे लाड पुरवायचे. तिची आई त्या तुटपुंज्या पगारातही काटकसरीने घर चालवायची. संपूर्ण महिन्यासाठी लागणाऱ्या घरखर्चाचं छान नियोजन करायची. घरखर्चातले काही पैसे बाजूला काढून ठेवायची. गुंज गुंज सोनं जमा करत राहिली. भार्गवीच्या आत्यांची लग्नं, काकांची शिक्षणं याच साठवलेल्या पैशातूनच तर झाली होती. कायम समाधानाने ओतप्रोत भरलेले भार्गवीचे आईबाबा तिच्यासाठी एक आदर्श होते.