Login

दलदल

ही कथा आहे एका मुलाची जो एका व्यसनाच्या दारातून आपल्या वडिलांच्या वरच्या प्रेमामुळे परत फिरला.
दलदल
“अरे सचिन काय मग आज संध्याकाळी काय करतोयस आज वीकेंड आहे. आमचा प्लॅन आहे आज बसायचा.” सचिनचा कॉलेज मधला मित्र मंगेशने सचिनला व्हॉट्स ॲपवर विचारले.
ऑफिसमधून लंचसाठी जाताना सचिनने मंगेशचा मेसेज पाहिला आणि सचिनपुढे पुन्हा एक यक्षप्रश्न उभा राहिला.
तसं पाहिलं तर सचिन विना आईचा पोर. त्याची आई लहानपणीच देवाघरी गेली. आणि आईच्या माघारी सचिनला त्याच्या वडिलांनीच लहानाचा मोठा केला. सचिनचे वडील अशोकराव हे साताऱ्याच्या एका पतसंस्थेत लिपिक म्हणून काम करायचे. त्याच गाव सातारा शहरापासून जवळच होत. तेव्हा अशोकराव आणि सचिन गावीच रहात. आईविना पोरावर चांगले संस्कार व्हावेत आणि त्याच्या शिक्षणात कोठेही तडजोड नको असा विचार करूनच अशोकरावांनी सचिनला गावातल्या जिल्हा परिषद शाळेत न शिकवता सातारा शहरातल्या नामांकित शाळेत पहिली पासूनच टाकले होते. त्यामुळे अशोकरावांचा दिवस सकाळी साडे चार वाजताच सुरू होत असे. सकाळी उठून अंघोळ करून स्वतःचा आणि सचिनचा डबा बनवून ते सचिनला उठवत आणि त्याला तयार करून स्वतः सोबतच गाडीवरून शाळेत सोडत. आणि संध्याकाळी सोबतच शाळेतून घेऊन घरी जात. घरी गेल्यावर पुन्हा रात्रीच जेवण आणि घरातील आवराआवर हे सगळ करता करता रात्र कधी होई हे अशोकरावना समजतही नसे. आपल्यासाठी दिवसरात्र कष्ट करणाऱ्या वडिलांना पाहतच सचिन वाढत होताच. त्यामुळे त्यालाही आपल्या परिस्थितीची आणि वडिलांच्या कष्टांची योग्य जाण होत होती.आणि त्यामुळेच सचिनही त्याला कळू लागल्यापासून मन लाऊन अभ्यास करत असे. आणि अभ्यास करून वडिलांना त्यांच्या कामात हातभार लावू लागला होता.
अशातच बघता बघता सचिन MBA करून पुण्यातल्या एका मोठ्या कंपनीत नोकरीला लागला. नोकरीला लागताच सचिनने अशोकरावांना त्यांची पतसंस्थेतली नोकरी सोडायला लावली. आणि त्यांच्या सोबतच तो पुण्यात एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहू लागला. पुण्यात रहायला आल्यापासून अशोकराव एकदम निवांत आयुष्य जगू लागले होते. आणि सचिनदेखील कंपनीच्या वातावरणात रुळू लागला. बऱ्याच शुक्रवारी सचिन कंपनीतल्या किंवा त्याच्या कॉलेजमधल्या मित्रांसोबत बाहेर पार्ट्यांना जात असे. जरी तो बऱ्याच वेळा पार्ट्यांना जात असला तरी पार्टीत मित्रांकडून दारू सिगारेट पिण्याचा होणारा आग्रह तो अतिशय निग्रहाने परतवून लावत असे.
आता आज सुद्धा मंगेशचा आलेला मेसेज पाहून तो विचारात पडला होता. मंगेश आणि त्याचा कॉलेजचा मित्रांचा ग्रूप प्रत्येक पार्टीमध्ये त्याला प्रचंड आग्रह करत असत. कधी कधी त्याला त्या आग्रहापुढे हार मानावी लागेल असे वाटत असे. आणि म्हणूनच त्याने मंगेशला मेसेज करून पार्टीला यायला जमणार नाही अस सांगितलं. आणि दुपारचं जेवण करून त्याने कामाला परत सुरुवात केली. आणि तितक्यात त्याला मंगेशचा फोन आला. आता याला कस कटवायच हा विचार करतच त्याने तो फोन उचलला.
“ बोल रे मंग्या.” अस सचिनने म्हणताच मंगेश त्याच्यावर उखडलाच. “ अरे सच्या काय रे तुला दरवेळी गूळ लावायचा पार्टीसाठी. असच कधीतरी दोन तीन महिन्यांनी पार्टीच्या निमित्ताने आपली भेट होते. तर तुझी ही नेहमीची नाटक. ते काय मला माहित नाही तू जर आज नाही आलास तर .”
“ तर तर काय” अस म्हणत सचिनने मंगेशला डिवचले.
“ तर काय? तर भोसड्यात गेला तू आणि भोसड्यात गेली आपली मैत्री. तुझ हे दरवेळी नाटक आहे.आता मी ठरवलय इथून पुढं तुला बोलवणारच नाही मी.” मंगेश रागरागातच म्हणाला. तसा सचिन हसत हसत म्हणाला “ नको रे बाबा असा मला भोसड्यात घालवूस येतो बाबा मी पण दरवेळसारखं मागं नाही लागायचं दारू पी म्हणून.”
“बरं बाबा तू ये मग बघू. यावेळी एक वेगळी गोष्ट ट्राय करायची आहे. वास बिस काही येणार नाही. तू ये मग तुला दाखवतो. मग तूच म्हणशील ये तो ट्राय करना जरुरी है.चल बाय.वेळेवर ये” अस म्हणत मंगेशने फोन ठेवला.
ऑफिस सुटताना सचिनने अशोकरावांना फोन करून पार्टीला जात असल्याचं सांगून टाकल. तेव्हा त्यांनी त्याला पार्टीत जपून रहा अस सांगितलं. सचिनदेखील “हो बाबा तेवढा विश्वास ठेवा आतातरी तुमच्या लेकावर” अस म्हणाला.
“ हो रे विश्वास आहेच पण या वयात कधी पाय घसरेल ते समजत नाही तेव्हा आमच्यासारखी म्हातारी माणसंच असतात आठवण करून द्यायला.” अस अशोकराव म्हणाले. “हो बाबा काळजी नका करू. तुमचे कष्ट मी पाहिलेत. आणि तुम्ही दिलेले विचार माझ्या सोबत आहे तेव्हा पाय घसरणार नाही माझा तुम्ही निवांत जेवा आणि झोपा मला रात्री यायला उशीर होईल.” अस म्हणून सचिनने फोन ठेवला आणि गाडी चालू करून तो मंगेशच्या फ्लॅटवर जाण्यासाठी निघाला.
अर्ध्या तासाचा प्रवास करून सचिन मंगेशच्या फ्लॅटवर पोहचला तेव्हा मंगेश आणि त्याचा अजून एक मित्र अरुण यांनी दारू प्यायला चालूच केली होती. “ आले आले आमचे संत श्री. सचिन बाबा आले” अरुण दारू पिता पिता म्हणाला. ते ऐकून सचिन बळेच हसला. आणि त्यांच्या शेजारी बसला. तेव्हाच मंगेश म्हणाला “ अरे अरण्या, हा काही संत नाही काय श्रावणबाळ आहे श्रावणबाळ” अस बोलून तो जोरजोरात हसू लागला
“ अरे भडव्यानो, हसा तुम्ही पण मला माहित आहे माझ्या बापाने मला कस वाढवलं आहे ते. तेव्हा त्यांना त्रास होईल अस मला काही वागायचं नाही. बास विषय संपला.” सचिन अस बोलताच अरुण म्हणाला “मला एक सांग सच्या तुला कधीच अस मस्त झिंगून जावं मजा करावी जगाला विसरून जावं. सगळ टेन्शन अस एका घोटात पिऊन टाकावं असं वाटत नाही का?”
ते ऐकून सचिन म्हणाला “खर सांगू का आरण्या वाटत रे कधी कधी पण तेव्हा वडिलांचा चेहरा त्यांचे सगळे कष्ट डोळ्यासमोर येतात आणि मग भीती वाटते जर मी हे सगळ करतो ते वडिलांना कळाले तर त्यांना काय वाटेल?”
“अरे पण त्यांना कळणार कसं?” दारूचा ग्लास एका घोटात संपवत मंगेश म्हणाला. “ कसं कळणार? अरे बेवड्या तू नुस्तं तोंडजरी उघडलं तरी दोन किलोमीटरवर वास येईल.” सचिन असं म्हणताच मंगेश अरुणकडे बघत म्हणाला “ आरन्या बघ म्हणजे या श्रावणबाळाचं मन आहे मजा करायचं पण बापाला घाबरत आहे.”
हे ऐकताच अरुण जागेवरून उठला. आणि त्याच्या बॅगमधून एक पुडी काढत म्हणाला “हे बघा कलियुगातल्या तुमच्यासारख्या श्रावणबाळासाठी खास औषध. थोड महाग आहे. आणि मिळवायला पण अवघड आहे पण दोस्तांसाठी कायपण भावा. घे ओढ एक कश.” अरुणने ती पुडी सचिनकडे दिली. सचिन ती पुडी बघून विचारात पडला. त्याच एक मन त्याला हे सगळ चुकीचं आहे म्हणत होत. तर दुसरं मन एकदा ट्राय कर असं म्हणत होत.
सचिनला अशा द्विधा मनस्थितीत पाहून मंगेशने ती पुडी घेतली आणि त्यातली पावडर ओढली. “ अहाहा साला एक आख्खी बाटली एकीकडे आणि या पावडरचा एक कश एकीकडे.” अस म्हणतच त्याने ती पुडी परत सचिनकडे दिली.आणि म्हणाला “घे रे सच्या, एकदा स्वर्गाची सफर करून बघ. सगळ विसरून जाशील.” सचिनने दोन मिनिट त्या पुडीकडे बघितलं आणि डोळे मिटून तो विचार करू लागला. आतापर्यंतच्या आयुष्यात केलेला संघर्ष, वडिलांचे कष्ट आणि त्यांचा त्याग,त्याच्यावर केलेले संस्कार या सगळ्यांवर त्यावेळचा तो मोहाचा क्षण वरचढ ठरत होता. त्याने डोळे उघडले आणि समोर नशेच्या धुंदीत पडलेले मंगेश आणि अरुण त्याला दिसले. आयुष्यातले सगळे त्रास आणि प्रश्न विसरून ते दोघे धुंदीत पडले होते. एकदा ही धुंदी अनुभवायची याच विचारात सचिनने ती पावडरची पुडी उघडली आणि एका चिमटीत ती पावडर घेतली.
तेव्हाच एकदम त्याचा फोन वाजला.त्याच्या वडिलांचा फोन होता. त्याने फोन उचलला आणि विचारला “काय झालं बाबा तुम्ही अजून झोपला नाही का?”
“झोपलो होतो रे पण एक वाईट स्वप्न पडल तू लहान आहेस आणि मी तुला खांद्यावर घेऊन चिखलातून चालत होतो आणि तू अचानक खाली दलदलीत पडलास आणि त्यात अडकत गेलास आणि मी सगळ दिसत असून काहीच करू नाही शकलो हे पाहिलं आणि जाग आली. म्हणून मग तुला फोन केला.” अशोकराव म्हणाले. ते ऐकून सचिन म्हणाला “ तुम्ही आणि तुमचे संस्कार जोपर्यंत माझ्या सोबत आहेत तोपर्यंत मी स्वप्नातल्या आणि खऱ्या दुनियेतल्या कुठल्याच दलदलीत अडकून पडणार नाही.तुम्ही निश्चिंतपणे झोपा बाबा मी तासाभरात येतो घरी.” एवढं बोलून सचिनने फोन ठेवला. आणि दुसऱ्या हातातल्या पुडीकडे पाहून तो हसला आणि उठून त्याने ती पुडी बेसिनमध्ये टाकून पाण्याचा नळ सुरू केला.मग नशेच्या धुंदीत पडलेल्या मंगेश आणि अरुणकडे एक नजर टाकून त्याने फ्लॅटच्या बाहेर पाऊल ठेवले.

लेखक:- वैभव कोरडे.
वरील कथेचे सर्व हक्क लेखकाने राखून ठेवलेले आहेत. या कथेचा कोणत्याही रूपात वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक राहील याची नोंद घ्यावी.