Login

दप्तराविणा शाळा भाग-३

दप्तराचे ओझे
दप्तराविणा शाळा
भाग -३अंतीम

एक दिवस मी माझ्या डाॅक्टर मैत्रिणीकडे तिच्या ओपीडीत बसले होते. ती मानसोपचार तज्ज्ञ. एक आई, आपल्या मुलाच्या वागणुकीला त्रासलेली आपल्या मुलाला घेऊन आली तिच्याकडे आणि सांगु लागली,'' डॉक्टर याला ना अगदी काही करावसंच वाटत नाही. म्हणजे नुसतं खेळायचं असतं उठसूठ बाहेर. अभ्यास तर मुळीच सांगु नका.अभ्यासाचं नाव काढलं की त्याचं पोट दुखतं,डोकं दुखतं. फार प्राॅब्लेम झालाय. फार बेशिस्त झालाय हो.मनाला येईल तसा वागतो,मनात येईल तेच करतो.अभ्यासाबाबत मात्र बोंबाबोंब. जास्त बोलायला गेलं तर आक्रस्ताळेपणा करतो.भिती वाटतेय हो.हा बिघडेल का ?याचं भविष्य काय ?जास्त बोलायला जावं तर जीवाचं काही बरंवाईट तर करून घेणार नाही ?पण टेंशन आपल्यालाच.तो तर त्याच्या मस्तीत."
डॉक्टर मैत्रीण तिला म्हणाली,

''तुमच्या मुलापेक्षा मला तुम्हीच प्राॅब्लेम वाटत आहात.''

नाजुकशा कोषातून नुकतंच सुरवंटाचं फुलपाखरात रुपांतर व्हावं तशी ही कोवळी निरागस पिढी.
आपल्याला मात्र ती बेशिस्त, बेजबाबदार वाटते.
पण त्यांना समजून घेण्यात आम्ही कुठे कमी पडतो आहोत काय ?त्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करण्यात आपण कमी तर पडत नाही ना ?हा प्रश्न आमच्या मनात का उत्पन्न होत नाही ?त्यांच्या वर्तनाचं योग्य मूल्यमापन आपण करतो आहोत का ? तो असे का वागतोय?त्यांना मार्गदर्शनाची आमची दिशा बरोबर आहे का ?याचा विचारही आमच्या मनाला शिवत नसेल तर पहिले तुम्हीच ट्रीटमेंट घ्यायला हवी.
आजकाल मी ट्रीटमेंटची दिशा बदललीय.पहिले आईवडीलांनाच समुपदेशन आवश्यक आहे.मुलांचे लाडकोड पुरवले त्यांना हवे ते दिले की झाले.त्यांच्या मानसिक गरजा जाणून घेतल्या कधी ?
शाळेत जाऊन शिक्षकांनाही लगेच जाब विचारणारे आम्ही मुलगा मागे का पडला ?तो थोडा विचित्र वागतोय,चुकीचं काहीतरी शिकून आलाय एक ना अनेक तक्रारी.
मग शिक्षकही शाळेत त्याच्यावरच फोकस करणार.

मुलांमधे कित्येक गुण सुप्तावस्थेत असतात.त्याकडे आमचं लक्षच जात नाही.आम्हाला फक्त आणि फक्त शालेय पुस्तकी अभ्यासाचं महत्त्व वाटतं.मग आम्ही कधी त्याला,किशोर,चांदोबासारखे त्याचं व्यक्तीमत्व बहुआयामी घडवणारे पुस्तक ही वाचायला देत नाही.
त्याचं वक्तृत्व, त्याचं गाणं,त्याची चित्रकला,एखाद्या खेळातील नैपुण्य,त्यानी केलेलं लेखन मग ते निबंध लेखन का असेना,त्याचा अभिनय या कोणत्याच गोष्टीचं कौतुक आम्हाला वाटत नाही. का ?तो त्यातही आपलं भविष्य घडवू शकतो हे आमच्या गावीही नसते.आमच्या नजरेसमोर फक्त त्याची मार्कशीट असते.
आपण त्याच्या ठिकाणचे हे गुण तर बघायलाच हवे सोबत त्याची शारीरिक, मानसिक, बौद्धिक क्षमता,अवस्था लक्षात घ्यायला हवी.
योग्य ते प्रोत्साहन द्यायला हवे.तशी संधी उपलब्ध करून द्यायला हवी.त्याच्यावर विश्वास टाकायला हवा.
थोडे कमी मार्क आलेत तर ढोरे चारायला ने हेही बजावायला आपण मागेपुढे पहात नाही.
त्यांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक क्षमता आणि अवस्था दोन्हींचा अभ्यास करून बघायला हवे की जर त्याची बौद्धिक क्षमता असून देखील कमी गुण मिळत असतील नापास होत असेल तर त्याला कोसण्या पेक्षा बघा तो मानसिकदृष्ट्या तर खचला नाही.किंवा शारीरिक क्षमता कुठे कमी पडते आहे का ?याचा विचार न करता फक्त अभ्यास! अभ्यास !! अभ्यास!!
त्याला बोलणे.यातूनच आज नको ते प्रकार घडत आहेत.
आज एक असाही विचार प्रवाह आहे की आपल्या वेळी सोयी सुविधा नव्हत्या आपण शिकु शकलो नाही आता मुलाने शिकावे.आपली इच्छा पुर्ण करावी.
पण त्याचे मत कधी विचारात घेणार ?
त्याला त्याच्या आवडत्या क्षेत्रात योग्य संधी उपलब्ध करून द्या.प्रोत्साहन द्या आणि विश्वास जागवा.ते वाळवंटातही नंदनवन फुलवतील यावर विश्वास ठेवा.
शेवटी आहे त्या परिस्थितीत मुलांची बुद्धिमत्ता,त्यांचं व्यक्तीमत्व यांचा स्विकार आम्ही खरेच करतो का ?की आमच्या अवाजवी अपेक्षा त्यांच्यावर लादतो?मुलांच्या जडणघडणीकडे इतक्या बारकाईने पाहण्याची वेळ आज येवून ठेपली आहे. आजची मुलं फार हुशार आहेत.त्यांना शाळेतूनही योग्य वळण हवं .
कृतीयुक्त शिक्षण हवं नाहीतर मुलं भरकटायला वेळ लागणार नाही.त्यांची बुद्धिमत्ता तिकडे लागेल तर विप्लव होईल.मग पेपरला बातमी येते नऊ वर्षाच्या मुलाने शिक्षकावर बंदुकीने गोळीबार केला.त्याला बंदूक कुठून मिळाली तो चालवणे कुठे शिकला हे प्रश्न नंतरचे.त्याची मानसिक अवस्था अशी कशी बनली हे महत्त्वाचे.
शाळेतूनही मूल्यशिक्षण, जीवनोपयोगी कृतीयुक्त शिक्षण देणे गरजेचे आहे.
नुसते पाठीवरचे ओझे वाढवून तो गधा बनू नये याकडे लक्ष देणे नितांत गरजेचे आहे.
वीणाचे विचार चक्र चालूच होते तर अनु परत आली.
"आजी कशाचा विचार करतेय एवढा ?चल आपण बुद्धिबळ खेळु."
म्हणत ती घेऊन पण आली डबा..आणि आम्ही आजी नात खेळण्यात रमलो.आज अनु खूप खूष होती.तिच्यासोबत मीपण.