दरवळ कस्तुरीचा भाग १

अधुरी प्रेमकथा..
बाहेर रिमझिम पाऊस बरसत होता. फोनच्या 'प्लेलिस्टमधून' सिलेक्टेड अशी मस्त जुनी गाणी लावून गॅलरीमध्ये बसून ती कडक कॉफी घेत होती. गॅलरीमधील कुंड्यांमध्ये गुलाबी रंगाची मधाळ सुगंध पसरवणारी बरीच गुलाबांची फुलं उमलली होती.
गाण्यांच्या संगीतात आणि त्याला जोड असणाऱ्या पावसाच्या रिमझिम सरिंमध्ये भूतकाळाच्या गोड आठवणी आठवून तिच्या चेहऱ्यावर अनामिक असं स्मित उमललं होतं..अगदी गुलाबांच्या फुलांप्रमाणे..
दिवस कसे भरभर निघून गेले असा विचार करत असतांनाच, तिच्या फोनची बेल वाजली आणि तिची तंद्री तुटली.

समोरच्या टेबलवर असलेला फोन ती हातात घेते. मोबाईलच्या स्क्रीनवर नंबर चमकत असतो. अननोन नंबर बघून 'कोणाचा कॉल असेल बरं?' डोळे बारीक करून असा विचार करतच ती कॉल रिसिव्ह करते.

"हॅलो..कोण?" कॉल रिसिव्ह करून ती विचारते.

"हॅलो..मी बोलतोय. मधुर!"पलीकडून उत्तर आलं.

नाव ऐकून तिच्या काळजात एक हलकीचं कळ गेली आणि डोळ्यांत अश्रू जमा झाले.

"मधू.." तिने हलकेच त्याचं नाव उच्चारलं आणि डोळ्यात जमा झालेलं पाणी अळवावर साचलेल्या मोत्यासारख्या टपोऱ्या थेंबागणीक तिच्या गालांवरून ओघळलं.

"कशी आहेस?" त्याने विचारलं.

"मी मजेत आहे. तु कसा आहेस? आणि तुला माझा नंबर कुठून मिळाला?" डोळ्यातलं पाणी पुसतच तिने सुद्धा विचारलं.

" मी पण मस्त. कारवा वर गाणी ऐकत होतो. तुझी आठवण आली म्हणून खूप हिम्मत करून कॉल केलाय." तो म्हणाला.

"इतक्या वर्षांनी आज माझी आठवण आली?" तिने दीर्घ श्वास घेत त्याला प्रश्न विचारला.

"आठवण तर रोजचं यायची फक्त हिम्मत होत नव्हती. आज शेवटी धीर एकवटून तुला कॉल केला. आणि नंबरच विचारशील तर दिला माझ्या कुणी हितचिंतकांनी." त्याने उत्तर दिलं.

"हम्म.. अच्छा. बरं बायको कशी आहे तुझी? आणि तुझी लेक. ती कशी आहे?" तिने सहज म्हणून विचारलं.

"लेक मजेत आहे. शास्त्रीय संगीतात पदवी घेतली आणि आता लग्न करून बाहेरगावी स्थायिक झाली. बायको आठ वर्षांपूर्वीच संसार माझ्यावर सोपवून कायमची निघून गेली. लेकीच्या सगळ्या जबाबदाऱ्या बाप म्हणून पेलता पेलता नकळत तिची आई सुद्धा झालो."भरून आलेला हुंदका अडवतच तो म्हणाला.
त्याच बोलणं ऐकून ती मात्र शांतच होती.काय बोलावं ते तिला सुचेना.

"सॉरी अरे..मला माहित नव्हतं." ती म्हणाली

"अगं..सॉरी कशाला? तुला माहीत असायला आपण बोलतच कुठे होतो. पंधरा वर्षाच्या कस्तुरीला माझ्याकडे सोपवून ती निर्धास्त होऊन गेली बघ. कधी तिला कॅन्सर डिटेक्ट झाला आणि कधी तो बळावला आम्हाला समजलच नाही. जेंव्हा तिच्या आजाराचं निदान झालं तेंव्हा ती कॅन्सरच्या शेवटच्या टप्प्यात होती.त्याक्षणी सुद्धा कस्तूरीला भेटा तिच्याशी बोला असं सांगून तिने माझ्या मांडीवर शेवटचा श्वास घेतला." तो म्हणाला.

"कस्तुरीला भेटा. म्हणजे? तिने प्रश्न केला.

"आमचं लग्न झालं. सगळे विधी पूर्ण झाले आणि मग आली ती पहिली रात्र. सगळ्या मुलींची यारात्री विषयी खूप स्वप्न असतात आणि तिचं तेच स्वप्न मी भंग केलं. आपल्या दोघांच्या नात्याविषयी आपल्या प्रेमाविषयी मी तिला सगळं काही सांगितल. तरी सुद्धा कुठल्याही प्रकारचा किंतू मनात न ठेवता ती माझ्यासोबत नेटाने संसार करत राहिली. शेवटी सहवासातून प्रेम होतंच. तिच्या चांगुलपणाने आणि प्रेमाने मला जिंकलं. तुझ्यावर असलेलं प्रेम मी मनाच्या सुवर्ण कुपीत बंदिस्त करून ठेवलं आणि स्वतःला तिच्यावर चौफेर उधळलं. जवळपास दीड वर्षांनी आम्ही पहिल्यांदा एकत्र आलो आणि सुखाचा परमोच्च गाठला. तिला दिवस गेले आणि आम्हाला कन्यारत्न झालं. तिचं नाव कस्तुरी ठेवलं. माझ्या आयुष्यात तुझा दरवळ कायम रहावा असं तिला नेहमी वाटायचं म्हणून तिने आमच्या लेकीच नाव कस्तुरी ठेवलं आणि शेवटच्या क्षणी सुद्धा कस्तुरीचा दरवळ देऊन गेली." त्याने थोडक्यात सगळं सांगितल.
तिला हुंदका अनावर झाला आणि ती रडू लागली.
क्रमशः
©®श्रावणी लोखंडे..
27.07.24

🎭 Series Post

View all