Login

दागिने         भाग १

अमोल आपल्या थोरल्या वहिणीवर आईचे सदेव दागिने लंपास केल्याचा आरोप सर्वांसमोर लावतो. पुढे नक्की काय होत या कथेत नक्की वाचा.


दागिने         भाग १


@लघुकथा
©® आरती पाटील - घाडीगावकर


" वाटलं नव्हतं एवढ्या आतल्या गाठीच्या असाल. माझ्या आईचे दागिने सर्व घेतले वर मला त्याबद्दल काहीच माहित नाही असं सांगताय ? जनाची नाही किमान मनाची तरी लाज ठेवा. " अमोल आपल्या थोरल्या वहिनीला सर्वांसमोर जोरजोरात ओरडत होता. आणि स्वरा अश्रू ढाळत उभी होती.

आज रमाबाईंचा तेरावा होता. त्यासाठी सर्व नातेवाईक जमले होते. अमोल सुद्धा आपल्या बायकोसोबत ( मीनासोबत ) आला होता. तेरावाचा कार्यक्रम झाला आणि नातेवाईकांसमोरच अमोलने आपल्या विधवा थोरल्या वहिणीकडे आईंच्या दागिन्यांची मागणी केली.
त्यावर स्वराने दागिनाबद्दल माहिती नसल्याचे सांगितले आणि अमोलने हा तमाशा केला होता.

स्वरा रडत म्हणाली, " भाऊजी मला खरंच दागिन्याबद्दल काहीही माहिती नाही. "

मीना, "माहिती कसं नाही ? आई तुमच्यासोबत राहत होत्या ना ? त्यांचे दागिने तुमच्याकडेच असणार. चांगले ३० तोळे दागिने आहेत. ते पाहूनच नियत फिरली असणार तुमची. आत माहिती नाही सांगताय. "

अमोल चिडून म्हणाला, " हे बघा वहिनी अजूनही मानाने बोलतोय. बऱ्याबोलाने दागिने दया. नाहीतर पोलिसांमध्ये चोरीची तक्रार करेन. आदिनाथच्या डोक्यावर आधीच बापाच छप्पर नाहीये. आईचसुद्धा का काढून घेताय ? "

" कोण आदिनाथच्या डोक्यावरून आईच छप्पर काढून घेणार आहे  ? " एक करारी आवाज दरवाजाच्या दिशेने आला. सर्वांच्या नजरा दरवाजाकडे गेल्या. रमाबाई आणि त्यांच्या यजमानांचे जुने वकील मित्र ऍडव्होकेट. मोरपंत कारखानीस आले होते. त्यांना पाहून सर्वजण स्तब्ध झाले.

ते आत येत म्हणाले, " कोण आदिनाथच्या डोक्यावरून आईच छप्पर काढून घेण्याविषयीं बोलत होत ? "

" मी.... मी म्हणालो नाना. तुम्हाला माहित नाही. वहिनींनी आईचे दागिने लंपास केले आणि आता काही माहित नाही असं सांगतायत. " अमोल थोड्या नरमाईने म्हणाला. कारण अमोलला त्यांचा दबदबा माहित होता.

" खरं बोलतेय ती. तिला नाहीच माहित रमाबाईंचे दागिने कुठे आहेत ते. कशाला तिला त्रास देतोयस. " adv. मोरोपंत.

" मग कोणाला माहित आहे ? " मीना थोड्या रागानेच म्हणाली.

" मला....! मला माहित आहे सर्व. या जीवन यात्रेचा प्रवास संपण्याआधी रमाबाई माझ्याकडे आल्या होत्या. " adv. मोरोपंत. त्यांच्या या बोलण्यावर सर्वजण चकित होऊन पाहू लागले.

" होय. रमाबाई आल्या होत्या. साधारण तीन वर्षांपूर्वी. महेशला जाऊन जेमतेम वर्ष झाला होता. तेव्हा त्या आल्या होत्या. त्यांना त्यांचे सर्व दागिने विकायचे होते. म्हणून खात्रीशीर माणूस म्हणून माझ्याकडे आल्या. त्यांना घेऊन मी आणि माझी पत्नी सोनाराकडे गेलो आणि त्यांनी माझ्या आणि माझ्या पत्नी समोर सर्व दागिने विकले. आणि ते सर्व पैसे आदिनाथच्या नावाने बँकेत ठेवले आहेत. जे आदिनाथच्या शिक्षणासाठी आहेत. " मोरोपंत शांतपणे म्हणाले.

" असं कसं करू शकते आई ? त्यात माझा सुद्धा हिस्सा आहे. काही नाही हे सर्व वहिनींनी घडवून आणलं आहे. " अमोल रागाने म्हणाला.