Login

दागिना..

कथा एका दागिन्याची..
दागिना..
©अनुप्रिया

“का हट्ट करतेस? आई गेलीये आता.. मग बाकीच्या गोष्टींना घेऊन काय करायचंय तुला?”

प्रशांत भार्गवीला दटावत म्हणाला.

“मी कुठे सगळे दागिने मागतेय? मला फक्त ते आईच्या नावाचं तिच्या गळ्यातल्या चेनमधलं पेंडन्ट हवंय अरे.. बाकी नको काही मला..”

भार्गवी काकुळतीला येऊन म्हणाली. तिचे डोळे बरसू लागले.

“कशाला हवंय? दागिन्यांवर आईनंतर तिच्या सुनेचा, म्हणजेच तुझ्या वहिनीचाच अधिकार आहे. भविष्यात तुलाही तुझ्या लग्नानंतर तुझ्या सासूचे दागिने मिळतीलच नां? तुझ्या नवऱ्याची सर्व स्थावर मालमत्ता, संपत्ती सारं काही तुलाच मिळेल. शिवाय नवऱ्याच्या वडिलोपार्जित संपत्तीत तुझाही हिस्सा असेलच नां? मग आता कशाला तुझा जीव आईच्या दागिन्यात अडकलाय?”

भावेश, भार्गवीचा धाकटा भाऊ तिच्यावर चिडून म्हणाला.

“भावेश, अरे कुठला विषय तू कुठे नेतोयस? इथे माझ्या लग्नाचा कुठे प्रश्न आला? भविष्यात लग्नानंतर काय होणार हे भाकीत तू आताच कसं काय वर्तवतोयस? मला ते पेंडंट हवंय. बाकी मला काही नकोय. प्लिज ते पेंडन्ट मला दे..”

“इतके दिवस तर आई.. आईचा जप सुरू होता. आईसाठी लेकीने काय काय केलं याचे पाढे साऱ्या जगाला वाचून दाखवले जात होते. माझ्यासाठी माझे आईबाबा सर्वांत जास्त महत्वाचे आहेत. त्यांच्यापुढे मला बाकी दुसरं काहीच दिसत नाही. हे सगळं आईबाबांसाठी करतेय असं या बाईसाहेब म्हणत होत्या. फार लाडाच्या होत्या नां; मग आता काय झालंय? किती तो हावरटपणा! आता आईच्या दागिन्यावर डोळा? बक्कळ पैसा आहे. गलेलठ्ठ पगार घेतेय; पण म्हणतात नं! कितीही असलं तरी माणसाला मोह सुटत नाही. एवढी कमावते तरी आईच्या दागिन्यांवर डोळा आहेच.”

आपल्या वहिनीच्या अपर्णाच्या शब्दांनी भार्गवी व्यथित झाली.

“वहिनी, तसं नाहीये अगं.. तू सगळे दागिने ठेव.. मला फक्त तिच्या नावाचं ते पेंडन्ट दे.. तितकीच तिची आठवण माझ्याजवळ राहू देत. इतकंच माझं म्हणणं आहे. तू का छोट्या छोट्या गोष्टींचा बाऊ करतेस अगं? हे बघ वहिनी, आधीच माझी मनःस्थिती ठीक नाहीये. तू उगीच वाद उकरून काढू नकोस.”

भार्गवी वैतागून म्हणाली. तरी भार्गवीच्या वहिनीचा तोंडाचा पट्टा सुरूच होता. तिने वैतागून कानावर हात ठेवले. आसवांचा बांध फुटून वाहू लागला होता. आज तिच्या आईवडिलांच्या प्रॉपर्टीची वाटणी होत होती. मन सुन्न झालं. काय करावं समजेना.

“आई का अशी गेलीस गं? मला एकटीला सोडून गेलीस नं? तुझी भार्गवी कशी जगेल याचा साधा विचारही तुझ्या मनात आला नाही? माझ्या मनातलं मी न बोलताही समजून घेणारी तू एकमेव व्यक्ती होतीस. नाळ जोडलेली असते नं.. माझं दुखणं, खुपणं, माझ्या आवाजातल्या चढउतारावरून माझी मनःस्थिती समजून घेणारी माझी आई.. मग का अशी सोडून गेलीस? आपल्या बाबांच्या मागोमाग जाऊन तू तुझा पत्नीधर्म निभावलास; पण आईचा धर्म? तो कसा विसरलीस? असं म्हणतात, आई आपल्या लेकराला कधी सोडून जात नाही; मग तू कशी गेलीस? आणि का गेलीस आई?”

भार्गवीचं मन टाहो फोडत होतं. आईला जाब विचारत होतं.

“बाबा, तुम्हीही खुशाल निघून गेलात? का इतके रागावलात बाबा? कशी जगू मी? या स्वार्थी जगात कसं जगायचं? कसं वागायचं हे मला आता कोण समजावून सांगेल? माणसं ओळखायला कोण शिकवेल मला? सांगा नं बाबा.. कशी जगू मी?

बाबा, तुम्ही दाखवलेल्या मार्गांवरूनच चालतेय ओ.. तुमच्यासारखीच स्वामीभक्ती, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यासोबत जबाबदारीची जाणीव हे सारे गुण माझ्यातही उतरले आहेत. ते मी जपण्याचा खरंच प्रयत्न करतेय आणि यापुढेही आयुष्यभर नक्कीच जपेन; पण बाबा, तुमची चिऊ अजून लहानच आहे न? दुनियादारी नाही ओ कळत तिला? आता तुम्ही नाहीत तर कोण सांगेल सारं?

बाबा तुम्ही अचानक आम्हाला सोडून गेलात. असे कसे गेलात? इतके आम्हाला कंटाळला होतात? तुमच्या जाण्याने मी अक्षरशः कोलमडून गेले होते; पण आईचा चेहरा डोळ्यासमोर यायचा. तिच्यासाठी तरी मला कणखर व्हायला हवं. मीच जर रडत राहिले तर तिला कोण सावरणार या विचारांनी मी माझ्या आसवांना आवरलं. मनाचा कोंडमारा होत होता पण तरीही तो कोणाला दाखवला नाही. शांत राहण्याचा अतोनात प्रयत्न करत होते. तुम्ही जाण्याच्या धक्क्यातून नीट सावरलेही नव्हते आणि नियतीने पुन्हा घात केला. जिच्यासाठी जगत होते, उभी राहण्याचा प्रयत्न करत होते तीच मला कायमची सोडून गेली. आई कुठे गेली बाबा? आई कधीच तुमच्या शब्दाबाहेर नव्हती. कायम तुमचा शब्द तिने अंतिम आदेश म्हणून डोक्यावर मिरवत राहिली. तुम्हीच तिला बोलवून घेतलंत ना? तुमची मुलं आईशिवाय कशी राहतील असं क्षणभरही तुम्हाला वाटलं नाही? ”